मुंबई : “युएईमधून आल्यानंतर नियमानुसार संस्थात्मक ‘क्वारंटाईन’ न होता, अभिनेता सोहेल खान, अरबाज खान आणि त्याचा पुत्र निर्वाण खान हे त्यांच्या घरी जाणे, हा महापालिका आणि राज्य शासनाचा निष्काळजीपणा आहे, अशा निष्काळजीपणामुळे मुंबईकरांच्या जीवावर बेतेल,” असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
युएईमधून आल्यानंतर संस्थात्मक ‘क्वारंटाईन’ न होता घरी गेल्यामुळे अभिनेता सोहेल खान, अरबाज खान आणि त्याचा पुत्र निर्वाण खान या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरबाज, सोहेल आणि निर्वाण खान यांनी स्वतःला परदेशातून आल्यावर हॉटेलमध्ये ‘क्वारंटाईन’ केल्याचे सांगितले. परंतु, तसे न होता ते आपल्या घरी गेले, यामुळे पालिकेचा निष्काळजीपणा समोर आला. “हा निष्काळजीपणा मुंबईकरांच्या जीवाशी बेतेल याचे भान महापालिका आणि सरकारला आहे का,” असा खरमरीत सवाल दरेकरांनी विचारला.
दरेकर म्हणाले की, “कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. एका बाजूला सरकार सांगत आहे की, मुंबईत कर्फ्यू जाहीर करण्यात येतो. पण, या सर्व बाबीतून सरकारचा सर्वसामान्य माणसांसाठी असलेला निष्काळजीपणा दिसून येत आहे,” अशी टीका दरेकरांनी केली.ते पुढे म्हणाले की, “महानगरपालिका ज्यांच्याकडे आहे, तेच राज्य सरकारचे नेतृत्व करतात. मग या प्रकारच्या गोष्टींकडे राज्य सरकार व महापालिकेचे लक्ष कसे नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. असा निष्काळजीपणा करणार्या अधिकार्यांवर योग्य कारवाई करावी व अशा प्रकारचे दुर्लक्ष पुन्हा होणार नाही, याची हमी मुंबईकरांना देण्याची आवश्यकता आहे,” असे दरेकर यांनी यावेळी सांगितले.
अखेर अरबाज, सोहेल संस्थात्मक विलगीकरणात
अभिनेता अरबाज खान, सोहेल खान आणि त्यांचा मुलगा निर्वाण खान यांना महापालिका व पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी संस्थात्मक विलगीकरण केंद्रात केली आहे. मात्र, त्यांना भायखळा येथील ‘जम्बो कोविड सेंटर’मध्ये ठेवले की, ‘ताज लॅण्ड एण्ड’ या हॉटेलमध्ये ठेवले, याबाबतची माहिती उपलब्ध झालेली नाही. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली. अरबाज खान, सोहेल खान आणि त्यांचा मुलगा निर्वाण खान हे तिघे जण २५ डिसेंबर रोजी ‘युएई’वरून मुंबई विमानतळ येथे दाखल झाले. मात्र, त्यांनी सात दिवस संस्थात्मक विलगीकरणात न राहता थेट वांद्रे येथील घर गाठले. त्यामुळे त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने खार पोलीस ठाण्यात या तिघांच्या विरोधात ‘साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ नुसार ‘एफआयआर’ दाखल केला आहे. सुदैवाने अरबाज, सोहेल व निर्वाण हे तिघेही ‘निगेटिव्ह’ आहेत.