डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी मिलापनगर परिसरातील कावेरी चौक येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून आज शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाली. रस्त्याच्या कामाकाजबाबत जाब विचारला असता शिवसेना कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा राष्ट्रवादीनी आरोप केला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
डोंबिवली एमआयडीसी परिसरात रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. गुरूवारी दुपारच्या सुमारास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी गेले असता नागरिकांनी निकृष्ट दर्जाचे काम असल्याचा आरोप केला. परिसरातील नागरिक आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू होता. हा वाद सुरू असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यात पडले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. थोडयाच वेळेत त्या वादांचे रुपांतरण हाणामारीत झाले. रस्त्याचे काम निकृष्ट आहे. त्याबाबत जाब विचारल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी आम्हाला मारहाण केली आहे असा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस तेजस पाटील यांनी केला आहे.
तसेच हा वाद राजकीय वैमनस्यातून झाला आहे. राष्ट्रवादीच्या पाच ते सहा जणांना गंभीर दुखापत झाली आहे. 30 ते 35 जणांनी मारहाण केली आहे. याबाबत आता आम्ही तक्रार देत आहोत, असे ही पाटील यांनी सांगितले. युवा सेनेचे जिल्हा समन्वयक योगेश म्हात्रे यांनी रस्त्याचे काम सुरू असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला असता आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना महापालिकेत जाऊन विचारा असा सांगितले. त्याचाच राग मनात येऊन त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांनी मारहाण केली. नागरिकसुध्दा आमच्याच परिसरातील आहे.
कल्याणच्या रस्त्याचे काय करायचे? 27 कोटीच्या कामाचे काय करायचे हे तो विचारत होता. शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वाद नाही असे ही योगेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान शिवसेनाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून घेतला जात नसल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्यांचे नातेवाईक यांनी मानपाडा पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या दिला आहे. पोलिस त्यांच्याशी संवाद साधत आहे.