महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचा अजब अंदाज
मुंबई (प्रतिनिधी) - महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या रंगाच्या शेकरूचे म्हणजेच 'अल्बिनो' शेकरूचे दर्शन घडले आहे. येथील तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात नागरिकांना हा इवालासा जीव दिसून आला. शेकरू या सस्तन प्राण्याला महाराष्ट्राच्या 'राज्य प्राण्या'चा दर्जा असून त्याचा रंग सामान्यपणे तपकीरी असतो.
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये शेकरू मोठ्या संख्येने आढळतात. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये तर त्यांचे दर्शन सहजरित्या होते. मात्र, गेल्या आठवड्यात याठिकाणी एका वेगळ्या शेकरूचे दर्शन घडले. पांढऱ्या रंगाचा इवलासा शेकरू नागरिकांना दिसला. येथील तहसीलदार कार्यालयाच्या शेजारील भूमिअभिलेख कार्यालयाबाहेर स्थानिक नागरिंकाना हा शेकरू झाडावर खेळताना आढळला. या शेकरूचे शरीर संपूर्णपणे पांढरे, डोळे गुलाबीसर होते. सामान्यपणे शेकरूची पाठ तपकीरी, पिवळसर, छातीकडील भाग पांढरा, लांब मिशा आणि झुपकेदार लांब शेपूट असते. यापूर्वी येथील एमटीडीसीमध्ये देखील अशाच प्रकारचे पांढरे शेकरू दिसले होते. भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत शेकरूला प्रथम श्रेणीत म्हणजे वाघाएवढे संरक्षण मिळाले आहे. शरीरातील रंगपेशींमध्ये बदल झाल्याने प्राण्यांना जन्मजात पांढरा रंग येतो. याला अल्बिनो असे म्हणतात.
अल्बिनो म्हणजे ?
सजीवांमध्ये 'अल्बीनिजम' हा अनुवांशिक आणि जन्मजात असलेला एक प्रकार आहे. यामध्ये त्यांचा शरीरात मेलनिन रंगद्रव्यांचा अभाव झाल्याने पांढरा रंग निर्माण होतो. रंगद्रव्याच्या अभावामुळे पक्ष्यांना अंधत्व, कमकुवत पिसे अशा अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अल्बिनो जीव हे फार काळ जगत नाहीत.
शेकरूविषयी...
शेकरु हा महाराष्ट्रचा राज्यप्राणी आहे. त्याला झाडांवर राहणारी मोठी खारुताई असे देखील म्हटले जाते. सदाहरित, निम सदाहरित व नदी काठच्या जंगलात तो आढळतो. रान आंबा, आंबाडा, किंजळ, रान बिब्बा, हिरडा, नाना, बेहडा, फणस, चांदाडा, उंबर, इ. झाडांवर शेकरुला राहायला आवडते. याच फळांचे अन्न म्हणून तो उपयोग करतो. उंच झाडावर शेकरू घ्ररटे बांधतो. झाडाच्या काटक्या मऊ पानांचा उपयोग करून घुमटाकार आकाराचे घरटे तो तयार करतो. शेकरूचे जीवनचक्र साधारण १५ वर्ष आहे. शेकरूची मादी तीन वर्षात व नर पाच वर्षात वयात येतो. शेकरू एकावेळेस १ ते २ पिलांना जन्म देते. शेकरू फक्त दिवसा सक्रिय असतो.