घराजवळील एका चर्चासत्रामधून प्रेरणा घेत, अंतराळविश्वाचे वेड लागलेल्या ठाणेकर युवा शास्त्रज्ञ अक्षत मोहिते याच्या अंतराळ संशोधनाची दखल ‘नासा’ने घेतली आहे. त्याच्या या ‘अक्षत’ भरारीविषयी...
शालेय शिक्षण घेताना ‘अंतराळ’ विषयावर पार पडलेल्या शास्त्रज्ञांच्या चर्चासत्रामध्ये सहभाग घेतल्यानंतर अक्षत मोहिते या शाळकरी मुलाला संशोधनात रस निर्माण झाला. या संशोधनातून, त्याने बनवलेल्या अंतराळ प्रकल्पाची दखल थेट ‘नासा’ने घेतली. त्याच्या या प्रकल्पाचे सादरीकरण दि. २४ ते २७ मे, २०१८ रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये पार पडलेल्या ‘आंतरराष्ट्रीय अंतराळ विकास परिषदे’तील पोस्टर सेशनमध्ये झाले आणि त्याच्या अंतराळविश्वाच्या भरारीला पंख फुटून अक्षत जगातील दुसरा सर्वात लहान, तर आशिया खंडातील पहिला लहान शास्त्रज्ञ बनला.आता तर अक्षत ‘नॅशनल स्पेस सोसायटी’चा अध्यक्षही आहे.
रायगड जिल्ह्यातील माणगाव, भालेगाव हे अक्षतचे मूळगाव. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विजय गार्डन येथे अक्षत आपल्या मातापित्यांसमवेत सध्या वास्तव्यास आहे. त्याचे आईवडील विज्ञानक्षेत्रामध्ये कार्यरत नाही. ठाण्यात कॉन्व्हेंट शाळेत शिकल्यानंतर अक्षतने महाविद्यालयीन शिक्षण मुलुंडच्या ज्युनियर कॉलेजमध्ये पूर्ण केले. आता तो अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहे.
शालेय शिक्षण घेताना २०१७ साली ठाण्यातील घराजवळच पार पडलेल्या ‘अंतराळ’ या विषयावरील चर्चासत्रामध्ये शास्त्रज्ञांकडून मिळालेल्या माहितीनंतर अक्षतला ‘अंतराळ’ या विषयाचे जणू वेडच लागले अन् शाळेत शिकता-शिकता अक्षतने आपल्या आजूबाजूला घडणार्या पर्यावरणीय घडामोडींचा अभ्यास सुरू केला. वातावरणातील विविध घटकांमुळे होणार्या प्रदूषणावर मात करण्यासाठी, तसेच दिवसेंदिवस वाढत जाणारे काँक्रीटचे जंगल आणि प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या पृथ्वीला असलेल्या आरामाची गरज ओळखून, अक्षतने पृथ्वीचा भार कमी करत सुमारे २० हजार लोक पृथ्वीसारख्याच चांगल्या वातावरणात, चक्क अंतराळात जाऊन राहता येईल, असे ‘स्पेस’ (शहर) बनविण्याचा ध्यास घेतला.
‘स्पेस’मधून नागरिकांना अंतराळात पाठवून पृथ्वीवरील त्या भागात वृक्षलागवडीसारख्या सुधारणा करण्याच्या हेतूने दीपेश धायफुले यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या ‘सॅक्झिमो’ (psaximo) या त्याच्या अंतराळ प्रकल्पाची अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेच्या ‘नॅशनल स्पेस सोसायटी’ने दखल घेतली. या प्रकल्पाच्या सादरीकरणानिमित्त अमेरिकेला प्रयाण करण्यासाठी अक्षतच्या पालकांनी उसनवारी व पदरमोड करून अक्षतची रवानगी अमेरिकेला केली. भविष्यातील शास्त्रज्ञाच्या या गरुडझेपेला हाक देत, त्यावेळी ठाण्यातील काही राजकीय प्रभूतींनी मोलाची मदत केली, त्यानंतर मात्र अक्षतने मागे वळून पाहिले नाही.
प्रदूषणावर मूलगामी उपाय सुचविणार्या ३५ पानांच्या प्रकल्पात अक्षतने ‘स्पेस’रूपी शहर साकारले. या अनोख्या शहरामध्ये रहिवासी आणि औद्योगिक क्षेत्र असून, यासाठी लागणारी वीज सौरऊर्जा आणि ‘मायक्रोव्हेव’द्वारे निर्माण केली जाते. इंधनासाठी दोन ‘इलेक्ट्रोन’ यांच्या संयोगातून इंधननिर्मिती त्याचबरोबर, हे ‘स्पेस’ अंतराळात नेण्यासाठीही हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संयुगावरील ‘हायड्राजीन’ या इंधनाचा वापर करण्याचे प्रयोजन केले, तर इंटरनेटसाठी वायफायऐवजी लाईट इंटरनेट म्हणजेच ‘लायफाय’ हे तंत्र ‘स्पेस’मध्ये वापरण्याची संकल्पना अक्षतचीच. भारतीय शास्त्रज्ञ अंतराळवीर कल्पना चावला हिला साहाय्य करणारे ‘नासा’चे वैज्ञानिक डॉ. रवि यांनी डिसेंबर २०१९ मध्ये अक्षतला मार्गदर्शन केले, तर ‘केनेडी स्पेस सेंटर’चे संचालक डॉ. रॉबर्ट कबाना यांच्याकडूनही त्याला पारितोषिक मिळाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर केलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे संपूर्ण देश थबकला असताना, अक्षतने घरबसल्या या संधीचा सदुपयोग केला. अक्षत आणि त्याचा पेण येथील सहकारी प्रज्ञेश म्हात्रे या महाविद्यालयीन युवकांनी अंतराळातील चार लघुग्रह शोधण्याचा विक्रम केला. त्यांच्या या शोधाची दखल पुन्हा एकदा अमेरिकेतील ‘नासा’ने घेतली. या द्वयीने एप्रिल २०२० मध्ये ‘नासा’द्वारे आयोजित करण्यात आलेल्या ‘इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल सर्च कोलॅब्रेशन’ या मोहिमेत सहभाग घेतला होता. या मोहिमेमध्ये त्यांना ‘नियर अर्थ ऑब्जेक्ट’ (NEO) आणि ‘मेन बेल्ट अॅस्टिरॉईड’मध्ये असलेल्या लघुग्रहांचे शोध घ्यायचे होते. त्याकरिता त्यांना अमेरिकेतील हवाई इथे असलेल्या ‘पॅन स्टार्स’ (PAN ASTARRS) वेधशाळा आणि ‘अॅरिझोना’ येथे असलेल्या ‘कॅटलिना स्काय सर्व्हे’ या वेधशाळेमधून शोध करण्याची संधी मिळाली.
या संधीच सोनं करून त्यांनी चार लघुग्रह शोधण्यात यश मिळवले. या लघुग्रहांची नोंद दोघांच्या नावावर झाल्याने त्यांनी हा सर्व डेटा आता पुढील चाचणीसाठी पाठवला आहे.विशेष म्हणजे, ‘लॉकडाऊन’काळात घरातच लॅपटॉपवर काम करून अक्षतने ही कामगिरी बजावली. त्यांनी शोधलेल्या लघुग्रहांची नोंद ‘नासा’च्या डिरेक्टरीमध्ये करण्यात आली असून, याबाबतचे मानपत्रदेखील मिळाले आहे. भविष्यात एखाद्याला या चार लघुग्रहांचा अभ्यास करायचा असेल, तर त्यांना या लघुग्रहांची नव्याने शोध घ्यायची गरज पडणार नसल्याचे अक्षतने स्पष्ट केले. ‘आईस लॅण्ड मिशन’वर त्याचे काम सुरू असून यात संपूर्ण भारतातून दोघे जण असून त्यातील एक ठाणेकर ‘अक्षत’ आहे. तेव्हा, अंतराळ प्रकल्प साकारल्यानंतर, ‘नासा’चा ‘प्रशिक्षणार्थी अंतराळवीर’ बनलेल्या ठाण्याच्या या युवा शास्त्रज्ञाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा...
- दीपक शेलार