२०२० मध्ये जगावर कोरोनाचे मोठे संकट घोंघावत होते. जगभरातील नागरिकांना कोरोनामुळे अनेकविध संकटांचा सामना करावा लागला. महामारी ही अचानक येत असते. तशी ती आलीदेखील. मात्र, मानवी जीवनात भविष्यातदेखील काही संकटे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यातील हवामान बदलामुळे येणारे संकट हे काही प्रमाणात मानवी हस्तपेक्षामुळे येण्याची शक्यता. गेल्या वर्षभरापासून जगात कोरोनाने हाहाकार माजवला असला तरी अद्यापही ६४ टक्के म्हणजे सुमारे दोन तृतीयांश नागरिकांना जागतिक परिप्रेक्ष्यामध्ये घडून येणारे हवामानीय बदल हीच जागतिक आणीबाणी असल्याचे जाणवत आहे. विशेष म्हणजे, जागतिक पातळीवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी जवळपास अर्धे जण हे १४ ते १८ या वयोगटातील अल्पवयीन होते. यावरून जगातील युवापिढीला वसुंधरेच्या रक्षणाची, तिच्या आरोग्याची काळजी सतावत असल्याचे दिसून येते.
जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी करण्यात येणार्या उपाययोजनांसंदर्भात संयुक्त राष्ट्राच्या विकास कार्यक्रमांतर्गत एक सर्वेक्षण करण्यात आले. हवामान बदलाच्या मुद्द्यावरील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे सर्वेक्षण समजले जाते. ‘ऑक्सफर्ड’ विद्यापीठाच्या मदतीने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात ५० देशांमधील सुमारे सव्वाबारा लाख नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला होता. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांपैकी सुमारे साडेपाच लाख नागरिक १४ ते १८ वयोगटातील होते. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मोबाईल गेमिंग अॅप्समध्ये काही प्रश्नांच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आले.
त्याचे निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार ६४ टक्के लोकांच्या दृष्टीने हवामान बदल ही सर्वात मोठी जागतिक समस्या असून, त्यावर उपाययोजना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांचे मत आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप झेलणार्या युरोपियन देशांमध्ये आघाडीवर असलेल्या ब्रिटन आणि इटलीमधील तर प्रत्येकी ८१ टक्के नागरिकांनी कोरोना महामारीपेक्षाही हवामान बदल ही जागतिक आणीबाणी असल्याचे मत व्यक्त केले आहे. ‘पॅरिस करारा’चे समर्थन केल्यामुळे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासाठीदेखील हे सर्वेक्षण दिलासादायक असल्याचे समोर येत आहे. कारण, अमेरिकेतील ६५ टक्के लोकांनी हवामान बदल ही कोरोनापेक्षाही मोठी समस्या असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या युवकांपैकी ७० टक्के युवकांनी हवामान बदलाचे संकट गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त केली. हवामान बदलाचे दुष्परिणाम लोक भोगत असल्याने ते याबाबत गंभीर असल्याचे ‘युएन’च्या विकास कार्यक्रमाच्या धोरणात्मक सल्लागार कॅसी फ्लायन यांनी सांगितले. लाखो हेक्टरवरील वनसंपदा खाक करून मानवाला पलायन करण्यास भाग पाडणारे अमेरिका, ऑस्ट्रेलियातील भीषण वणवेदेखील जगभरातील नागरिकांनी यापूर्वी अनुभवले आहेत. पाचव्या श्रेणीतील प्रलयकारी चक्रीवादळे, अतिवृष्टी, हिमवृष्टी, महापूर यांचा लोक सामना करत आहेत. कोरोनाच्या संकटानंतर आता जगभरातील नागरिकांना आपल्या पुढील आगामी काळातील खरे संकट नेमके काय असणार, हे समजण्यास सुरुवात झाली आहे.
त्यामुळेच हवामान बदलाबाबत आता नागरिक अधिक सजग होताना दिसून येत आहेत. हवामान बदलाच्या संकटांचा सामना करण्यासाठी चार प्रमुख उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. सर्वाधिक ५४ टक्के नागरिकांच्या आकडेवारीवरुन जंगल आणि जमिनीचे संवर्धन करणे अतिआवश्यक असल्याचे मत समोर येत आहे. मानवामार्फत विविध कारणांनी होणारी जंगलतोड रोखण्याची गरज या नागरिकांनी व्यक्त केली.
५३ टक्के लोकांनुसार जीवाश्म इंधनावरील ऊर्जेचा वापर कमी करून सौरऊर्जा, पवनऊर्जा, अणुऊर्जेवर भर द्यायला हवा, असा विचारप्रवाह समोर आला आहे. हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामुळेदेखील तापमानवाढ होत असल्याने शेतीसाठी पर्यावरण अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज ५२ टक्के लोकांनी व्यक्त केली. ५० टक्के लोकांनुसार हरित उद्योग, रोजगारांमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करायला हवी, असे मत मांडण्यात आले आहे. जगातील नागरिक त्यातही विशेषत: तरुण हे वसुंधरेच्या रक्षणासाठी विचार मांडत आहे, हे नक्कीच उपयुक्त (सकारात्मक) आहे.