जगातील प्रत्येक औषधशास्त्र असू द्या जसे होमियोपॅथी, होमियोपॅथी आणि राजमान्यता आयुर्वेद व अॅलोपॅथी, या सर्व शास्त्रांची जशी बलस्थाने आहेत, तशीच कमकुवत स्थानेही आहेत. पण, त्यामुळे कुठलीही पॅथी कमी दर्जाची गणली जाऊ शकत नाही.होमियोपॅथीला राजाश्रय मिळणे फार गरजेचे आहे. कारण, त्यामुळेच ही अद्भुत औषधप्रणाली घराघरात पोहोचेल.
सर्वप्रथम होमियोपॅथीसाठी वेगळी प्रवेश परीक्षा घेण्यात आली पाहिजे, म्हणजे अॅलोपॅथीला प्रवेश नाही मिळाला म्हणून होमियोपॅथीला प्रवेश घेणार्या मुलांपेक्षा; ज्यांना खरोखरच होमियोपॅथीला प्रवेश घ्यायचा आहे, तेच विद्यार्थी या प्रवेश परीक्षेला बसतील, जेणेकरून होमियोपॅथीला दुय्यम स्थान मिळणार नाही.सर्व सरकारी, निमसरकारी व सर्व शहरनिहाय, जिल्हानिहाय हॉस्पिटल व दवाखान्यांत होमियोपॅथीच्या उपचारांसाठी परवानगी द्यावी. सर्वत्र ‘गव्हर्मेंट ओपीडी’ चालू करावी. ज्यात सर्व आजारांसाठी होमियोपॅथीचे उपचार घेण्याची सुविधा व पर्याय लोकांना देण्यात यावेत.कित्येक होमियोपॅथी औषधे ही जगातील आपत्कालीन स्थितीत (इमर्जन्सी यूज) अतिशय उपयुक्त ठरतात. असे असताना सर्व इस्पितळांमध्ये होमियोपॅथीची औषधे अतिदक्षता विभाग व अपघात विभागांमध्ये वापरण्याची परवानगी सरकारने सर्व हॉस्पिटल्सना द्यावी.देशभरात सर्वाधिक होमियोपॅथीची महाविद्यालये असूनही होमियोपॅथीच्या डॉक्टरांना अजूनही सर्व सरकारी व निमसरकारी तसेच महापालिकेच्या दवाखान्यांत व रुग्णालयांत होमियोपॅथिक डॉक्टरांना नोकर्या दिल्या जात नाहीत.
सर्व विषय अॅलोपॅथीप्रमाणे शिकूनही तसेच होमियोपॅथीचे जास्त विषय शिकूनही होमियोपॅथिक डॉक्टरांना सरकार दरबारी मात्र निराशाच पदरी पडते. अजूनही हा सापत्न भाव दिसून येतो. काही हॉस्पिटल्समध्येही अॅलोपॅथीच्या डॉक्टरांना जास्त पगार व होमियोपॅथीच्या डॉक्टरांना कमी पगार देण्यात येतो. एवढेच कशाला, पण ‘कोविड-१९’च्या लढाईत अॅलोपॅथीक डॉक्टरांबरोबरीनेच कित्येक होमियोपॅथीक डॉक्टरांनी ‘कोविड सेंटर्स’मध्ये कामे केली, पण तरीही त्यांना पगार मात्र कमीच दिला गेला. हा होमियोपॅथीला दिला गेलेला कमीपणा आहे. होमियोपॅथीक औषध प्रणाली इतकी शतके तर अबाधितपणे पुढे जाऊन व यशस्वीरित्या वाटचाल करत असेल, तर फक्त होमियोपॅथीला मिळालेल्या प्रचंड लोकाश्रयामुळे लाखो-कोट्यवधी रूग्ण होमियोपॅथीमुळे निरोगी आयुष्य जगत आहे. परंतु, आता या लोकाश्रयाला राजाश्रयसुद्धा मिळायला हवा. होमियोपॅथीच्या औषधांवर राजमुद्रासुद्धा उमटायला हवी.
होमियोपॅथीच्या उपचारांना सर्व सरकारी योजना व विमा योजना व ‘मेडिक्लेम’ यांसारख्या योजनांमध्ये समाविष्ट करायला हवे. होमियोपॅथीसाठी सरकारी हॉस्पिटल्स उपलब्ध करून द्यायला हवीत. जेथे खासकरून फक्त होमियोपॅथिक उपचारच केले जातील. यासाठी आयुष्य मंत्रालयाने पुढाकार घेतला, तर हे शक्य होऊ शकते. सर्वसामान्य लोकांना रोगमुक्त होण्याचा स्वस्त व खात्रिशीर मार्ग उपलब्ध होऊ शकतो.
- डॉ. मंदार पाटकर
- होमियोपॅथी आणि राजमान्यता
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)