मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव घेऊन खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मालाड मालवणी पोलीसांनी तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले तिघेही मराठी चित्रपट सृष्टीतील आहेत. या संदर्भात एक व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओत एक महिला राज ठाकरेंचे नाव घेत सुरक्षारक्षकाला मारहाण करताना दिसत आहे. "राज साहेबांना तू ओळखत नाहीस का? काम कोणासाठी करतोस आणि महाराष्ट्रात, मुंबईत कसा राहतोस?", असा प्रश्न त्यांनी विचारत कानशीलात लगावली. या प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तिघांनाही अटक झाली आहे. दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माता युवराज बोऱ्हाडे आणि चालक सागर सोलनकर यांचा आदींचा सामावेश आहे, मालवणी पोलीसांनी याबद्दल माहिती दिली आहे.
मालवणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनुराग दिक्षित यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, "दयानंदा या व्यक्तीने तक्रार दाखल केली असून १५ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल करुन आयपीसी कलम 452, 385, 323, 504, 507 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात तीन जणांना अटक झाली आहे. तर संबंधित महिलेलाही पोलीसांनी नोटीस बजावली आहे. दरम्यान या प्रकरणावर मनसेतर्फे कुठलीही प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही.