उद्योगातला संघर्षनायक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2021   
Total Views |

Hemant Gujar_1  


आपल्या परिस्थितीमुळे रडत राहायचं की परिस्थितीला सामोरे जाऊन तिला शरण आणायचं, हे दोन्ही पर्याय मनुष्यासमोर असतात. हेमंत गुजर यांच्यासारखे योद्धे दुसरा पर्याय निवडतात. संघर्षासह दोन हात करुन ‘संघर्षनायक’ म्हणून खऱ्या अर्थाने स्वत:ला सिद्ध करतात.
 
 
ऐंशीच्या दशकामधली घटना. छोट्या हेमंतला सायकल घ्यायची होती. ‘सेकंडहॅण्ड’च होती ती सायकल. किंमत होती १५० रुपये. त्याकाळी दुचाकी गाडी धुण्यासाठी त्याला महिन्याला फक्त ४० रुपये मिळायचे. यावरूनच त्या लहानग्यासाठी ही रक्कम किती मोठी असेल याचा विचार करू शकतो. हेमंतने त्या सायकल मालकाला विनवले की, “एका वर्षात सगळे पैसे फेडेन, पण सायकल तुम्ही द्या.” काय माहीत त्या मालकाला काय वाटले. त्याने हेमंतला ती सायकल दिली. कधी पाच रुपये, तर कधी दहा रुपये असे करत हेमंतने सायकलचे १५० रुपये एका वर्षात चुकविले. हेमंतचा हा प्रामाणिक असा व्यावहारिकपणा त्याला पुढील आयुष्यात खूप कामी आला. या प्रामाणिकपणामुळे निव्वळ दहा वर्षांमध्ये त्याने पाच हजारांच्यावर ग्राहकांना सेवा दिली. हा जिगरबाज मुलगा म्हणजेच ‘राष्ट्रीय केमिकल अ‍ॅण्ड हर्बल पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस’चे सीईओ हेमंत गुजर होय.
 
 
 
१९८२ साली डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली गिरणीकामगारांचा जो संप झाला तो जगातील सर्वाधिक काळ चाललेल्या संपापैकी एक मानला जातो. मात्र, या संपामुळे अनेक गिरणी कामगारांची घरे रस्त्यावर आली. एकेकाळी ऐटीत चालणारा गिरणी कामगार रस्त्यावर आला. व्यसनी बनला. हिराकांत गुजर यांचं कुटुंबसुद्धा असंच रस्त्यावर आलं. पत्नी शशिकला ही चार घरची धुणीभांडी करू लागली. तीन मुले आणि एक मुलगी असा मोठा परिवार होता. पोटापाण्याचे प्रचंड हाल होत होते. भावांमध्ये मोठा असणारा हेमंत हे जवळून पाहत होता. त्यावेळेस वरळीच्या आदर्शनगर महानगरपालिका शाळेत तो शिकत होता. घराला काही आर्थिक हातभार लागावा म्हणून हेमंत सकाळी लवकर उठून दुचाकी, चारचाकी गाड्या धुवू लागला. एक मोटरसायकल धुण्याचे महिन्याला ४० रुपये मिळायचे. एक गाडी महिनाभर धुतली, तर ९० रुपये मिळायचे.
 
 
 
सकाळी गाड्या धुऊन झाल्यानंतर हेमंत घरोघरी हार पोहोचवायचा. त्यानंतर वर्तमानपत्रे विकायचा. हे झाल्यानंतर हेमंत एका डॉक्टरच्या दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून काम करण्यास जायचा. वरळी गावातील डॉ. पी. एम. ठक्कर हे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व. याच डॉक्टरांकडे हेमंत काम करायचा. सकाळचं काम झालं की, दुपारी शाळेत जायचा. शाळेतून घरी आला की, संध्याकाळी पुन्हा दवाखान्यात जायचा. जरी कंपाऊंडर असला तरी हेमंतला दवाखान्याची साफसफाई, स्वच्छता सगळं करावं लागत असे. महिन्याला ३१० रुपये पगार मिळायचा. तेवढाच घरखर्चाला हातभार. हे सगळं करताना हेमंतचं वय होतं अवघं १०-१२ वर्षांचं. जीवनात प्रचंड संघर्ष होता. मात्र, त्याने हार मानली नाही. संघर्ष करत राहिला.
 
 
पुढे माध्यमिक शिक्षण त्याने दादरच्या छबिलदास शाळेतून पूर्ण केलं. दहावी झाल्यावर अकरावी-बारावी त्याने फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून पूर्ण केली. दैनंदिन महाविद्यालयीन शिक्षण आपल्याला परवडणारं नाही, हे तो ओळखून होता. म्हणून त्याने दूरस्थ शिक्षणप्रणालीचा पर्याय निवडला. दिवसभर काम करुन तो शिक्षण घेऊ लागला. असं करता करता त्याने बी.कॉम पूर्ण केलं. दरम्यान, तो गाड्यांचे सर्व्हेक्षणकरणाऱ्या कंपनीत काम करू लागला. त्यानंतर त्याने एका ‘डिटेक्टिव्ह एजन्सी’मध्येसुद्धा नोकरी केली. या नोकरी दरम्यान गुन्ह्यांसंबंधीचे अनेक बारकावे तो शिकला. त्यानंतर शासकीय परवाने त्याने मिळवले व स्वत:चीच गुप्तहेर संस्था सुरू केली. ‘थर्ड आय इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ असे या कंपनीचे नाव होते. या कंपनीच्या माध्यमातून विम्यासंबंधीचे अनेक खोटे दावे त्याने उघडकीस आणले. विमा कंपन्यांना मोठ्या तोट्यातून वाचवले. असे असून श्रमाचे चीज होत नव्हते. विमा कंपन्यांचे लाखो रुपये वाचायचे; मात्र, हेमंतच्या कंपनीला मानधन मिळायचं ते काही हजार रुपयांत.
 
मात्र, खर्च व्हायचा तो अफाट होता. बरं वर पैसे मिळायचे ते तब्बल आठ-नऊ महिन्यांनी. म्हणजे काम करूनसुद्धा न केल्यासारखेच असायचे. अशा पद्धतीने आपल्या कुटुंबाची गुजराण होणार नाही, हे हेमंतला जाणवले. याचवेळी त्याला ‘गोदरेज’ कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. ‘गोदरेज हाय केअर’ ही कंपनी ‘पेस्ट कंट्रोलिंग’ची सेवा द्यायची. या कंपनीमध्ये हेमंतने साडेचार वर्षे काम केले. ‘पेस्ट कंट्रोलिंग’मधले बारकावे शिकून घेतले. पुढे स्वत:ची ‘पेस्ट कंट्रोलिंग’ची कंपनी सुरू करण्याचे त्याने ठरविले. २००९ मध्ये त्यांनी ‘राष्ट्रीय केमिकल अ‍ॅण्ड हर्बल पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस’ नावाने ‘पेस्ट कंट्रोलिंग’ कंपनी सुरू केली. एवढी वर्षे काम करताना साठवलेले पैसे त्यांनी कंपनीत गुंतवले.
 
सुरुवातीला त्यांना कर्मचारी ठेवणे परवडणारे नव्हते. ते स्वत:च मार्केटिंग करायचे. तंत्रज्ञ म्हणून स्वत:च सेवा पुरवायचे. एका मित्राकडून त्यांनी लॅपटॉप घेतला त्यावर ते बिल्स, निविदा तयार करायचे. सर्व काही ‘वन मॅन शो’ सुरू होतं. जेवढं जास्त मार्केटिंग तेवढा जास्त व्यवसाय, हे त्यांनी ओळखलं होतं. पण, मार्केटिंगसाठी पैसा नव्हता. त्यातच त्यांना एक शक्कल सुचली. ओळखीच्या गृहिणी म्हणून घर सांभाळणाऱ्या महिलांना ते फोनवरून मार्केटिंग कसं करावं, याचं प्रशिक्षण देऊ लागले. अशा प्रकारच्या दहा महिला त्यांनी तयार केल्या. या दहा महिला नियमित ‘टेलिकॉलिंग’ करायच्या. यातून व्यवसाय उभा राहू लागला, हळूहळू वाढू लागला. कंपनी घरगुती, व्यावसायिक स्वरुपाच्या ‘पेस्ट कंट्रोलिंग’च्या सेवा देऊ लागली. व्यवसायाचा पसारा वाढला, तसे कर्मचारीदेखील वाढले. कोरोनाचा प्रादुर्भाव होईपर्यंत कंपनीत १५ कर्मचारी कार्यरत होते. आता त्यांची संख्या चार आहे. मात्र, येत्या काही दिवसांत ही संख्या पुन्हा २० होणार आहे.
 
गेल्या १२ वर्षांत कंपनीने पाच हजारांहून अधिक ग्राहकांना सेवा दिलेली आहे. अगदी गुंदेचा गार्डनसारखा टॉवर असो, बँक ऑफ स्कोशा असो वा टू बीएचके/ थ्री बीएचके फ्लॅट. अशा कितीतरी व्यावसायिक आणि निवासी ग्राहकांना ‘राष्ट्रीय केमिकल अ‍ॅण्ड हर्बल पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस’ने सेवा पुरवलेली आहे. झुरळ, उंदीर, ढेकूण, डास यांसारख्या उपद्रवी प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात कंपनी माहिर आहे. मुंबई, ठाण्यासह इतर जिल्ह्यांतसुद्धा कंपनी वाढविण्याचा हेमंत गुजर याचा मानस आहे. कंपनीने ‘डीप क्लिनिंग’ ही सेवा आता सुरू केली आहे. काही हजार रुपयांत संपूर्ण घर स्वच्छ, लखलखित करून देण्याची ग्वाही कंपनी देते. हेमंत गुजर याच्या या उद्योजकीय प्रवासात त्याची पत्नी हर्षदा मोलाची साथ देत आहे. या दाम्पत्यास ओंकार आणि श्लोक असे दोन पुत्र आहेत. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडल्यानेच आपण संघर्षातून यशाची कमान चढत आहोत,” असे हेमंत प्रांजळपणे कबूल करतात. आपल्या परिस्थितीमुळे रडत राहायचं की परिस्थितीला सामोरे जाऊन तिला शरण आणायचं, हे दोन्ही पर्याय मनुष्यासमोर असतात. हेमंत गुजर यांच्यासारखे योद्धे दुसरा पर्याय निवडतात. संघर्षासह दोन हात करुन ‘संघर्षनायक’ म्हणून खऱ्या अर्थाने स्वत:ला सिद्ध करतात.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@