“जम्मू-काश्मीर आणि लडाख हा संपूर्णपणे भारताचा अविभाज्य भाग आहे, तो कायम भारतातच राहील,” असे पाकिस्तानला संयुक्त राष्ट्राच्या महासभेत ठणकावून सांगणार्या ‘आयएफएस’ अधिकारी स्नेहा दुबेंना एव्हाना भारतातील प्रत्येक जण ओळखू लागला आहे. त्यांनी आमच्या मनातल्या भावना अगदी योग्य शब्दांत बोलून दाखविल्या, तर त्यांचे अभिनंदन व्हायलाच हवे, अशा देशवासीयांचा भावना.
संयुक्त राष्ट्रात महासभेचे ७६वे सत्र सुरू होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या संबोधनासाठी त्यांच्या भाषणाची चित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी काश्मीरच्या मुद्द्याचा विसर पडेल ते पाक पंतप्रधान कसले! भारताविरोधात गरळ ओकण्याची संधी इथेही त्यांनी सोडली नाही. प्रसारमाध्यमे दिसली की, केवळ संघ आणि भाजपविरोधात तुटून पडायचे ही सवयच इमरान खान यांना लागली असावी, ती या आंतरराष्ट्रीय मंचावरूनही दिसली.
‘इस्लामोफोबिया’द्वारे भारतात प्रपोगंडा राबविला जात आहे. भारताने बेकायदेशीररीत्या ५ ऑगस्ट, २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरमधून ‘३७० कलम’ हटवले. काश्मिरी नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले. आंतरराष्ट्रीय माध्यमांवरही बंदी आणण्यात आली. १३ हजार काश्मिरींना स्थानबद्ध करण्यात आले. काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन झाले. मुस्लीम बहुसंख्य असणार्या जागांवर त्यांना अल्पसंख्याक करण्यात आले. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे काश्मीरमध्ये उल्लंघन झाले, असे धडधडीत खोटे आणि नेहमीचेच बिनबुडाचे आरोप करणारे भाषण खान यांनी केले.
इतकी गरळ ओकल्यावर आता उत्तर देण्याच्या अधिकारादाखल भारताची वेळ होती. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या प्रथम सचिव अधिकारी स्नेहा दुबे यांनी संयुक्त राष्ट्राची महासभा दणाणून सोडली. संयुक्त राष्ट्रातील झालेल्या प्रत्येकाचे भाषण युट्यूब आणि अन्य सोशल मीडिया साईट्सवर उपलब्ध आहे. इतर कुठल्याही भाषणापेक्षा भारतकन्येचे हे खणखणीत भाषण सोशल मीडियावरही गाजले. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय माध्यमांमध्ये त्याची दखल घेण्यात आली. हे भाषण युट्यूबवर आतापर्यंत ‘युएन’च्या आकडेवारीनुसार, ३० लाखांहून अधिक जणांनी पाहिले आहे.
पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडताना दुबे यांनी जराही दयामाया दाखविली नाही, तशी दया दाखविण्याची गरजही नाहीच म्हणा. भारताच्या नंदनवनावर असलेल्या बेकायदेशीर कब्जा, आपल्या कुशीत पोसत असलेले क्रूरकर्मे दहशतवादी, पाकिस्तानातील अल्पसंख्याकांवर होणार्या अन्याय-अत्याचाराचा पाढाच वाचून दाखविताना एक एक गोष्ट बारकाईने सांगितली. भारताची बाजू लावून धरलीच; पण त्यावेळी इमरान खान यांच्या धडधडीत खोट्या मुद्द्यांचा फडशाच त्यांनी पाडला. एका अर्थाने सीमावर्ती भागांमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया आणि इमरान खानच्या डोळ्यात
खुपणार्या आपल्या देशातील हिंदुत्ववादी सरकारच्या दृष्टीने गरजेचाच होता.
पाकिस्तानचे असे मुद्दे खोडून काढण्यासाठी भारताने फार पूर्वीच एक तरतूद करून ठेवली आहे. भारताचे राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांच्या कार्यकाळात हा निर्णय घेण्यात आला होता. पाकिस्तानच्या कुठल्याही मोठ्या नेत्याने संयुक्त राष्ट्रात अशी वक्तव्ये केली की, त्याला उत्तर भारताचे युवा डिप्लोमॅट्स चोख प्रत्युत्तर देतील.
“ ‘संयुक्त राष्ट्र संघा’ने दिलेल्या मंचाचा अशाप्रकारे चुकीचा वापर करण्याची पाकिस्तानची जुनीच परंपरा आहे. त्यांच्या देशात मुक्तसंचार करणारे दहशतवाद्यांचे काय, त्यांना आश्रय देणार्यांचे काय?,” असा प्रश्न दुबे यांनी विचारला. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना आर्थिक पाठबळ पुरवणे यासाठी पाकिस्तान कुप्रसिद्ध असल्याचेही यावेळी भारताकडून अधोरेखित करण्यात आले. “९/११ दहशतवादी हल्ल्याला २० वर्षे पूर्ण झाली.
ज्याचा मास्टरमाईंड हा पाकिस्तानातच लपला होता याचा पुरावा जगाला मिळाला. पाकिस्तानात भरदिवसा धर्मांतरासाठी केले जाणारे अल्पसंख्याकांवरील अत्याचार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिला जाणारा त्रास, अल्पसंख्याक मुलींचा कट्टरतावाद्यांशी बळजबरीने केला जाणारा निकाह, याबद्दल बोलायला पाकिस्तान का धजावत नाही, त्यावर पडदा टाकून आमच्या अंतर्गत बाबींकडे पाकिस्तानला लक्ष देण्यात रस का आहे,” असा प्रश्न विचारून त्यांनी इमरान खान आणि पाकिस्तानी अधिकार्यांची बोलती बंद केली, त्याबद्दल अभिनंदन.
मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.