हॉकीचे ‘आयर्न गेट’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021   
Total Views |
ews _1  H x W:
 
 

भारतीय हॉकी संघात जगज्जेते बचावपटू मायकल किंडो यांनी ३१ डिसेंबर रोजी जगाचा निरोप घेतला. त्या निमित्ताने त्यांच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा आढावा...
 
 
२०२० हे वर्ष जगासाठीच एक वाईट आठवणींचा ठेवा म्हणून आयुष्यभर लक्षात राहील. जवळपास सर्वच क्षेत्रातील काही नामवंत व्यक्तिमत्त्वांनी गेल्या वर्षात जगाचा निरोप घेतला. मात्र, क्रीडा क्षेत्रातील अशी अनेक नावे आहेत, ज्यांच्या निधनाने संपूर्ण क्रीडाविश्व हळहळले. भारतामध्ये हॉकी हा खेळ रुजवून देशभरात भारतीय संघाला एक मजबूत हॉकी संघ म्हणून उभे करण्यात अनेक महान खेळाडूंचे योगदान आहे. अजित पाल सिंग, अशोक दिवान, ओंकार सिंग, बलबीर सिंग सिनियर असे अनेक सुप्रसिद्ध हॉकीपटू होऊन गेले.
 
 
 
या दिग्गज हॉकीपटूंनी भारतीय हॉकीचा पाया तर रचलाच, शिवाय परदेशात जाऊन भारतासाठी पदकेही पटकावली. सत्तरीच्या काळातील भारतीय हॉकी संघामध्ये एक वेगळे कौशल्य दिसून आले. या दरम्यान प्रत्येक खेळाडूचे एक वैशिष्ट्य होते. या संघातील खेळामध्ये आक्रमकता आणि बचावात्मकतेचा समतोल होता. यामध्ये आणखी एक असा खेळाडू होता, ज्याचा बचाव आणि क्रीडाकौशल्य हे वाखण्याजोगे होते. ते म्हणजे, मुळचे ओडिशाचे असलेले मायकल किंडो. हॉकीमधील सुवर्णकाळाचे भागीदार ठरणार्‍या मायकल किंडो यांचे ३१ डिसेंबर २०२० रोजी निधन झाले. जाणून घेऊया त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाबद्दल...
 
 
मायकल किंडो यांचा जन्म २० जून १९४७ रोजी रांचीतील रायघमा या छोट्या गावात झाला. घरची परिस्थिती बिकट असताना त्यांनी कुर्डेग येथील बॉईस मिडल स्कूलमध्ये प्रवेश घेतला. इथेच त्यांचा संबंध हॉकी या खेळाशी आला. त्यांच्या मनात या खेळाचे कुतूहल वाढत होते. शालेय शिक्षण घेतल्यानंतर ते देशसेवेसाठी भारतीय लष्करात रुजू झाले. मात्र, हॉकी या खेळाशी त्यांचा संबंध इथे दृढ झाला. शालेय पातळीवर हॉकीचे मूलभूत शिक्षण घेतल्यानंतर लष्करात असताना त्यांनी या खेळाचे तंत्रशुद्ध शिक्षण घेतले. यावेळी त्यांनी १९६६ ते १९७३ या आठ वर्षांत भारतीय सेना दलाचे राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्त्व केले.
 
 
यावेळी त्यांनी संघाचे प्रतिनिधित्त्व करत अनेक स्पर्धांमध्ये विजय मिळवून दिलाच, शिवाय अनेक पदके आणि बक्षिसेही त्यांनी जिंकली. १९६९ मध्ये केनिया येथे झालेल्या मालिकेमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्या वेळी भारतीय सेनादलाच्या संघाचा हॉकीमध्ये विशेष दबदबा होता. अनेक आंतरराष्ट्रीय हॉकीपटूंचा या संघात समावेश होता. असे असतानाही अभेद्य बचावातील गुणवत्तेच्या बळावर त्यांनी भारतीय संघात स्थान मिळविले. त्यांची कामगिरी पाहून १९७१ मध्ये सेना दलाचा ’सर्वोत्कृष्ट क्रीडापटू’ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. पुढे १९७१मध्येच त्यांना देशाचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली. यावर्षी बार्सिलोना येथे झालेल्या विश्वचषक सामन्यात भारताला कांस्यपदक त्यांनी मिळवून दिले.
 
 
यावेळी त्यांच्या कामगिरीची सर्व स्तरांतून प्रशंसा करण्यात आली. त्यानंतर सेनादलाच्या संघातून बाहेर पडत त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करण्यास सुरुवात केली. पुढे १९७२ मध्ये म्युनिच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय संघाला कांस्यपदक मिळवून दिले. त्यांनी यावेळी ग्रेट ब्रिटन, मेक्सिको आणि न्यूझीलंड संघांविरुद्ध एक-एक गोल लगावला. पुढे १९७३ मध्ये अ‍ॅमस्टरडॅम विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला रौप्य पदक मिळवून दिले. याचवर्षी त्यांना भारतीय सरकारतर्फे ‘अर्जुन पुरस्कार’ देण्यात आला. विशेष म्हणजे, हा पुरस्कार पटकावणारे ते पहिले वनवासी खेळाडू होते. तसेच, स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करणारे पहिले वनवासी हॉकीपटू ही विश्वविजेत्या चमूतील किंडो यांची विशेष ओळख होती. यामुळे झारखंड आणि ओडिशासारख्या भागांमध्ये या खेळाचा मोठा प्रभाव पडला.
 
१९७४ ते १९७७ अशी चार वर्षे रेल्वेच्या राष्ट्रीय विजेतेपदात किंडो यांचा महत्त्वाचा वाटा होता. १९७५ मध्ये क्वालालंपूर येथे झालेली विश्वचषक स्पर्धा ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाची स्पर्धा ठरली. यामध्ये बलाढ्य संघांवर मात करत भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला हरवून सुवर्णपदकावर आपली मोहोर उठवली. यामध्ये किंडो यांच्या खेळीचे मोठे योगदान होते. १९७८ ते १९८० या कालखंडात ते रुरकेला येथील भारतीय स्टील प्राधिकरणाच्या संघात रुजू झाले. १९६९ मध्ये त्यांनी भारतीय संघात पदार्पण केले होते.
 
 
मात्र, त्यानंतर भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करण्यासाठी तब्बल एक वर्ष त्यांना वाट पाहावी लागली. ‘स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया’ (SAIL) यांच्याकडून १९७७ पासून त्यांनी खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर २००४ मध्ये त्यांनी खेळामधून निवृत्ती स्वीकारली. निवृत्तीनंतर त्यांनी काहीकाळ प्रशिक्षक पदाचीदेखील जबाबदारी स्वीकारली. विशेष म्हणजे, त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये कधीही त्यांच्यावर फाऊल किंवा शारीरिक हानी पोहोचविण्याचा ठपका लागला नाही. त्यांची ओळख ’वॉल ऑफ टीम इंडिया’ , ’हॉकीचे आयर्न गेट’ अशीच केली जाते. अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून भावपूर्ण आदरांजली...



@@AUTHORINFO_V1@@