आंतरराष्ट्रीय संबंधात कला, संस्कृती, धर्म, वंश यांना जरी महत्त्व असले, तरी दोन राष्ट्रांच्या संबंधात आर्थिक गणिते ही आधुनिक जगात कायमच महत्त्वाची भूमिका बजाविताना दिसतात. दोन देशांना एकमेकांचे साहाय्य आधुनिक काळात संरक्षण आणि आर्थिक फायद्यासाठी हवे असते. नव्हे, तर द्वैराष्ट्र संबंधांचे मूळ हीच तत्त्वे असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. भारताचे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून वाढणारे सध्याचे महत्त्व जगाला खुणावत आहे.
भारताशी व्यापार करण्यास अनेक राष्ट्र इच्छुक आहेत. त्यापैकीच एक राष्ट्र म्हणजे इंडोनेशिया. नुकतेच इंडोनेशियाचे कॉन्सुलेट जनरल अगुस साप्तानो व त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ च्या कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र चेंबरच्या विविध पदाधिकारी वर्गाशी चर्चा केली. तसेच भारत आणि इंडोनेशियातील व्यापार वृद्धिंगत व्हावा, यासाठी त्यांनी चेंबरच्या पदाधिकार्यांना इंडोनेशियाला भेट देण्याचे निमंत्रणदेखील दिले. तसेच आभासी स्वरूपात ३६ वे ‘ट्रेड एक्सपो इंडोनेशिया’ प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन अगुस साप्तानो यांनी केले. यावेळी बैठकीत प्रामुख्याने महाराष्ट्र चेंबरच्या सदस्यांना इंडोनेशियन व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधींमध्ये प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्र चेंबर, इंडोनेशिया कॉन्सुलेट जनरल एकत्रित काम करून व्यापार उद्योगांच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. व्यापार विषयक संघटना आणि देश यांत कायमच चर्चा होत असतात. त्यात नवे असे काही नाही. मात्र, असे देश ज्यांचे भारताच्या सागरी दृष्टिकोनातून महत्त्व आहे आणि ज्या देशांवर अधिराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न भारताच्या शेजारील देश जसे चीन करत आहे. अशा देशांच्या समवेत भारताचे आर्थिक हितसंबंध वृद्धिंगत होणे आंतरराष्ट्रीय पटलावर नक्कीच महत्त्वाचे आहे. कारण, आधी नमूद केल्याप्रमाणे आंतराष्ट्रीय संबंधांची मुख्य वाहिनी आता आर्थिक गणिते झाली आहेत. आसियान राष्ट्रांच्या प्रदेशात इंडोनेशिया भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून मागील काही वर्षांत उदयास आला आहे. भारत आणि इंडोनेशियात द्विपक्षीय व्यापार २००५-०६ मध्ये ४.३ युएस अब्ज डॉलरपासून २०१८-१९ मध्ये २१ युएस अब्ज डॉलरपर्यंत वाढला असल्याचे दिसून येते.
भारत इंडोनेशियातून कोळसा आणि कच्च्या पामतेलाचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार आहे आणि खनिजे आयात करतो. रबर, लगदा आणि कागद आणि हायड्रोकार्बन साठा परिष्कृत पेट्रोलियम उत्पादने भारत निर्यात करतो. व्यावसायिक वाहने, दूरसंचार उपकरणे, शेतीमाल, इंडोनेशियाला स्टील उत्पादने आणि प्लास्टिक यांचीही निर्यात भारताच्या माध्यमातून होत असते. इंडोनेशियात सुमारे ३० च्या जवळपास भारतीय गुंतवणुकीचे संयुक्त उपक्रम आहेत. इंडोनेशियात भारतीय गुंतवणूक २०००-२०१८ दरम्यान २.२१५ प्रकल्पांमध्ये ९९५.१८ दशलक्ष आहे. त्या तुलनेत भारतात इंडोनेशियाची गुंतवणूक ६२९.१६ युएस अब्ज डॉलरपर्यंत मर्यादित आहे (एप्रिल २०००-मार्च २०१९), तसेच ‘मिशन जवाहरलाल नेहरू इंडियन कल्चरल सेंटर’मार्फत भारत आणि इंडोनेशिया यांच्या सांस्कृतिक संबंधास चालना देण्यात येत आहे. भारतीय शास्त्रीय संगीत आणि योगाचे वर्ग, भारतातील सर्व प्रमुख सणांचे आयोजन करणे, होळी, गणेश महोत्सव, नवरात्री, दुर्गा पूजा, दिवाळी आदी सणदेखील भारत आणि इंडोनेशियामध्ये साजरे होत असतात. इंडोनेशियातील विविध शहरांमध्ये विद्यापीठे, भारतीय संस्कृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते. इंडोनेशियात भारतीय वंशाचे सुमारे १,२०,००० इंडोनेशियन आहेत जे मुख्यतः केंद्रित आहेत, ग्रेटर जकार्ता, मेदान, सुराबाया आणि बंडुंग क्षेत्रात. प्रामुख्याने व्यापार व्यवहारात गुंतलेले आहेत.इंडोनेशियात ८,५०० हून अधिक भारतीय नागरिक राहतात. अभियंते, सल्लागार, चार्टर्ड अकाऊंटंट, बँकर्स आणि इतर व्यावसायिक. भारतीय इंडोनेशियामध्ये समुदायाला खूप चांगले मानले जाते. स्थानिक आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर भारतीय असल्याचे सहज दिसून येते. जगाच्या नकाशात इंडोनेशिया राष्ट्र हिंदी महासागराला लागून आहे. भौगोलिकदृष्ट्या भारताच्या अंदमान आणि निकोबार बेट समूहाजवळ भारत आणि इंडोनेशिया यांची सीमा आहे. हिंदी महासागरात चीन आपले महत्त्व वाढवू इच्छितोे. अशा वेळी इंडोनेशियासारख्या छोट्या पण सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या राष्ट्राशी असणारे संबंध भारतासाठी नक्कीच महत्त्वाचे आहेत. त्या संबंधात आता व्यापार असल्याने या संबंधांच्या शाश्वतता अधिक काळ टिकण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.