बहुआयामी ‘उमेदी’ उमेश

बहुआयामी ‘उमेदी’ उमेश

    14-Oct-2021   
Total Views | 77

Sutar _1  H x W



शेतीप्रधान महाराष्ट्रात पूर्वी खेडेगावांमध्ये वस्तु-विनिमय पद्धत अस्तित्वात होती. म्हणजे शेतकरी हा धान्य पिकवत असे आणि जे शेतकरी नव्हते ते शेतकर्‍यांच्या नैमित्तिक स्वरूपाच्या गरजा पुरवत त्यांना ‘अलुतेदार’ (नारू) म्हटले जाई. जे गरजा भागवत त्यांना ‘बलुतेदार’ (कारू) असे म्हणत.
 
 
अशाच बारा बलुतेदारांपैकी एक असलेल्या उमेश मारूती सुतार याचा जन्म बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या नाशिक शहरातील पंचवटी-गंगापूर रोडवरील गाडगेबाबा मठात १९७३ मध्ये झाला. याच पुण्यनगरीत उमेशची बालपणीची दोन वर्षे गेली. त्यानंतर काही कारणास्तव उमेशचा संपूर्ण परिवार त्यांच्या मूळ गावी म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यानजीक तुपूरवाडी येथे स्थायिक झाल्याने तिथेच त्याचे पाचवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण आणि ग्रामीण पद्धतीनेच संगोपन झाले. पण म्हणतात ना, ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात !’ अगदी तसेच उमेशचे आजोब आप्पा सिद्राम सुतार यांचा पंचक्रोशीत सुतारकी व लोहारकीचा व्यवसाय होता...
 
 
आप्पांचीच कला आनुवंशिकतेने म्हणा किंवा परंपरेने उमेशच्या अंगी रुजली. वयाच्या बाराव्या वर्षीच उमेशने आजोबांकडील सर्व कला आत्मसात केल्या. शिक्षण आणि खेळाचे वय असताना किंबहुना, घरात अठरा विश्वे दारिद्य्र असताना मोठ्या जिद्दीने सुतारकी व लोहारकीसोबतच मूर्ती व नक्षीकामात आणि वादनकलेत उमेश पारंगत झाला. तसेच, आजोबांसोबत गावोगावी हिंडून मिळेल ती कामे आवडीने करू लागला. अचानक आजोबांचे देहावसान झाल्याने कुटुंब उघड्यावर पडले. एकत्र कुटुंबपद्धतीमुळे खाणारी माणसे अधिक असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावू लागला. तीन बहिणींचा भारही डोक्यावर होता. तेव्हा, गाव सोडून उमेश कुटुंबासमवेत मुंबईच्या आश्रयाला आला. आधी वरळी नंतर भांडुपमध्ये भाड्याच्या खोलीत राहून कसेबसे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. वडिलांची कंपनी बंद पडल्याने इच्छा असूनही पुढील शिक्षण घेता आले नसल्याची खंत उमेश व्यक्त करतो.
 
 
अंगभूत कला असतील, तर मुंबईत कुणीही उपाशी राहत नाही, त्याचा प्रत्यय उमेशलाही आला. त्याने आई-वडिलांच्या सोबतीने सुतारकाम, रंगकाम आणि मूर्ती रंगकामाला जुंपून घेतले. तेव्हाही झाडुकाम, हमालीसारखी छोटीमोठी कामे करण्यात कधी कमीपणा वाटू दिला नाही. अगदी नाक्यावर उभा राहून रोजंदारीचे नाका कामगाराचेही काम केले. त्यानंतर कामाचा ओघ वाढत गेल्याने उमेशच्या कुटुंबाने ठाण्यातील कळवा, विटावा येथे स्वतःचे घरकुल उभारले. भावंडासह उमेशचेही दोनाचे चार हात झाले. संसाराचा गाडा रुळावर येत होता. वंश परंपरेने हाती आलेल्या ज्या कलेने बरकत आणली, त्या कलेचा लौकिक कधीही कमी होऊ द्यायचा नाही, या भावनेने बालपणापासून हाती धरलेला कुंचला त्याने आजतागायत सोडलेला नाही. चित्रकला, रांगोळीची आवड असल्याने १९९१ ते १९९६ या काळात ठाणे-मुंबईतील नामवंत कलाकारांकडून रंगावलीचे प्रशिक्षण घेतले. उमेश सांगत होता.
 
 
उमेशच्या संसारवेलीवर दोन कळ्या उमलल्या असून त्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. उमेशच्या कलेचा दिंडोरा सर्वत्र पिटला जाऊ लागला. वडिलांच्या ओळखीतून एका खासगी कंपनीत कंत्राटी कर्मचारी म्हणून रंगकाम क्षेत्रातच काम करण्याची संधी लाभली. आठ वर्षांच्या नोकरीत कित्येक चांगले अनुभव आणि संधीही चालून आल्याने नोकरी सोडून स्वतंत्र कलाकार म्हणून उमेश उभा ठाकला. कलाक्षेत्रातील अनेक नामवंतांच्या सान्निध्यात कलेचे विविध प्रांत पादाक्रांत करीत त्याने स्वतःचा नावलौकिक वाढवला. कोणतेही महाविद्यालयीन शिक्षण न घेता उमेशने सुतारकाम, रंगारी, साईन बोर्ड, स्ट्रीट आर्टिस्ट, कॅनव्हास पेंटिंग, कॅलिग्राफी, उत्कृष्ट रांगोळीकार, हस्तकला, मेकअप, मेहंदी, वादन, वेशभूषा, नकलाकार, मॅनेजमेंट गुरू, सिव्हील कॉन्ट्रॅक्टर, इंटेरिअर डेकोरेटर आदी अनेक कला आत्मसात केल्या आहेत.
 
 
या माध्यमातून काही शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्येही त्याला काम करण्याची संधी मिळाली. सध्या अनेक ठिकाणी तो रांगोळी प्रदर्शनांसह नवोदित कलाकारांसाठी शिकवण्या व कार्यशाळेचे आयोजन करतो. खडू, कोळसा गिरवून रस्त्यावर काढलेल्या चित्तवेधक रांगोळ्या ते धान्य तसेच तत्सम पदार्थांच्या रांगोळीतून हुबेहूब चितारलेले महापुरुष, राजकारणी, गायक, सिने-नाट्य कलाकार नेहमीच रसिकांच्या पसंतीस उतरल्याचे उमेश नमूद करतो. याशिवाय रंगावली प्रदर्शनात विविध समस्यांवर भाष्य करणारे चित्रणही लक्षवेधी असते.
 
 
रांगोळी स्पर्धेत अनेक पारितोषिकांचा धनी ठरणार्‍या उमेशने महाराष्ट्र तसेच राज्याबाहेरही राज्यस्तरीय-जिल्हास्तरीय अनेक पुरस्कार पटकावले आहेत. २०१३ साली ठाणे महापालिकेचा ‘ठाणे गुणिजन पुरस्कार’, पुण्यात ‘समाजभुषण पुरस्कार’, राज्यस्तरीय ‘कलारत्न पुरस्कार’, ‘आर्ट फाऊंडेशन’ परभणी यांच्या कांस्यपदकावरही आपले नाव कोरले. अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये परीक्षणाची जबाबदारी पेलणार्‍या उमेशला अजूनही शिकण्याची अन् शिकवण्याची उमेद आहे. यासाठी त्याने ३० ते ३५ कलाकारांचा समूह असलेले कलाछंद रांगोळीकार मंडळ व ‘वेदान्त रांगोळी आर्ट क्लासेस’ या संस्थांची स्थापना केली आहे.
 
 
कोरोना काळात सर्वच ठप्प झाल्याने कलाकारांचीही उपासमार झाली. तरीही डगमगून न जाता सहकारी कलाकार ना उमेद होऊ नयेत, याकरिता कलाविषयक ‘ऑनलाईन’ स्पर्धा व कार्यशाळांचे आयोजन करून अनेकांना त्याने उपजिविकेचा मार्ग दाखवला. राजकारणापेक्षा समाजकारणात रस असलेला उमेश, शिक्षण पदरी नसले, तरी एखादी तरी कला आत्मसात करा, जगात तुम्हाला कुणीही हिणवू शकणार नाही, असा सल्ला तरुणाईला देतो.
 
 
कलाकार हा कुठल्या जातीचा वा पक्षाचा नसतो. कला हेच त्याचे सर्वस्व असते. मात्र, सरकारदरबारी कलेची व कलाकारांची दखलच घेतली जात नसल्याची खंत तो व्यक्त करतो. तसेच, शासनाने उतारवयातील कलाकारांना पेन्शन वा मानधन देण्याची अपेक्षाही तो बोलून दाखवतो. अशा या बहुआयामी ऊर्जस्वी कलाकाराला दै. ‘मुंबई तरुण भारत’ कडून शुभेच्छा !


दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121