संवेदनशील, सृजनशील, विनम्र, विनयशील, प्रयोगशील अशी प्रत्येक प्रकारची ‘शीलं’ जपणारा आमचा चित्रकार मित्र आणि नागपूरच्या चित्रकलेच्या शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाचा ज्येष्ठ अधिव्याख्याता, प्रामाणिक व्यक्तिचित्रकार आणि कला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गळ्यातील ताईत असलेला प्रा. अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार! आजच्या आपल्या स्तंभाचा नायक! स्वत:ची ‘रंगलेपनशाही’ ज्याने निर्माण केली, त्याच्या खडतर, परंतु निग्रही-धीरोदात्त कला आणि कौटुंबिक प्रवासात, त्याच्याकडून होणारी कलासाधना म्हणजे एक मूर्तिमंत ईश्वरिय चमत्कारच!
आम्ही औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयाचे वर्गमित्र. अर्थात, मी उपयोजित कलेचा, तर गफ्फार पेंटिंग्जचा विद्यार्थी. गफ्फार २०२३ साली सेवानिवृत्त होणार आहे. मात्र, त्याचा कुंचला हा ऐन उमेदीतल्या नवयुवकाप्रमाणे ताजातवाना असतो. त्याची ‘रंगपॅलेट’ ही भारी शिस्तीची. गफ्फारचा मूड त्याच्या पॅलेटमधील रंगच सांभाळतात. व्यक्तिचित्रणात हुबेहूब रेखांकन आणि रंगलेपन ही त्यांची हातोटी असली, तरी चेहर्यावरील भाव-भावना टिपण्यात त्यांना अधिक ‘इंटरेस्ट’ असतो. गफ्फार यांची व्यक्तिचित्रणे ही आशयगर्भतेकडे घेऊन जाणारी असतात. म्हणजे त्यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या व्यक्तिरेखेच्या देहबोलीतून एकूण ‘मूड’ वास्तववादी, (रिअॅलिझम) तर कधी मानवतावादी (मॅनरिझम) ‘पपोर्शन’ घेऊन येतो. त्याच्या व्यक्तिचित्राचा चेहरा आणि मूड जरी पारिवारिक वा कौटुंबिक असला, तरी त्याला सार्वत्रिक करण्याचे कसब हेच गफ्फार याच्या चित्रांचं वैशिष्ट्य ठरावं.
‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ टिपण्याचं, शोधण्याचं, अभ्यासण्याचं सारं कौशल्य गफ्फारच्या रंगलेपनात उतरलेलं असतं. ग्रामीण चेहरा, प्रेमिका, शेतकरी, कामगार असे विविध विषयांवरील, क्षेत्रांतील चेहरे गफ्फार याने टिपली आहेत. चेहर्यांबरोबर नैसर्गिक घटकांचा समावेश गफ्फार याच्या चित्रांत असतो. त्यामुळे एक काव्यात्मकतेचा स्पर्शदेखील त्याच्या कलाकृतीत दिसतो.
काही कलाऐतिहासिक संदर्भ पाहिले, तर आपल्या ध्यानी येते की, निसर्ग आणि मानव यांचा दृढ संबंध निसर्गचित्रकार पॉल क्ली यांच्या कलाकृतींद्वारे स्पष्ट होते. इजिप्त, मेसोपोटेमिया, ग्रीक क्रीट यांच्या कला सांस्कृतिकतेत चित्र व शिल्पकला माध्यमांमध्ये चेहर्यातील भाव-अभिव्यक्तीला स्वातंत्र्य दिलेले दिसते. डोळ्यांतील हावभाव हा, त्याच्या कला सांस्कृतिकतेतील ‘आयकॉन’च ठरतो. माँदिग्लिनी, ईगॉन शेढे, सेझा, सूझा, आपल्याकडील रवींद्रनाथ टागोर, अकबर पदमसी, परितोष सेन अशा काही निवडक कलाकरांनी अशाच प्रकारे चेहरे टिपलेले आहेत.
चित्रकार गफ्फारचा प्रवास यांच्या मार्गाने चाललेला दिसतो. शारीरिक, कौटुंबिक संकटमय त्रासाकडे गफ्फार याने आवाहनात्मक नजरेने पाहिले. संकट ही एक स्वाध्यायिकाच असते. इतक्या प्रचंड सकारात्मकतेतून अब्दुल गफ्फार हा तळपता सूर्य तितक्याच सृजनशीलतेने उभा राहिलेला आहे. ‘वेदनेतून केलेली कला उपासना ही एक तपश्चर्याच असते,’ असे श्रीसाईबाबांनी सांगितलेले आहे. ‘चित्रकारावर सतत घात-अपघातांचा आघात झाला की, त्याच्याकडून अद्भुत अशा कलानिर्मितीस प्रारंभ होतो,’ असे आचार्य रजनीश यांनी सांगितलेले आहे. कबिराने, श्रीकृष्णाकडे आळवणी करताना म्हटले आहे की, “मला आत्म्याशी संवाद करण्याची शक्ती दे.’
अशाच काहीशा संकटांना समर्थपणे तोंड देऊन गफ्फार याने त्याची कलासाधना अव्याहतपणे सुरू ठेवली. सध्याच्या मी अनुभवलेल्या कलाकारांमध्ये मला नेहमी, चित्रकार मोग्गलान श्रावस्ती, चित्रकार अब्दुल गफ्फार आणि चित्रकार विलास चोरमुले यांच्यातील सर्जनशील, विनम्रता आणि वैचारिक तटस्थतेचा भास होतो. या तिघांचीही चित्रशैली वगैरे भिन्न आहे. मात्र, त्यांच्यातील कलाप्रकृती आणि प्रवृत्तीमध्ये बरीच साम्यता वाटते. अब्दुल गफ्फार याच्या रंगमाध्यमांबद्दल सांगायचे झाल्यास तैलरंग, अॅक्रॅलिक रंग, चारकोल, ‘पेन अॅण्ड इंक’सारखी जरा विभिन्न तंत्रांची माध्यमे, समर्थपणे हाताळलेली आहेत. कलाकार ज्या स्वभावाचा असतो, साधारण त्या स्वाभावाच्याच प्रतिबिंबाचं दर्शन त्याच्या कलाकृतीत दृष्टोत्पत्तीस पडतं.
गफ्फार हा मुळात अतिशय संवेदनशील, भावनाशील असा कलाकार आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा जंक्शन येथे जन्म झालेल्या अब्दुलचे वडील हे रेल्वेइंजिन दुरूस्ती विभागात म्हणजे लोकोशेडला ‘फीटर चार्जमन’ या पदनामाने सेवेत होते. गफ्फार हा तेथीलच प्राथमिक शाळेत शिकला. ज्या शाळेत मराठी, इंग्रजी, हिंदी आणि तेलुगू भाषांतून शिक्षण होते. तेथीलच कलाध्यापिका निमर्र्ला डेंगळे यांच्यामुळे चित्रकलेची आवड निर्माण झाली. त्यांच्या कलासंस्कारात गफ्फारने ‘इंटरमिजिएट’ ही चित्रकलेची ‘ग्रेड परीक्षा’ ‘ए’ गे्रडने आणि महाराष्ट्राच्या गुणवत्ता यादीमध्ये २८ वा क्रमांक मिळवून तो उत्तीर्ण झाला. दहावीनंतर नांदेड येथील चित्रकला महाविद्यालयात पायाभूत अभ्यासक्रम पूर्ण केला. तेथील कलाध्यापक श्रीकांत देशपांडे आणि चंद्रकांत पोतदार यांचा आवर्जून उल्लेख अब्दुल करतो. ‘एटीडी’ हा अभ्यासक्रमदेखील नांदेडलाच कलाध्यापक शिवाजी जाधव आणि प्राचार्य सुभाष वसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. पुढे कलेतील उच्चशिक्षणासाठी औरंगाबाद येथील शासकीय कला महाविद्यालयात ‘बीएफए’ पदवी पूर्ण केली.
याच ठिकाणी गफ्फार म्हणतो, “मला ‘कलर अॅण्ड डिझाईन’ तसेच पोत म्हणजे टेक्श्चर’ याचे महत्त्व समजले.” व्यक्तिचित्रातील प्रमाणबद्धता, रेखांकन, छाया, प्रकाश, रंगलेपन तसेच व्यक्तिचित्रणातील साम्य चित्रित करण्यापेक्षा आंतरिक भावभावनांचे चित्रण कसे करावे, हे शिकायला मिळाले. ‘पिक्टोरिअल कम्पोझिशन’मध्ये विषयानुरून बदलणारे आकार, रेषा व रंग यांचे महत्त्व समजले. मुद्राचित्रणाचे विविध प्रकार ‘कार्व्हिंग झिंग प्लेट एचिंग’मधील बारकावे व तंत्र शिकायला मिळाले. ‘क्रिएटिव्ह पेंटिंग’मधील नावीन्यपूर्ण आकार, रूप, रंग, पोत यांचे संयोजन व परस्पर संबंध तसेच अवकाश विभाजन शिकता आले. एकूणच गफ्फार याला त्याचे विद्यार्थीदशेतील औरंगाबादच्या ‘शाकम’मधील सर्वच कलाध्यापकांकडून कलासृजनाचे धडे मिळाले. ‘एमएफए पेंटिंग’ त्याने मुंबईच्या त्यावेळच्या सुप्रसिद्ध ‘सर जे. जे. स्कूल’मध्ये करून पुढे कलाध्यापनात स्वतःला झोकून दिले.
गफ्फारला अनेक पुरस्कारही मिळाले. त्याच्या कलाकृतींची समूह आणि एकल प्रदर्शने झालेली आहेत. त्याच्याविषयी फार महत्त्वाचे निरीक्षण सांगावे लागेल. तो कधी सहानुभूती मिळवून, भांडवल करत नाहीत. त्याच्या कलासृजनातून त्याला परिस्थितीवर मात करण्याची ऊर्जा प्राप्त होते.
त्याचे काम, त्याने केलेली शासन दरबारची सेवा निःस्पृह कलाध्यापन या सर्व बाबी पुढील पिढीला अनुकरणीय अशाच आहेत. प्रत्येक शैलीत काम करताना त्याने शील जपले. तडजोड केली नाही. अशा या संवेदनशील हळव्या आणि सृजनशील कलाकार कलाध्यापकाच्या कलासाधनेस अल्लाह, ईश्वराची ऊर्जा मिळो, हीच सदिच्छा!
- डॉ. प्रा. गजानन शेपाळ