सरकारी यंत्रणेचा वापर करून मतदारांचे दमन
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : सरकारी यंत्रणेचा वापर करून राज्यातील मतदारांचे दमन करणे, हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याचा पॅटर्न आहे. मात्र, आता त्यात पॅटर्नवर आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी सरकार चालत आहे, अशी टिका भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्र प्रदेश सह – प्रभारी सुनील देवधर यांनी बुधवारी पत्रकारपरिषदेत केली.
यावेळी देवधर म्हणाले, सरकारी यंत्रणेचा वापर करून मतदारांना त्रास देणे, त्यांचे दमन करणे, त्यांना धमकाविण्याचे प्रकार हे ममता बॅनर्जी सरकारचे वैशिष्ट्य आहे. मात्र, आता त्याच पॅटर्नचा वापर आंध्र प्रदेशातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जगनमोहन रेड्डी सरकार करीत असल्याचे दिसून आले आहे. राज्यातील तीन ते चार गावांकडून तशा प्रकारची तक्रार आली आहे. मोठ्या प्रमाणावर मतदारांना भयभीत करण्याचा प्रकार सुरू आहे. वायएसआर काँग्रेसला मत न दिल्यास सरकारी योजनांचा लाभ देणार नाही, असे सांगण्यात येत आहे. या प्रकाराची माहिती आम्ही निवडणूक आयोगाकडे दिली आहे, असे सुनील देवधर म्हणाले.
राज्यामध्ये आता जगनमोहन रेड्डी सरकारविरोधात नाराजी वाढत असल्याचे देवधर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पोटनिवडणुकीत सत्ताधारी वायएसआर काँग्रेसपेक्षा भाजप आणि जनसेना यांना जनतेचा पाठिंबा वाढत असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हिंदूविरोधी कृत्यांना राजाश्रय दिला आहे. भारताच्या इतिहासात प्रथमच चर्च बांधण्यासाठी सरकारी कंत्राटे काढली जात आहेत, मुख्यमंत्री पाद्र्यांना सरकारी खजिन्यातून दरमहा ३ ते ५ हजार रूपये वेतन देत आहेत. मात्र, आता जनताच याचे उत्तर देईल, असेही देवधर यांनी नमूद केले.