मुंबई : निवडणूक शपथपत्रात माहिती लपविल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवार, दि. २८ जानेवारी रोजी दिल्लीवारी केली.सोमय्या यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची भेट घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या आर्थिक व्यवहार आणि मिळकतीची खरी माहिती निवडणूक शपथपत्रात दाखवली नसल्याने त्यांच्यावर पुरावे देत कारवाईची मागणी केली आहे.
ते म्हणाले, “अन्वय नाईक यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी जमीन व बंगले घेतले. मात्र, त्याचादेखील तपशील आणि माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी दिली नाही. त्यांनी ही माहिती लपवली. दहा कोटींची जमीन दोन कोटींना घेतली. याबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना ३०० पानी पुरावे दिलेले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांकडून याबाबत स्पष्टीकरण मागवतील आणि जर यावर स्पष्टीकरण मिळाले नाही तर त्यांच्यावर कारवाई होईल,” असे सोमय्या यांनी सांगितले.