काश्मीर, कैरानाची मुंबईत पुनरावृत्ती?

    04-Jan-2021
Total Views |

malvani _1  H x


मालाडच्या मालवणीमध्ये घर सोडून जाण्यासाठी हिंदूंवर दबाव ; नऊ दलित कुटुंबीयांसाठी मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा मैदानात


मुंबई (सोमेश कोलगे) :
काश्मीर आणि कैराना येथे घडलेल्या हिंदू धर्मीयांच्या पलायनाची पुनरावृत्ती मुंबईसारख्या शहरात होणार का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. शहरातील मालाड या उपनगरातील मालवणी या भागात एका वस्तीत घर सोडून जाण्यासाठी हिंदू धर्मीयांवर इतर धर्मीयांकडून दबाव टाकण्यात येत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. वस्तीतून घर सोडून जाण्यासाठी विविध प्रकारे हिंदू धर्मीयांचा छळ केला जात असून या वस्तीत आता केवळ नऊ दलित हिंदू कुटुंबे वास्तव्यास आहेत. या नऊ कुटुंबीयांनाही हटविण्यासाठी महिलांसोबत छेडछाड, धार्मिक कट्टरतेच्या आडून त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. राज्य सरकारचे याप्रकरणाकडे दुर्लक्ष झाले असले तरी राज्यात विरोधी पक्ष असणार्‍या भाजपने मात्र यासाठी आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांनी नुकतीच या पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांना आधार दिला आहे.मालवणी भागातील म्हाडा गेट क्रमांक ७ या परिसरात हिंदूंना घर सोडण्यासाठी दबाव टाकण्याचे प्रकार गेले काही दिवस घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. आता तिथे केवळ नऊ हिंदू घरे उरली असून त्यात दलित समाजातील कुटुंबांची बहुतांशी घरे आहेत. याविषयी स्थानिक पोलिसांकडे तक्रारी दिल्या गेल्या. मात्र, प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अनधिकृत ध्वनिक्षेपक व तत्सम कारणास्तव पोलिसांसोबत मंगळवार, दि. २९ डिसेंबर रोजी शेवटचा पत्रव्यवहार झाल्याची कागदपत्रे दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हाती लागली आहेत. पोलिसांवर दबाव असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. घर सोडून निघून जा, अशा धमक्या संबंधित कुटुंबीयांना दिल्या गेल्याची माहिती पीडितांनी दिली आहे. अनेकदा मानसिक खच्चीकरण केले जात असल्याने नऊ दलित परिवाराचे जीवन या सगळ्यामुळे कठीण झाल्याचे समजते. घरात महिला एकट्या असताना बाहेरून कडी लावणे, वेगवेगळ्या माध्यमातून छेडछाड करणे, असे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. याविरोधात तक्रारी झाल्यानंतरही कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या व्यथा मांडताना या नऊ हिंदू कुटुंबांतील महिलांना आपले अश्रू अनावर झाले.


करिश्मा भोसले आमची प्रेरणा


स्थानिक महिलांनी गोपनीय सूत्रांकडे याविषयी आपली व्यथा मांडली. मशिदीवरील अवैध भोंग्यांविरोधात आवाज उठवणारी करिश्मा भोसले ही युवती आमचे प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


पोलिसांनी पक्षपात न करता कुटुंबियांना सुरक्षा पुरवावी


मालवणी मालाड भागात दलित हिंदू कुटुंबांवर होत असलेल्या अन्यायाविषयी चर्चा केली. काश्मीरमध्ये १९९० साली हिंदू अल्पसंख्याक झाल्यावर जसे उत्पीडन झाले तीच परिस्थिती मुंबईतील मालवणी भागातील परिवारावर ओढवली आहे. अवैध बांधकाम, ड्रग पेडलर अशा माध्यमातून दहशत बसवण्याचा जो प्रयत्न होतो आहे त्याविरोधात स्थानिक प्रशासनाने तातडीने कारवाई करावी तसेच पोलिसांनी पक्षपात न करता त्यांना सुरक्षा द्यावी.
- मंगलप्रभात लोढा, अध्यक्ष, मुंबई भाजप