मुंबई: महाविकास आघाडीच्या कुकृत्याचं, कारभाराचा आणि भ्रष्टाचार याविषयी एक पेपर काढून आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील सरकार याबद्दल बदनामीचा कट सुनियोजितपणे तिन्ही पक्ष एकत्र कसे रचत आहेत याचा भांडाफोड आम्ही जनतेसमोर करणार आहोत. आपल्या खोट्या कल्पनांवर स्वतःच्या विजयाची गुढी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तो सफल होऊ शकत नाही. महाराष्ट्रातली जनता त्याला थारा देऊ शकत नाही. महाराष्ट्रातील जनतेला जी मदत सेवासुविधा आवश्यक आहेत, विकास करू शकत नाहीत, शेतकऱ्याला काहीही मिळत नाही, विद्यार्थ्याला मिळत नाही, बारा बलुतेदारांचा मिळत नाही, आमच्या दलित समाजाच्या बंधू-भगिनींना मिळत नाही, मराठा समाजाला मिळत नाही, म्हणून आम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या हक्कासाठी आंदोलनाची रुपरेषा सुध्दा आज आम्ही ठरवली आहे. येणाऱ्या काळात आम्ही सत्ताधारी आघाडीला सळो की पळो करुन सोडू, अशी माहिती भाजपाच्या कोअर कमिटी बैठकी नंतर भाजप नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी माध्यमांना दिली.
ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या कोअर कमिटीची बैठक आज आमच्या केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत झाली. केंद्रीय प्रभारी सि.टी रवी, पक्षाचे केंद्रीय संघटन मंत्री शुक्लाजी, सह प्रभारी पवय्या, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बैठक झाली. त्यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, संघ मंत्री श्रीकांत भारतीय, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि सर्व सदस्य उपस्थित होते.
राज्याच्या भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा आणि लेखाजोखा आज आम्ही घेतला. अतिशय नम्रतेने आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे राज्यातील ९७ हजार ३१५ बुथपैकी ९२ हजार ८९१ बुथपर्यंतची रचना लागलेली आहे. एक बुथ प्रमुख आणि बरोबर समिती अशी याची संपूर्ण रचना आहे. आज अतिशय विनम्रतेने हे सांगावंसं वाटतं की, संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष चांदा ते बांदा काम करतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत आहे. सत्तेत असलेले तीन पक्ष हे काही विभागत असलेले पक्ष असुन कोणी पुणे, मुंबई तर कोणी रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये काही पक्ष पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागापुरते मर्यादित आहेत. आघाडीतील एक पक्ष जीथे आहे तिथे दुसरा नाही. काही ठिकाणी त्यांचे आपापसात मारामारी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्णपणे केवळ भारतीय जनता पक्षाच्या बुथ ते विधानसभेपर्यंतची रचना आम्ही पूर्ण करू शकलो. त्याचा लेखाजोखा या बैठकीत आम्ही घेतला. बरोबरीने येणाऱ्या नोव्हेंबर ते मार्च दरम्यान आमच्या कल्पने नुसार महाराष्ट्रात एका अर्थाने मिनी विधानसभेच्या निवडणुका होतील. जवळजवळ २७४ नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, खरेदी-विक्री संघाच्या, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत . त्यामुळे त्यांची पूर्ण रचना आम्ही केली असून, शत-प्रतिशत भाजपा हाच आमचा नारा आहे. तिघाडीतील तिघांनी मिळून यावे, आपापसात पायात पाय घालून यावे, या निवडणूका जिंकण्यासाठीच्या तयारीला आम्ही लागलो आहोत. त्यासाठी आवश्यक व्यक्ती, परिवार, संघटना याबाबतच्या योजना आमच्या तयार आहेत. दिवाळीच्या नंतर एक चिंतन बैठक आमची होईल,अशी माहिती अँड आशिष शेलार यांनी दिली.
कारण आमच्या संपर्कात आजही काही लोक, परिवार, स्थानिक नेतृत्व आहेत. आजच त्याबाबत अधिक बोलता येणार नाही पण मा.देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे पदाधिकारी यांचे दौरे आणि प्रवास आता सुरू होतील. निवडणूका जिंकण्यासाठीचा आराखडा तयार झाला आहे. येणाऱ्या काळामध्ये जानेवारी ते डिसेंबर या महिन्यांमध्ये जवळजवळ १५ विधानपरिषदेच्या निवडणुकांमधील सुद्धा आमच्या ताकदीच्या आधारावर अधिकचे यश मिळेल, याचे राजकीय विश्लेषण सुध्दा आम्ही केले. दरम्यान, भाजप कडून एका परिवाराला टार्गेट जात आहे असा राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलीक यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करुन चोर मचाए शोर, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.