स्वकौशल्याधिष्ठित छंदोपासक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2021   
Total Views |

Hemant Nakhare_1 &nb
 
 
अंगी जोपासलेल्या छंदाने माणूस घडत जातो, असे म्हणतात. नाशिकचे हेमंत नाखरेही असेच अनेक छंद जोपासत आहेत. त्यांच्या या स्वछंदी छंदप्रवासाविषयी...
 
छंद माणसाला जीवनमार्गातील आनंदाची अनुभूती देत असतात. छंद नसणे म्हणजे एक प्रकारे व्यक्तीच गतिमंद आहे की काय, अशी शंका येते. जीवनात आनंद आणि दृष्टिकोन विकासासाठी छंद नक्कीच आवश्यक आहेत, असे मत आहे नाशिक येथील हेमंत नाखरे यांचे. मूलत: व्यवसायाने रिक्षाचालक असलेले हेमंत नाखरे हे छंदांच एक पेटारं आहे. ते उघडले तर नानाविध कौशल्यही बाहेर पडताना दिसतात. विशेष म्हणजे, कोणतेही प्रशिक्षण न घेता केवळ इतरांना पाहून त्यांनी कला आत्मसात केल्या आहेत आणि ते आपल्या कलांची छंदाच्या माध्यमातून उपासना करत आहेत. म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन ‘स्वकौशल्याधिष्ठित छंदोपासक’ असेच करावेसे वाटते.
 
नाशिक जिल्हा हा पतंगप्रेमींचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. लवकरच संक्रांत येत आहे, तेव्हा नाशिकच्या आसमंतात आतापासूनच विविध रंगी पतंगांचे साम्राज्य दिसून येत आहे. नाखरे हे छंद आनंद कार्यशाळेच्या माध्यमातून पतंग बनविणे आणि उडविणे याचे प्रशिक्षण नाशिकमधील शालेय विद्यार्थ्यांना देत आहेत. जवळपास ३० वर्षांपासून नाशिक, मुंबई, पुणे येथे तसेच नाशिकच्या विविध शाळांमध्ये, मुंबई येतील केशवसृष्टीमधील रामरतन विद्यामंदिर येथे त्यांनी अनेकांना प्रशिक्षण दिले आहे.
 
टाकाऊपासून टिकाऊ करण्यावर नाखरे यांचा भर असून, ते तुटलेल्या छत्र्यांच्या कापडापासून आकर्षक पतंग बनवत आहेत. त्यामुळे नाखरे यांनी बनविलेल्या पतंगांची घडी करून ती हवी तेव्हा, हवी तेथे उडविता येते. नाखरे हे इयत्ता तिसरीमध्ये असताना त्यांनी पहिला पतंग बनविला. ते जेथे वास्तव्यास होते, त्या ठिकाणी एक व्यक्ती पतंग बनविण्याचे काम करत होते. ते नाखरे यांनी पाहिले व त्यांच्या आईने त्यांना जे पाहिले, त्या आधारावर पतंग बनविण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर नाखरे यांनी पहिला कागदाचा पतंग बनविला. अहमदाबाद येथे आयोजित होणार्‍या पतंगमहोत्सवास ते इयत्ता सातवीत असताना गेले असता, तिथे परदेशी पतंगाचे आकार पाहिले व त्यांना पतंग व त्याचे प्रकार व त्यातील आकर्षकता खुणावू लागली.
 
नाखरे हे आपल्या रिक्षातून मुलांना शाळेत सोडविण्याचे काम करत असत. त्यामुळे त्या मुलांशी व त्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांनी आपल्या रिक्षातील मुलांना पतंग बनविणे व उडविणे, यात पारंगत करण्याचे काम सुरू केले. आजवर नाखरे यांनी छोट्यात छोटे सहा इंच ते मोठ्यात मोठे आठ फुटांचे पतंग बनवले असून, उडविले आहेत. अनेक शाळकरी मुलांना त्यांनी पतंग बनविण्यास शिकविले आहे. नाखरे यांच्या मुलास लहानपणी अंगठा चोखण्याची सवय होती. ती सवय सुटावी यासाठी नाखरे मुलाला व्यस्त ठेवण्याकामी त्याच्यासमवेत सतत खेळत असत. त्यातून त्यांनी अनेक खेळ आत्मसात केले. नाखरे यांचे विविधांगी खेळ पाहून परिसरातील अनेक लोक त्यात सामील होऊ लागले. नाखरे हे ‘संस्कार भारती’ची रांगोळी काढणे, तारांचे पझल्स बनविणे, लेझीम, स्केटिंग यात पारंगत आहेत. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केवळ इतरांचे बघून त्यांनी या कला आत्मसात केल्या आहेत.
 
नाशिक, येवला या भागातील पतंग उडविण्याची पद्धत ही एकट्याने एकच पतंग उडविणे, १०० ते १५० मीटर मांजा सोडणे, पेज लढविणे, अशी आहे. यामुळे अनेकांना इजा होणे पक्ष्यांनाही इजा होते. परदेशात सिद्ध झाले की, एक अखंड दोरा पक्ष्यांना दिसत नाही, त्या दोर्‍याला रंगीबेरंगी रिबीन बांधल्या, एकाच दोर्‍याला असंख्य पतंग बांधले तर पक्ष्यांना तो एक थवा दिसतो. त्यामुळे ते दूर जातात, तसेच दोर्‍याला काही चमकणारे लावले तर पक्षी दूर जातात. त्यामुळे एका व्यक्तीने एकावेळी अनेक पतंग उडविल्यास पक्ष्यांना इजा होणे थोपविता येईल, असे मत नाखरे व्यक्त करतात.
 
लोकांना पतंग आणि त्याची संस्कृती आणि त्याचे जागतिक स्तरावर असलेले वलय याची माहिती देणे आवश्यक असल्याचे नाखरे यांचे मत असून, त्यासाठीच ते आपली पतंगसाधना अविरत सुरू ठेवत आहेत. नाखरे यांनी आजवर एकाच वेळी ६० पतंग नाशिकमध्ये उडविले आहेत, तसेच सेल्फी पतंग, ड्रॅगनच्या आकाराचा पतंग, पॅराशूट पतंग, पक्ष्यांच्या आकाराचे पतंग नाखरे यांनी बनविले असून, ते पतंग उडविण्याकामी साधा गोधडी शिवण्याचा दोरा वापरतात. पतंग उडविल्याने उंच बघण्याचा सराव होणे, अनेक तास उभे राहता येणे, एकाग्रता साधने आदी गुणांचा विकास होतो, असे मत नाखरे व्यक्त करतात. आजवर नाखरे यांनी हजारो पतंग बनविले असून त्यांची कधीही विक्री केलेली नाही. केवळ पतंगाबाबत जनजागृती करणे, पर्यावरणास हानी पोहोचणार नाही, अशा पद्धतीने पतंग बनविणे व त्याच पद्धतीने पतंग उडविण्यास प्राधान्य देणे यासाठी नाखरे आपला छंद जोपासत आहेत. आपल्या मुलाला असलेली सवय सुटावी म्हणून सुरू केलेले कार्य हे पाहता पाहता कलात्मक झाले. याच कलेच्या परिघात नाखरे यांनी अनेकांना सामावून घेतले आहे. त्यांच्या या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!
@@AUTHORINFO_V1@@