मुंबई : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवार यांनी २१ मार्च, २०१४ला अन्वय नाईक परिवाराकडून अलिबागजवळच्या कोर्लई गावातल्या 30 जमिनी विकत घेतल्या. त्या जमिनीवर असलेल्या ३० घरांचे काय झाले?” असा सवाल किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.आज कोर्लई गावात जाऊन किरीट सोमय्या यांनी जमिनी आणि त्यावरील असलेल्या घरांची अधिक माहिती घेतली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष महेश मोहिते इत्यादी उपस्थित होते. ग्रामपंचायत, तलाठी/तहसीलदार यांच्या रेकॉर्डवरून त्यांनी काही प्रश्न केले आहेत.
ते म्हणतात की, “१२ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे परिवार, रवींद्र वायकर परिवार आणि अन्वय नाईक परिवाराच्या आर्थिक/जमिनीचे व्यवहार या संबंधीची माहिती, खुलासा आम्ही जनतेला दिला. आश्चर्याची बाब अशी आहे की, अन्वय नाईक यांच्या या ३० जमिनी ठाकरे, वायकर परिवाराने विकत घेतल्या. हा व्यवहार २१ मार्च, २०१४ रोजी पूर्ण झाला, त्याचे अॅग्रिमेंट ट्रान्सफर व सगळे पेपरवर्क पूर्ण झाले.या जमिनीवर १९ घरे अस्तित्वात होती/आहेत, असे ठाकरे व नाईक परिवाराचे डॉक्युमेंट पाहता दिसत आहे. ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड्स पाहिल्यावर लक्षात येते की २००९-२०१० पासून ही घरे त्या जमिनीवर अस्तित्वात आहेत. या १९ घरांचे एकूण बांधकाम २३,५०० स्क्वेअर फूट आहे. याचे ग्रामपंचायत, राज्य सरकारच्या रेडिरेकनरप्रमाणे मूल्य रुपये पाच कोटी २९ लाख होते. २१ मार्च, २०१४ रोजी अन्वय नाईक परिवाराकडून उद्धव ठाकरे परिवाराने या सर्व जमिनी घरांसह विकत घेतल्या. परंतु, १३ नोव्हेंबर, २०२० पर्यंत म्हणजेच ही घरे अन्वय नाईकच्या नावाने ग्रामपंचायतीत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही पाच कोटींची १९ घरे त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखविल्याचे दिसत नाही. यासंबंधी मुख्यमंत्री स्पष्टता करणार का?” असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.
ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड पाहताना २०१९-२०२०, २०२०-२०२१ चे जे प्रोसिडिंग बुक, फॉर्म ८ व अन्य जे रेकॉर्ड्स आहेत त्यात स्पष्टता नाही. त्यात तारीख, केव्हा बैठका झाल्या, याचा अधिकृत तपशिलात गोंधळ दिसत आहे. ग्रामपंचायतीत ही १९ घरे रश्मी ठाकरे यांच्या नावावर करावी, असा ठराव ७ जून, २०१९च्या तारखेचा असल्याचे भासवले जात आहे. परंतु, तो व्यवहार अधिकृत १२ नोव्हेंबर, २०२० नंतर झाला असल्याचे ग्रामसेवक व तलाठी यांनी आम्हाला सांगितले. याचा अर्थ अन्वय नाईकची १९ घरे हे ठाकरे परिवार २०१४ ते २०२० म्हणजे सहा वर्षे बेनामी संपत्ती म्हणून वापर होते,” असे सोमय्या यांचे म्हणणे आहे. “अन्वय नाईक यांचा मृत्यू २०१८ मध्ये झाला. परंतु, उद्धव ठाकरे परिवाराच्या नावाने ही घरे करण्याचा अर्ज, ठराव, पैसे भरणे, अधिकृत करणे हा सर्व व्यवहार हे २०२० नोव्हेंबरमध्ये किंवा त्या काळामध्ये झाला याची कायदेशीर स्थिती काय? असा व्यवहार करण्यासाठी अन्वय नाईकच्या मृत्यूनंतरची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती का, या संबंधीही स्पष्टता हवी आहे,” असे सोमय्या यांचे म्हणणे आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक परिवाराशी असलेल्या अर्थिक संबंधांविषयी स्पष्टता करावी,” अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.