मुंबई : बहुचर्चित ‘पीएमसी’ बँक गैरव्यवहारप्रकरणी ‘सक्तवसुली संचलनालया’कडून (ईडी) विविध नेत्यांची चौकशी सुरू असतानाच ‘झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रा’त (एसआरए) आघाडीवर असलेल्या ‘ओंकार समूहा’चे अध्यक्ष कमलनाथ गुप्ता आणि आणि व्यवस्थापकीय संचालक बाबुलाल वर्मा यांना बुधवार, दि. २७ जानेवारी रोजी अटक केली. चौकशीत सहकार्य न केल्याप्रकरणी ‘ईडी’ने गुप्ता आणि वर्मा यांना ताब्यात घेतले.
गुरुवार, दि. २८ जानेवारी रोजी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे. ‘एसआरए’मध्ये जवळपास २२ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा संशय ‘ईडी’ने व्यक्त केला आहे. ‘ओंकार’ समूहाकडून येस बँकेकडून ४५० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. मात्र, ‘ओंकार’ समूहाकडून अनधिकृतपणे वेगवेगळ्या खात्यांमध्ये हे पैसे वळवण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ‘ईडी’ने नुकतीच छापेमारी करत ‘ओंकार’ समूहाकडून विविध बँकांकडून घेण्यात आलेल्या कर्जांच्या संदर्भातील कागदपत्र व विविध बँकांतील आर्थिक व्यवहार तपासणी केली. त्यानंतर दोघा जणांना अटक केल्याची माहिती आहे.
जोगेश्वरी परिसरात ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजने’च्या नावावर ‘ओंकार’ समूह आणि ‘गोल्डन एज समूह’ यांनी मिळून सुमारे २२ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. कर्ज घेण्याचे व्यवहार होऊन नऊ-दहा वर्षे उलटली तरी घरे बांधलेली नाही, असा आरोप करत एक याचिका मुंबईच्या उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासन आणि ‘ईडी’ला त्यांची बाजू मांडण्याचा आदेश दिला.
यानंतर ‘ईडी’ने ‘ओंकार’ समूहाशी संबंधित असणार्या दहा ठिकाणी छापे टाकले. काही दिवसांपूर्वी ‘ईडी’कडून अशाच प्रकारची छापेमारी ‘जेपी इन्फ्रास्ट्रक्चर’च्या कार्यालयांवर करण्यात आली होती. ‘जेपी इन्फ्रास्ट्रक्चर’मध्ये उत्तर प्रदेशमधील एका मोठ्या नेत्याचा पैसा गुंतवण्याचा संशय तपास यंत्रणांना असून यासंदर्भात ‘इन्कमटॅक्स’कडूनसुद्धा छापेमारी करण्यात आल्याचे कळले.