सावध ऐका पुढल्या हाका!

    08-Jan-2021
Total Views | 160

trump w _1  H x
 
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन यांचा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून विजय अमान्य करणे, त्याविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे वगैरे लोकशाहीच्या चौकटीत, मर्यादेतही म्हणता येईल. परंतु, ट्रम्प समर्थकांनी ६ जानेवारी रोजी वॉशिंग्टनमधील संसद इमारतीत जो धुमाकूळ घातला, त्याची निंदा करावी तितकी कमीच!
 
 
आज विजय तेंडुलकर असते तर ते पुन्हा एकदा म्हणाले असते, “माझ्या हातात गन (रायफल)द्या, मी ट्रम्पला गोळ्या घालतो. ठार मारतो.” दि. ६ जानेवारीला अमेरिकेच्या राजधानीत जे काही घडले, त्यामुळे तेथील नागरिकच नव्हे, तर सगळ्या जगाला, त्यातल्या त्यात लोकशाहीवर श्रद्धा असणार्‍या प्रत्येक देशाला अन् सुजाण नागरिकाला प्रचंड धक्का बसलाय. दोन देशात युद्ध झाले, तर त्यामागे काही एक विचार असतो.
 
 
हक्कांची मागणी असते. हा हक्क योग्य की अयोग्य, नैतिक की अनैतिक हा वादाचा मुद्दा असू शकतो. पण, त्यात वैयक्तिक स्वार्थ क्वचितच असतो. एखाद्या न्याय्य मागणीसाठी समूह लढत असतो. अमेरिकेत जे काही घडले, ते ट्रम्प नावाच्या एका उद्दाम, सत्तांध, अविवेकी, मनोवृत्तीचे गलिच्छ प्रदर्शन दिसले! तिथे समूह होता, पण तोदेखील ट्रम्प यांच्यावरील दुर्गुणांचे मुखवटे घातलेला, अतिरेकी, राष्ट्रद्रोही, अमानवीय माणसांचा गोतावळा. ट्रम्पची विषप्रवृत्ती व्यक्तीपुरती मर्यादित राहिली नाही, तिने संघटनात्मक रूप धारण केले.
 
 
या मंडळींचा कुणावरही विश्वास नाही. राज्यघटना, लोकशाही, न्याय व्यवस्था, कायदा, राज्य प्रशासन, निवडणूक आयोग, काँग्रेसमधील सभासद, अधिकारी, कुणावरही त्यांचा विश्वास नाही. ‘हम करे सो कायदा’, ‘आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा’ हा त्यांचा हुकूमशाही पवित्रा! त्यामुळे जगातल्या मोठ्या, प्रगत, लोकशाही राष्ट्राचा हा युद्ध न करताच झालेला दारुण पराभव आहे, असे म्हणता येईल.
 
गेल्या काही दशकांत, पाश्चिमात्य देशात हळूहळू जो सत्तांध चंगळवाद फोफावतो आहे, त्याची ही शोकांत परिणती! या ट्रम्पवादी मनोवृत्तीत राष्ट्रप्रेम, लोकशाही, घटना, न्यायप्रणाली, कायदे यापैकी कुठल्याही मूल्याविषयी आस्था दिसत नाही. प्रेम नाही, श्रद्धा वगैरे राहिली दूरच. त्यांचे हातपाय फक्त स्वार्थाच्या चिखलाने बरबटलेले आहेत. तरी बरे या माणसाने चांगली पाच वर्षे सत्ता उपभोगली आहे. अमेरिकेच्या जनतेनेच नव्हे, तर सार्‍या जगाने या हटवादी, वाचाळ, स्वार्थी, अतार्किक प्रमुखाला सहन केले आहे.
 
त्या कमावलेल्या भल्याबुर्‍या पुण्याच्या भरवशावर तरी आता त्याने गप्प बसायचे, पण नाही. माणसाला एकदा सत्तेची लालसा निर्माण झाली की तिला अंत नसतो, हेच खरे. खरेतर एकदा सत्ता उपभोगल्यानंतर ट्रम्पसारख्या माणसाने पुन्हा निवडणुकीला उभेच राहायला नको. अमेरिकेत सुजाण, ‘टॉवर पर्सनॅलिटी’ची बुद्धिमान नेत्यांची कमी आहे की काय? ट्रम्प याचे आधीचे प्रताप गृहित धरूनही त्यांना, दुसर्‍यांदा इतकी मते अमेरिकन नागरिकांनी द्यावीत, या बौद्धिक दिवाळखोरीला काय म्हणावे?
 
हे राजकीय पंडितांनी तोंडात बोट घालावीत, असे आक्रित आहे! हा स्वयंकेंद्री, आत्मनिष्ठ, अविचारी माणूस इतकी मते खिशात घालून दिमाखात मिरवतो, एवढेच नव्हे तर निर्णायक हार झाल्यानंतरही खेळीमेळीने पराभव न स्वीकारता, ‘मेरे मुर्गी की एकही टांग’ म्हणून फणा वर काढून फुत्कारतो, हे भविष्यात सुदृढ, सुजाण, शांतताप्रिय लोकशाहीसाठी निश्चितच धोकादायक आहे. हा विरोध नाही. हा तात्त्विक निषेध नाही. हा सरळ सरळ राष्ट्रद्रोह आहे. हे अतिरेक्यांचे देशविरोधी, लोकशाहीविरोधी, न्यायप्रणाली विरुद्ध किंबहुना एकूणच शांतताप्रिय जगाविरुद्ध पुकारलेले माथेफिरू बंड आहे.
 
 
या बंडाचा बिमोड कसा करायचा, हे अमेरिकेचे नागरिक ठरवतील. तेथील राज्यघटना ठरवेल. तेथील न्यायव्यवस्था ठरवेल, पण ही बंडाळी आता अमेरिकेपुरती मर्यादित राहणार नाही. ही धोक्याची राक्षस घंटा आहे. लोकशाहीवर प्रेम करणार्‍या प्रत्येक शांतताप्रिय राष्ट्रासाठी हा गंभीर इशारा आहे. ‘रात्र वैर्‍याची आहे, जागते रहो’ असे निक्षून, ओरडून बजावणारा संभाव्य धोक्याचा इशारा आहे.
 
आपण व्यक्तिस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य, ह्युमन राईट्स वगैरेंच्या गोष्टी करतो. ते घटनेत आहेच, पण त्याचबरोबर काही जबाबदार्‍यादेखील आहेत. स्वातंत्र्याच्या नावाखाली जर कुणी स्वैराचार करणार असेल, घटनेलाच पायदळी तुडविणार असेल, ‘देश गेला खड्ड्यात, माझेच काय ते खरे’ असे म्हणणार असेल, तर तो विषारी फणा वेळीच घटनेच्या, न्यायदेवतेच्या हातोड्याने ठेचला पाहिजे, अशी विषवल्ली फोफावता कामा नये. अशा अवमूल्यांना वेळीच आळा घालावा लागेल. तिलांजली द्यावी लागेल.
 
 
सध्या ही समस्या अमेरिकेपुरती मर्यादित वाटत असली तरी, चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूने जसे बघता बघता सार्‍या जगाला कवेत घेतले, तसेही अमेरिकेतली स्वार्थी, आत्ममग्न, सत्तापिपासू, ट्रम्पशाही इतर शांतताप्रिय लोकशाहीवादी देशातही पसरू शकते. आपल्याकडील गेल्या काही वर्षांतील आंदोलने (इतकी टोकाची नसली तरी) त्याची झलक दाखवण्याइतपत पुरेशी आहेत. स्वातंत्र्य म्हणजे नंगा नाच नव्हे, हे घटनेने, सरकारने, न्यायव्यवस्थेने नागरिकांना ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे.
 
 
जखमा चिघळत ठेवल्या की, ते विष पसरत जाते. सर्वांग त्या विषाणूने पोखरण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच अशा बाबतीत उपाययोजना करायला हवी. राजकीय डावपेच म्हणूनसुद्धा टाळमटाळ करणे धोकादायक ठरू शकते. इथे एका व्यक्तीच्या, पक्षाच्या, अमुक विचारसरणीच्या अस्तित्वाचा किंवा भविष्याचा प्रश्न नसतो. संपूर्ण राष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो. अमेरिकेत दि. ६ जानेवारीला ट्रम्पच्या तुतारीने सार्‍या जगाला खडबडून जागे केले आहे. सावध, ऐका पुढल्या हाका! हा धोक्याचा इशारा दिला आहे. आपले कान, डोळे, विचार, बुद्धी बधिर होण्याआधीच आपण हा इशारा गांभीर्याने घेतला पाहिजे. मागच्याला ठेच लागली की, पुढच्याने सावध होण्यालाच शहाणपण म्हणतात. जगाचे नेतृत्व कुठल्या मनोवृत्तीने करायचे हे ठरविण्याची हीच ती वेळ!

- डॉ. विजय पांढरीपांडे 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121