आसाममध्ये सनातन संस्कृतीच्या पुनःस्थापनेचा निर्धार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Oct-2021   
Total Views |

Aasam_1  H x W:
 
 
पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा म्हणाले की, “आसाममधील जनतेच्या आशीर्वादाने आपले सरकार पुढील पाच वर्षांमध्ये आसाममध्ये सनातन संस्कृतीची पुनःस्थापना करील. धर्मांध शक्तींनी ज्या भागातून भगवान राम, कृष्ण, शिव आणि गुरू शंकरदेव यांच्या हरिनामाचे उच्चाटन केले होते, तेथे पुन्हा सनातन संस्कृतीचा आणि देवादिकांचा आणि संतांचा जयघोष होईल.”
 
आसाममध्ये काही दशकांपूर्वी ज्या सनातन संस्कृतीचे उच्चाटन करण्यात आले होते, त्या सनातन संस्कृतीची पुनःस्थापना करण्याचा निर्धार आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी अलीकडेच व्यक्त केला आहे. स्थलांतरित मुस्लिमांचा नामोल्लेख न करता, आसामी समाजामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या मतभेदांमुळे, विशेषतः लोअर आसाममध्ये या समाजास आपल्या जमिनी, संस्कृती आणि आपली ओळख विसरावी लागत आहे. पण, आसाममधील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आसाममधील संस्कृतीचा हा पाया पुनःस्थापित करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे मुख्यमंत्री सरमा यांनी स्पष्ट केले. गेल्या पाच महिन्यांपासून आसाममधील जनतेचे भविष्य सुरक्षित राखण्यासाठी आपले सरकार अथक प्रयत्न करीत आहे. स्थानिक आसामी जनतेला हुसकावून लावून त्यांच्या जमिनी बळकाविण्याचा प्रयत्न गोरुखुटी येथे झाल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, “आसाममधील जनतेच्या आशीर्वादाने आपले सरकार पुढील पाच वर्षांमध्ये आसाममध्ये सनातन संस्कृतीची पुनःस्थापना करील. धर्मांध शक्तींनी ज्या भागातून भगवान राम, कृष्ण, शिव आणि गुरू शंकरदेव यांच्या हरिनामाचे उच्चाटन केले होते, तेथे पुन्हा सनातन संस्कृतीचा आणि देवादिकांचा आणि संतांचा जयघोष होईल.”
 
आसाममध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी मुख्यमंत्री सरमा यांनी टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल मानावे लागेल. सप्टेंबर महिन्यात आसाम सरकारच्या गोरुखुटी प्रकल्पाच्या जमिनीवर अतिक्रमण केलेल्यांना हुसकावून लावण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहिमेत दोघे ठार झाले होते आणि नऊ पोलिसांसह अनेक लोक जखमी झाले होते. आसामच्या दारांग जिल्ह्यातील गोरुखुटी प्रकल्पाच्या जमिनीवर अतिक्रमण केलेल्यांना हटविण्यासाठी पोलीस पथक गेले असता सुमारे दोन हजारांच्या जमावाने पोलीस पथकावर हल्ला केला. त्यावेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, शस्त्रे घेऊन हल्ले केले. त्यामुळे पोलिसांना जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार, गोळीबार करावा लागला होता. आसामच्या या गोरुखुटी प्रकल्पाच्या ७७,४२० बिघा जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण हटवून स्थानिक तरुणांना शेती आणि अन्य व्यवसाय करण्यासाठी ती जमीन देण्याचा आसाम सरकारचा मानस आहे. आसाममध्ये स्थलांतरित मुस्लिमांनी किती प्रचंड प्रमाणात तेथील जमिनींवर अतिक्रमण केले आहे त्याची कल्पना गोरुखुटीच्या घटनेवरून येते. आसामच्या सरकारने केलेल्या या कृतीवरून काँग्रेस पक्षाने त्या सरकारवर टीका करून अतिक्रमण करणाऱ्यांचा कैवार घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. कोरोना महामारी असताना सरकार असे कसे करू शकते, असे प्रश्नही काँग्रेसकडून विचारण्यात आले. मात्र, “अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालून काँग्रेसने देशाचा आणि आसामी जनतेचा घोर विश्वासघात केला आहे,” असा आरोप मुख्यमंत्री सरमा यांनी केला आहे.
 
अशा घटनेच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये येत्या ३० ऑक्टोबर रोजी पाच पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार आहे. भाजप आणि भाजप युतीतील मित्रपक्ष या जागा लढवीत आहेत. आसाम गण परिषदेने भबानीपूरची जागा भाजपसाठी सोडली आहे. त्या भबानीपूर मतदारसंघामध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलताना, आसाममध्ये सनातन संस्कृतीची पुनःस्थापना करण्याचा निर्धार मुख्यमंत्री सरमा यांनी व्यक्त केला आहे. आसाममधील या पाच पोटनिवडणुकांमध्ये सुमारे आठ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. १२६ सदस्यांच्या आसाम विधानसभेत सध्या भाजपचे ५९ आमदार आहेत. भाजपचे मित्र पक्ष असलेल्या आसाम गण परिषदेचे नऊ आणि ‘युपीपीएल’चे पाच आमदार आहेत. तर काँग्रेसचे २७, ‘एआययुडीएफ’चे १५, ‘बोडोलँड पीपल्स फ्रंट’चे तीन, ‘सीपीएम’ एक आणि एक अपक्ष, असे अन्य पक्षांचे सदस्य आहेत. आसाममध्ये ३० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकांमुळे मुख्यमंत्री सरमा यांच्या सरकारचे बळ आणखी वाढेल, असा विश्वास युतीच्या नेत्यांना वाटत आहे.
 
मोहम्मद इफ्तीखारुद्दीनयास ‘क्लीन चिट’ नाही!
 
आपल्या शासकीय निवासस्थानी धर्मप्रसाराचे कार्य करणाऱ्या मोहम्मद इफ्तीखारुद्दीन नावाच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यास विशेष चौकशी समितीने ‘क्लीन चिट’ देण्यास नकार दिला आहे. मोहम्मद इफ्तीखारुद्दीन हा ‘आयएएस’ अधिकारी उत्तर प्रदेशातील असून, आपल्या शासकीय निवासस्थानाचा वापर धर्मांतर आणि इस्लामचा प्रचार करण्यासाठी तो करीत होता. त्यासंदर्भातील काही चित्रफिती व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अन्य धर्मांची अवहेलना करताना इस्लाम धर्मच कसा श्रेष्ठ आहे, असे सांगणाऱ्या त्याच्या चित्रफिती गेल्या सप्टेंबरमध्ये व्हायरल झाल्या होत्या. अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतानाच्या काळात मोहम्मद इफ्तीखारुद्दीन २०१४-१६ या काळात कानपूर विभागाचा आयुक्त म्हणून काम करीत होता. सदर चित्रफीत सप्टेंबरमध्ये व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्याची गंभीर दाखल घेतली. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी त्यांनी विशेष चौकशी समिती नेमली. या समितीने या घटनेचा छडा लावून ५५० पानी अहवाल तयार केला. चौकशी करणाऱ्या तुकडीस मोहम्मद इफ्तीखारुद्दीन हा इस्लाम धर्माचा प्रचार करणारी भाषणे देत असलेल्या अनेक चित्रफिती मिळाल्या. दहशतवाद्यांचे पैसे वापरून मुस्लीम समाजाच्या व्यक्तींना ‘युपीएससी’च्या परीक्षांचे शिक्षण देणाऱ्या कोचिंग क्लासेससाठी प्रवृत्त केले जात असल्याचे वृत्त गेल्या वर्षी ‘सुदर्शन वाहिनी’ने प्रसारित केले होते. सध्या मोहम्मद इफ्तीखारुद्दीन हा अधिकारी राज्य परिवहन महामंडळाचा अध्यक्ष आहे. उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ सरकार त्याच्यावर काय कारवाई करते ते आता पाहायचे!
 
हा म्हणे इस्लामचा विजय!
 
रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो ‘टी-ट्वेन्टी’ स्पर्धेतील क्रिकेट सामना झाला, त्यामध्ये पाकिस्तानने विजय प्राप्त केल्यानंतर पाकिस्तानमधील धर्मांध नेते भलतेच चेकाळल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानने जो विजय मिळविला तो इस्लामचा विजय असल्याची प्रतिक्रिया धर्मांध व्यक्तींनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री रशीद मलिक यांनी, “पाकिस्तानने मिळविलेला विजय, हा ‘इस्लामचा विजय’ आहे,” असे म्हटले आहे. “भारतीय मुस्लिमांसह जगभरातील मुस्लिमांनी हा विजय साजरा करायला हवा,” असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचा समालोचक आणि माजी क्रिकेटपटू वाजिद खान याने पाकिस्तानचा कप्तान बाबर आझम याची मुलाखत घेताना, “लेकिन खुफर तो टूट गया,” अशी शेरेबाजी केली. त्यावर पाकिस्तानी कप्तानानेही “ये अल्ला का शुकर हैं,” असे उत्तर दिले. केवळ पाकिस्तानमधील जनतेने हा विजय साजरा केला असे नाही, तर आपल्या देशातील काही राष्ट्रविरोधी लोकांनी हा विजय साजरा केला आणि त्याच्या चित्रफितीही समाजमाध्यमांवर व्हायरल केल्या. पाकिस्तानचा विजय झाल्याबद्दल भारतातही आनंद साजरा करणारे महाभाग या देशात आहेत, हेही या क्रिकेट सामन्यावरून दिसून आले!
 
 
@@AUTHORINFO_V1@@