काश्मीर मुद्द्यावरून सतत कुरघोड्या करणार्या पाकिस्तानला इस्लामिक राष्ट्रांकडून उत्तर मिळाले, ही चांगली गोष्ट आहे. चीनच्या नादी लागून काश्मीर बळकावण्याचा प्रयत्न आता तरी इमरान खान यांनी थांबविला पाहिजे; अन्यथा आता सुरू असलेली ‘छिःथू’ आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून होईल आणि पुन्हा एकदा खोट्या मनसुब्यांचा बुरखा उघडा पडेल हे नक्की.
‘हिंसेवर अहिंसेचा विजय’ हा मंत्र ज्या भारताने जगाला दिला, त्याची प्रचिती पाकिस्तानला आलेली नाही, याचे कारण म्हणजे मुस्लीम देशांपुढे भारताची प्रतिमा मलीन करण्याचा फसलेला पाकिस्तानच्या पंतप्रधान इमरान खान यांचा प्रयत्न. ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन’ला (ओआयसी) आवाहन करूनही कुणीच काश्मीर मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला नाही. पूर्वेकडील शेजारी बांगलादेशही पाकिस्तानच्या या जाळ्यात अडकलेला नाही. कारण, देशाचा सध्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबदबा आणि पाकिस्तानची आर्थिक स्थिती पाहता त्यांची साथ कुणी देईल, याबद्दल शंकाच आहे. भारताविरोधात कुठल्याही इस्लामिक राष्ट्राने एक शब्दही काढला नाही. आधीच तीळपापड झाल्यानंतर पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
दुबईची गुंतवणूक आता काश्मीरमध्ये होऊ घातली आहे. ‘कलम ३७०’ हटवल्यानंतर झालेल्या या बदलाचे स्वागत काश्मीरने केले आहे. जम्मू-काश्मीरचे प्रशासन आणि दुबईमध्ये बांधकाम क्षेत्राशी निगडित करार झाले आहेत. हा करार काश्मीरच्या विकासाचे एक महत्त्वाचे पाऊल मानला जाईल. आयटी टॉवर, औद्योगिक संकुले, लॉजिस्टिक टॉवर, वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये निर्माण करण्यासंदर्भात हे करार झाले. दुबईच्या गुंतवणुकीचा आकडा किती असेल, याबद्दल अद्याप ठोस आकडेवारी आलेली नाही. मात्र, ही सुरुवात महत्त्वाची ठरणार आहे. काश्मीरच्या या करारानंतर भारतासोबत जग उभे आहे, असा संदेश जाईल. जगाला दहशतवाद नव्हे, तर विकास हवा आहे, अशी टिप्पणी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.
पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या या खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठीही भारतापुढे बरेच पर्याय आहेत. मात्र, पाकिस्तानच्या अंतर्गत बाबींवर ठोस अशी भूमिका भारताने घेतलेली नाही किंवा डिवचल्याशिवाय वक्तव्यही केलेले नाही. बलुचिस्तानच्या मुद्द्यावरून पाकिस्तानच्या अडचणी भारत वाढवू शकतो. मात्र, “केवळ या रणनीती आणि निर्णयांच्या जोरावरच सध्या पाकिस्तानला इशारा देण्याचे काम सुरू आहे,” हे मत पाकिस्तानचे माजी राजदूत अब्दुल बासित यांनी व्यक्त केले आहे. “हा भारताचा विजय आहे,” असे म्हणत त्यांनी पाकिस्तानलाच सुनावले. काश्मीर मुद्द्यावर राजकारण करत बसण्यापेक्षा आतातरी किमान स्वतःच्या देशाकडे लक्ष द्यावे, असे त्यांना सुचवायचे असेल.
मात्र, काश्मीर मुद्दा केंद्रस्थानी आणून भारताला नामोहरम करण्याची एकही संधी पाकिस्तानने सोडली नाही.काश्मीर अशांत करण्यामागे कुणाचे हात रक्ताने माखले आहेत, हे सांगण्याची वेगळी गरज नाही. नुकत्याच काश्मिरात झालेल्या हत्या या रचलेला कटच होता हे जवळपास स्पष्ट झाले असून, यामागे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ असल्याचे निष्पन्न झाले आहे. महिनाभरापूर्वीच दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांना बोलावून याबद्दलची योजना आखण्यात आली होती. काश्मिरातील हिंदू, भाजपशी निगडित व्यक्ती, पत्रकार, पोलीस, सुरक्षादल आणि काश्मिरी सरकारी अधिकार्यांची २०० जणांची यादीच या दहशतवाद्यांना देण्यात आली. पाकव्याप्त काश्मीरचा भाग असलेल्या मुजफ्फराबादमध्ये झालेल्या बैठकीत आता काश्मीरबाहेरून आलेल्यांना लक्ष्य करण्याचा कट रचण्यात आला. जेणेकरून स्थानिकांमध्ये जरब बसेल.
हिंदूंना लक्ष्य करून तिथून हुसकावून लावण्याचा पुरेपूर प्रयत्न पाकड्यांनी सुरू केला आहे. या हत्यांद्वारे भारताला लक्ष्य करणे आणि काश्मीरला पुन्हा अशांत करण्याचा प्रयत्न पाकिस्तान सरकारने या बाजूने सुरू केला असला तरीही केंद्रातील मजबूत सरकार असताना पाकचे नापाक मनसुबे यशस्वी होणार नाहीत हे निश्चित. कारण ज्या काश्मिरी हिंदूची हत्या झाली, त्याच्या मुलीने दिलेले आव्हान जर अशा परकीय विघातक शक्तींनी नीट ऐकले असेल तर लक्षात येईल की, हिंसाचार माजवून काश्मिरी जनतेला दडपणे हे आता अशक्यच असेल.