‘हर्बल’ तंबाखूवाले पवार

अग्रलेख - ‘हर्बल’ तंबाखूवाले पवार

    20-Oct-2021
Total Views | 1083

sharad pawar_1  
 
 
 
८० वर्षांचा योद्धा तरुणांनाही लाजवेल इतके परिश्रम केवळ आपल्यासाठी घेतो, हीच शेतकऱ्यां ची भावना होती. पण, शरद पवारांनी आपल्यासाठी किती खस्ता खाव्यात, किती वेळा बांधावर यावे, यालाही काही मर्यादा आहे. म्हणूनच, त्यांनी आता ‘हर्बल’ तंबाखू किंवा ‘एका प्रकारच्या वनस्पती’च्या लागवडीला परवानगी देऊन आपले सेवाकार्य एकदाचे थांबवावे, अशी कल्पना पुढे आली.
 
 
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ‘हर्बल’ तंबाखूच्या लागवडीची परवानगी द्या, अशी मागणी करणारे पत्र ‘रयत क्रांती संघटने’चे अध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लिहिल्याचे मंगळवारी समोर आले. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान याला यंदाच्या जानेवारीत ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो’ने (एनसीबी) ‘ड्रग्ज प्रकरणात’ अटक केली, तेव्हापासून तो तुरुंगातच आहे. तर नुकतीच अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानलाही ‘ड्रग्ज प्रकरणात’ अटक करण्यात आली व तोदेखील कोठडीतच आहे. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी ‘ड्रग्ज’ला मुखवास, बडिशेप, सुपारी वगैरेच्या रांगेत बसवण्याचा प्रयत्न कसोशीने चालवला. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आर्यन खानच्या अटकेत राजकारण, धार्मिक कोन धुंडाळतानाच शिवसेनेने तर त्याच्या सुटकेसाठी थेट न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले. त्याच मालिकेत नवाब मलिक यांनी, “माझ्या जावयाकडे गांजा नव्हे, तर ‘हर्बल’ तंबाखू होती,” असे विधान केले. पवारांनीही त्यानंतर एका पत्रकार परिषदेत, “नवाब मलिक यांच्या जावयाकडे गांजा सापडला नव्हता, ती ‘एक प्रकारची वनस्पती’ होती,” असे म्हणत बचाव केला. त्या पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारचे मार्गदर्शक शरद पवारांना पत्र लिहून ‘हर्बल’ तंबाखूच्या लागवडीसाठी परवानगी देण्याची मागणी केली.
 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अडीच जिल्ह्यापुरता मर्यादित प्रभाव असला, तरी शरद पवारांना ‘जाणते राजे’ म्हणतात. कदाचित गांजा, अफू व ‘एका प्रकारच्या वनस्पती’ची पारख करण्याच्या पवारांच्या जाणतेपणाची पार्श्वभूमीही त्यामागे असू शकते. इतकेच नव्हे, तर शरद पवारांना शेतीचाही अफाट अनुभव आहे, इतरांना काय खाली आणि काय वर उगवते हेदेखील माहिती नसते, अशी टीका करण्यापर्यंत त्यांना शेतीचे प्रगाढ ज्ञान आहे. त्यातूनच शरद पवारांसारख्या शेतकऱ्याने स्वतःचा अफाट विकास करून घेतला. त्यांच्या कन्येने तर दहा एकरांत ११३ कोटींची वांगी पिकवण्याचा पराक्रम केला. त्यामागे नक्कीच शरद पवारांचाच आशीर्वाद असणार. तथापि, महाराष्ट्रातील अन्य शेतकऱ्यां ना शरद पवार वा सुप्रिया सुळेंनी कमी जागेत शेकडो कोटींची वांगी पिकविण्याचा फॉर्म्युला दिलेला नाही. आपण तो फॉर्म्युला दिला आणि शेतकरी मालामाल झाला तर आपल्याला पुन्हा पावसात भिजण्याची, शेतकऱ्यां च्या समस्या मुक्तीसाठी झटण्याची, आपल्या कन्येला-पुतण्याला आणि नातवालाही शेतकऱ्यां साठी काम करण्याची संधी मिळणार नाही, असा सेवाभाव त्यामागे असावा. पण, ५० वर्षे राजकारणात, दहा वर्षे केंद्रीय कृषिमंत्रिपदी, दोन वर्षांपासून महाविकास आघाडीचे कर्ताकरविते राहून शरद पवारांनी शेतकऱ्यां ची प्रचंड सेवा केली. इतकी की, त्यांचा उदात्त सेवाभाव पाहून विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यां नी थेट आत्महत्या केल्या. लवकरात लवकर स्वर्गात, वैकुंठात वा कैलासात जाऊन तिथे शरद पवारांची थोरवी गावी, अशीच कृतज्ञतेची भावना त्यामागे असावी.
 
 
सोबतच महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील शेतकऱ्यावर ‘निसर्ग’, ‘तोक्ते’, ‘गुलाब’ चक्रीवादळ, अतिवृष्टी-महापुराचे संकट कोसळले. पण, या संकटातही शरद पवार खंबीरपणे शेतकऱ्यां च्या पाठीशी उभे राहिले, त्यांना धीर देण्यासाठी शेतकऱ्यां च्या बांधापर्यंत पोहोचले. तसेच आपल्याच ताब्यातील राज्य सरकारला संकटग्रस्त शेतकऱ्यां ना पंचनाम्याशिवाय तातडीने एकरी ५० हजारांच्या मदतीचे आदेशही त्यांनी दिले. आपल्याविषयीची शरद पवारांच्या मनातली तळमळ, कळकळ पाहून राज्यातील शेतकऱ्यां च्या डोळ्यांतूनही अश्रू ओघळू लागले. त्यामागे 80 वर्षांचा योद्धा तरुणांनाही लाजवेल इतके परिश्रम केवळ आपल्यासाठी घेतो, हीच शेतकऱ्यां ची भावना होती. पण, शरद पवारांनी आपल्यासाठी किती खस्ता खाव्यात, किती त्रास घ्यावा, किती वेळा बांधावर यावे, यालाही काही मर्यादा आहे. म्हणूनच, शरद पवारांनी आता ‘हर्बल’ तंबाखू किंवा ‘एका प्रकारच्या वनस्पती’च्या लागवडीला परवानगी देऊन आपले सेवाकार्य एकदाचे थांबवावे, अशी कल्पना पुढे आली. सदाभाऊ खोत यांनी तीच कल्पना आपल्या पत्राच्या माध्यमातून शरद पवारांपुढे मांडली. अर्थातच, शेतकऱ्याचे नाव येताच कमालीचे कनवाळू होणारे ‘हर्बल’ तंबाखूवाले पवारांसारखे ‘जाणते राजे’ त्यांची मागणी नक्कीच मान्य करतील. कारण, प्रश्न बेरजेच्या राजकारणाचा, फोडाफोडीचा, लावालावीचा, सहकारी साखर कारखाने वा बँकांवर ताबा मिळवण्याचा नाही, तर स्वतः शरद पवार वर्षानुवर्षे सत्तेच्या राजकारणात असतानाही रंजलेल्या-गांजलेल्या शेतकऱ्यां च्या हिताचा आहे.
 
 
आता शरद पवारांनी कसलाही विलंब न करता कामाला लागले पाहिजे. जागतिक कीर्तीचे शेतीतज्ज्ञ, वनस्पतीतज्ज्ञ असलेल्या पवारांनी लवकरात लवकर ‘हर्बल’ तंबाखूचे बी-बियाणे शेतकऱ्यां ना उपलब्ध करून द्यायला हवे, म्हणजे शेतकरी त्याची पेरणी करू शकेल. तसेच ‘हर्बल’ तंबाखू लागवडीचे, किती वेळा पाणी द्यायचे, रोग-कीड नियंत्रणाचे, कापणीचे, प्रशिक्षण कार्यक्रमही ठिकठिकाणच्या कृषिसेवा केंद्रातून सुरू करायला हवेत, म्हणजे शेतकऱ्याला शास्त्रीय माहिती मिळेल. सोबतच शेतकऱ्यां ना शेतीसाठी शेवटचे अनुदानही द्यावे, कारण ‘हर्बल’ तंबाखूच्या उत्पादनाने तमाम शेतकरी नवाब मलिकांच्या जावयाइतकाच श्रीमंत, समृद्ध होईल. म्हणजे पुन्हा राज्य सरकारवर शेतकऱ्यां ना अनुदान, कर्जमाफी, नुकसानभरपाई वगैरे देण्याची वेळच येणार नाही. महत्त्वाचे म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचेही, शेतकऱ्याला चिंतामुक्त करण्याचे ध्येय असून, ते साध्य करण्याची हीच ती वेळ आहे आणि शरद पवारांनी त्यात लक्ष घातले तरच ती प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पवारांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांत,खासगी बाजारातही ‘हर्बल’ तंबाखूच्या खरेदीची, परदेशात निर्यातीची व्यवस्था तयार करावी, जेणेकरून शेतकऱ्यां च्या ‘हर्बल’ तंबाखूला अधिकाधिक भाव मिळेल व शरद पवारांचे शेतकऱ्यां च्या उन्नतीचे लक्ष्य साकार होईल. इतकेच नव्हे, तर ‘हर्बल’ तंबाखूचे वितरण राज्यातील शिधावाटप केंद्रावरूनही करावे, म्हणजे राज्यातील उर्वरित जनताही त्याच्या लाभापासून वंचित राहणार नाही. मऊ मनाचे आणि शेतकऱ्यां चे आधारवड शरद पवार ही मागणी नक्कीच मान्य करतील आणि शेतकऱ्याला समृद्ध करतील, असे वाटते.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121