डोंबिवली (जान्हवी मोर्ये) : सांस्कृतिक शहरांपैकी एक म्हणून ओळख असणार्या कल्याण-डोंबिवलीमध्ये खड्डे, पाणी, वीज, कचरा, वाहतूककोंडी, महिला सुरक्षा आदी वर्षानुवर्षांच्या मूलभूत समस्या आजतागायत ‘जैसे थे’ असल्याची स्थिती आहे. याठिकाणी महापालिकेत जवळपास गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, भेडसावणार्या समस्यांची स्थिती ‘जैसे थे’ असल्याने नागरिक आता चांगलेच संतप्त झाले आहेत. २५ वर्षे सत्ता असून काय केले, असा थेट सवाल आता नागरिक सत्ताधार्यांना विचारू लागले आहेत.
नगरसेवकांचा कालावधी संपल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. पण, सर्वसामान्य नागरिकांना आपल्या मूलभूत हक्कांसाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. या समस्या सोडविण्यासाठी सत्ताधारी शिवसेना आणि महापालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिक आणि विरोधकांकडून करण्यात येत आहे.
१९८३ साली कल्याण-डोंबिवली महापालिकेची स्थापना झाली. तेव्हापासून ते आत्तापर्यंत काही कालवधी वगळता कल्याण डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक शिवसेनेचीच सत्ता होती. कल्याण-डोंबिवली हा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांपैकी एक मानला जातो. पण, इतके वर्षे सत्तेत राहिल्यानंतरही पालिकेतील सत्ताधारी याठिकाणी उत्तम रस्ते तयार करण्यात अपयशी ठरल्याची टीका होत आहे. आजघडीला कल्याण- डोंबिवलीत एकही रस्ता खड्डेमुक्त दिसत नाही. खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि प्रवाशांना नाहक त्रस सहन करावा लागतो. यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो आणि शहरात मोठी वाहतूककोंडी निर्माण होते.
शहरात सिग्नल यंत्रणाही योग्यरीत्या चालत नाही. रिक्षाचालकांच्या मुजोरीचा प्रश्न येथे कायम आहे. अनेकदा रिक्षाचालक अरेरावी करत प्रवाशांना भाडे सरार्सपणे नाकारतात. कोरोना काळात सामाजिक अंतर राखण्यासाठी रिक्षातून केवळ दोनच प्रवाशांना परवानगी देण्यात आली होती. प्रवासीसंख्या कमी झाल्याने रिक्षाचालकांकडून दुप्पट भाडे आकारणी करण्यास सुरुवात झाली. मात्र, आता दोनच्या ऐवजी तीन प्रवासी रिक्षातून प्रवास करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, असे असतानाही प्रवासी भाडे काही घटलेले नाही. याबाबत प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचे वातावरण आहे.
आधारवाडी ‘डम्पिंग ग्राऊंड’ बंद केल्याचा दावा कडोंमपाने केला आहे. मात्र, कचर्याची समस्या शहरात कायम आहे. शहरात सर्वत्र कचर्याचा ढीग दिसून येतो. केवळ कचराच नव्हे तर शहरात अपुरा आणि अस्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याचीही ओरड नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरात बत्तीगुल होण्याच्या विजेच्या समस्येचे काही केल्या निराकरण होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शहरात सध्या वाढत्या गुन्हेगारीचे सत्र सुरू आहे. २५ वर्षे सत्ता असून काय केले? महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. विविध समस्या शहरात गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या असल्याने कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये सध्या सत्ताधार्यांविरोधात नाराजीचा सूर दिसून येत आहे.
हे अपयश प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाचे
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासक म्हणून आयुक्त काम करीत आहे. डोंबिवली शहरात आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. हे आयुक्तांना वारंवार सांगितले आहे. पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर खड्डे भरण्याची प्रक्रिया झाली पाहिजे, ही मानसिकता असणे गरजेचे आहे. रस्त्यांच्या कामात फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. नागरिकांच्या पैशांची वाट लावली जाते. सगळे रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणातूनच झाले पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे. संपूर्ण कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत कचरा समस्या गंभीर आहे. कचर्याचे ढीग तयार होत आहेत. महापालिकेने उपकर विधी लावला, हे अत्यंत वाईट आहे. कचरा पूर्णपणे उचलला गेला पाहिजे. त्याचबरोबर शास्त्रशुद्ध पध्दतीने विघटन होताना दिसून येत नाही. हे अपयश प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाचे आहे.
- रवींद्र चव्हाण, आमदार, भाजप
‘शिवसेना स्टाईल’ने काय करायचे ते बघू!
दिवाळीनंतर रस्त्यांच्या कामाला गती येणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रस्त्यांच्या कामासाठी ३६० कोटी, ‘एमआयडीसी’साठी ११० कोटी रूपये मंजूर करून घेतले आहे. पाऊस थांबला की, रस्त्याचे काम सुरू करणार आहे. येत्या वर्षभरात नागरिकांना चांगले रस्ते मिळतील. नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवावा, त्यांची इच्छा पूर्ण होईल. कचरा वर्गीकरण करीत आहे. सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. ‘शून्य कचरा’ नियमन होईल, असा प्रयत्न आहे. रिक्षाचालकांविषयी तक्रार असल्यास नागरिकांनी शिवसेनेकडे किंवा ‘आरटीओ’कडे करावी. आम्ही ‘शिवसेना स्टाईल’ने काय करायचे ते बघू!
- राजेश मोरे, शहरप्रमुख, शिवसेना
शहरात सध्या अनेक ठिकाणी कचर्याचे साम्राज्य
नांदिवली परिसरात थोडासा पाऊस पडला तरी पाणी भरते. जीव मुठीत घेऊन पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागते. दत्तमंदिर चौकातून रिक्षाचालक नांदिवलीपर्यंत येण्यास भाडे नाकारतात. शहरात सध्या अनेक ठिकाणी कचर्याचे साम्राज्य पसरलेले दिसते.
- भारती ताम्हणकर, नागरिक
कचरा वर्गीकरण झाले आहे. पण कचरा गाडी वेळेवर येत नाही. शहरात सगळीकडे कचरा पसरलेला दिसतो. रेल्वेस्थानकातून बाहेर पडल्यावर रिक्षा रस्त्यावर बेशिस्तपणे उभ्या असतात. शहरात अनेक ठिकाणी गटारांची झाकणे तुटलेल्या अवस्थेत आहेत. पालिका प्रशासनाकडून नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या जात नाहीत. विजेची देयके ग्राहकांना वेळेवर मिळत नाही. काही ग्राहकांना देयके मुदत संपल्यावर मिळतात. प्रशासनाच्या हलगर्जीमुळे ग्राहकांना नाहक दंड सोसावा लागतो.
- सुरेश देशपांडे, नागरिक
डोंबिवलीत रस्त्यांवरील खड्डे ही प्रमुख समस्या आहे. कचरा कर महापालिकेने लावला आहे. मात्र, तरीही शहरात स्वच्छता दिसत नाही. कचर्यांचा ढीग सर्वत्र दिसून येतो. रिक्षा शेअर भाड्याबाबत एक निर्णय होण्याची गरज आहे. काही विशिष्ट भागात वाहतूककोंडी आहे, असे कारण सांगून भाडे नाकारतात. रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यात अनेकदा वाद होतानाही दिसून येतात. यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे.
- दीपाली काळे, नागरिक
सत्ताधारी पक्षाने प्रभागाची काळजी घेण्याची गरज
शास्त्रीनगर प्रभागातील कचराकुंडी काढून त्याठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे. काही ठिकाणी ‘ओपन जिम’ आणि ज्येष्ठ नागरिक कट्टा बनविला आहे. कचरा घंटागाडीसाठी वेळ ठरवून दिली आहे. तो चार्ट नागरिकांना दिला. त्या वेळेत नागरिकांनी कचरा घंटागाडीत द्यावे हे सांगितले. एकच कचराकुंडी राहिली आहे. पाच ते सहा कचरा कुंड्या हटविल्या आहेत. लगेचच घंटागाड्याची वेळ लावून दिली. त्यामुळे प्रभागात कचरा नसतो. सत्ताधारी पक्षाने प्रभागाची काळजी घेण्याची गरज आहे.
- रणजित जोशी, माजी नगरसेवक, भाजप