नवी दिल्ली : भारतीय सरकारने नुकतेच खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी नावांची यादी समोर आली आहे. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा, रौप्य पदक विजेता कुस्तीपटू रवी दहिया, महिला क्रिकेटपटू मिताली राज, हॉकीपटू पी.श्रीजेश यांच्यासह एकूण ११ जणांची क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या 'खेलरत्न' पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. तर एकूण ३५ जणांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी हे वर्ष खूप ऐतिहासिक ठरले आहे. टोकियोमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. तर, पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला. अवनी लेखरा पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदकं कमावणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. तर सुमील अंतील यानं पॅरा भालाफेकीत सुवर्णपदकाची कमाई केली. या दोघांचीही खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झाली आहे.
या यादीत मिताली राज, सुनील छेत्री, कुस्तीपटू रवी दहिया, बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन, हॉकी संघाचा गोलकीपर पी.आर. श्रीजेश, बॅडमिंटनपटू प्रमोद भगत, भालाफेकपटू सुमित अंतिल, नेमबाज अवनी लेखरा, बॅडमिंटनपटू एम. कृष्णा नागर आणि नेमबाज एम. नारवाल यांचा समावेश आहे. याचबरोबर शिखर धवनसह ३५ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.