जगातील प्रत्येक देश स्वतःची लष्करी ताकद वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो. त्यामागे जागतिक वा प्रादेशिक वर्चस्व राखणे, देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे आणि शत्रुदेशाच्या मनात जरब बसविणे, अशी अनेक कारणे असतात. तसेच शक्तिसंपन्नतेतूनच शांततेचा मार्ग जातो, असेही म्हणतात.
कारण, ताकदवान व्यक्ती असो वा देश, त्याच्यावर थेट आक्रमण करण्याची हिंमत सहसा कोणीही करत नाही. मात्र, स्वतःची लष्करी क्षमता वाढवितानाच संबंधित देशाच्या नेतृत्वाने आपल्या जनतेचीही काळजी घेतली पाहिजे; अन्यथा, देश शस्त्रसंपन्न आणि जनता मात्र विपन्न, अशी अवस्था निर्माण होते व अशा परिस्थितीत नागरिकांच्या मनात सत्ताधार्यांविरोधात कमालीचा रोष उत्पन्न झाल्याशिवाय राहू शकत नाही.
नुकतीच संपूर्ण जगातील १३८ देशांची लष्करी शक्ती नेमकी किती, हे सांगणारी क्रमवारी ‘ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स २०२१’ जाहीर करण्यात आली आणि त्यानुसार जगातील सर्वाधिक ताकदवान कोण, याचा लेखाजोखा समोर आला. मात्र, लष्करी क्षमता वाढवितानाच कोणत्या देशाने आपल्या जनतेला वार्यावर सोडून दिले, हेही या आकडेवारीवरून जाहीर झाले आणि असा देश अर्थातच आपल्या शेजारचा, अस्तित्वात आल्यापासूनच भारतद्वेषाची भूमिका घेणारा पाकिस्तान हाच आहे.
‘ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स २०२१’नुसार शक्तिशाली देशांच्या आकडेवारीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसर्या क्रमांकावर रशिया, तिसर्या क्रमांकावर चीन आणि चौथ्या क्रमांकावर भारत आहे. भारत याआधीही चौथ्याच क्रमांकावर होता आणि यंदाही भारताने आपले चौथे स्थान ०.१२१४ गुणांसह कायम राखण्यात यश मिळवले. भारतानंतर जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स, ब्रिटन आणि ब्राझीलचा क्रमांक येतो, तर सर्वात मोठा उलटफेर पाकिस्तानच्या बाबतीत झाला.
आपल्या जनतेला कंगालावस्थेत लोटून शस्त्रास्त्रांवर वारेमाप खर्च करणार्या पाकिस्तानचे लष्कर जगात दहाव्या क्रमांकाचे ठरले. पाकिस्तानने आपल्या लष्करावर सुमारे १२.५ अब्ज डॉलर्स इतका पैसा खर्च केला. तत्पूर्वी गेल्यावर्षी पाकिस्तान पंधराव्या क्रमांकावर होता, म्हणजेच त्याने एका वर्षात पाच क्रमांकाची लांब उडी मारली. उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तानने आपल्या क्रमांकात सुधारणा घडवितानाच इस्रायल, कॅनडा, इराण आणि इंडोनेशियाला मागे पछाडले. तसेच पहिल्या १५ देशांमध्ये आपल्या क्रमवारीत सुधारणा करणारा पाकिस्तान हा एकमेव देश आहे.
सदर क्रमवारी लष्करी शक्तीपासून ते आर्थिक आणि परिवहन क्षमता तथा भौगोलिक ताकदीसारख्या ५० निकषांच्या आधारे तयार केली जाते आणि त्यात पाकिस्तानला यंदा ०.२०८३ इतके गुण मिळाले. मात्र, पाकिस्तान एका बाजूला आपल्या लष्करावर प्रचंड खर्च करत असतानाच, तिथे महागाई वाढीचा वेग अफाट असून दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, तर तिथल्या सत्ताधार्यांनी जनतेला आहे त्या बिकटावस्थेत सोडून देण्याचा चंग बांधला आहे.
दरम्यान, भारताचा पाकिस्तान आणि चीनबरोबर तणाव शिखरावर असतानाच ‘ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स’ची यादी समोर आली. भारतासमोर दोन आघाड्यांवर संघर्षाचा धोका घोंघावत आहे. नुकताच चीन आणि पाकिस्तानच्या हवाईदलाने भारताच्या ‘राफेल’ लढाऊ विमानाला शह देण्याचा सराव केला. तथापि, संरक्षण विशेषज्ज्ञांच्या मते, ही क्रमवारी तांत्रिक कौशल्य आणि डिजिटलीकरणाशिवाय केवळ संख्येच्या आधारावर तयार केली आहे. आर्थिक निर्बंध असूनही पाकिस्तान चीनकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे खरेदी करत आहे. त्यात ‘जेएफ १७’ लढाऊ विमाने, पाणबुडी, रणगाडे, गन आणि ‘मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर’ आदींचा समावेश आहे. चीन आण्विक तंत्रज्ञानाचादेखील पाकिस्तानला पुरवठा करत आहे. यामुळे मोठी लष्करी संख्या आणि पॅरामिलिटरी बलामुळे पाकिस्तान अन्य देशांना मात देण्यात यशस्वी झाला.
वरील आकडेवारी व क्रमवारीवरून पाकिस्तानने शस्त्रबळात वरचा टप्पा गाठल्याचे दिसत असले, तरी भारतीय लष्कर पाकिस्तान असो वा चीन, दोन्हीच्या तुलनेत सर्वाधिक सक्षम असल्याचे म्हणावे लागेल. त्याचे कारण भारतीय लष्करातील जवानांमध्ये आपल्या समोर उभ्या ठाकणार्या शत्रूविरोधात लढण्याची असीम क्षमता आहे. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राण तळहातावर घेण्याची उत्कटता भारतीय जवानांव्यतिरिक्त इतरांकडे नाही व याचा प्रत्यय याआधीही आलेला आहे. त्यामुळे भारत अन्य कोणाच्याही तुलनेत वरचढच ठरेल.