नितीश कुमारांना शाहनवाझ पर्याय ठरणार ?

    19-Jan-2021
Total Views | 220

sn_1  H x W: 0

नितीश कुमारांना शाहनवाझ पर्याय ठरणार
?



नवी दिल्ली, पार्थ कपोले : बिहारमध्ये पुढील निवडणुकीत स्वबळावर सत्ता आणण्यासाठी भाजप आतापासूनच सक्रिय झाला आहे. त्यासाठी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ते सय्यद शाहनवाझ हुसैन यांना बिहार विधानपरिषदेमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. शाहनवाझ हुसैन यांना बिहारमध्ये भाजपसाठी विजयाचे समीकरण तयार करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

 

नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमारांच्या जदयुचा जनाधार घटल्याचे सिद्ध झाले आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले असले तरीदेखील भाजपला मिळालेले यश आणि राजदच्या तेजस्वी यादव यांनी दिलेली कडवी लढत ही जदयुसाठी डोकेदुखी ठरली आहे. बिहारमध्ये आता भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आला असून यापुढील काळात राज्यात आपला जनाधार आणखी वाढविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. दीर्घकाळ उपमुख्यमंत्री असलेल्या सुशील मोदी यांना राज्यसभेत पाठविण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात भाजपचा चेहरा कोण असेल, ही उत्सुकता होती. मात्र, आता माजी केंद्रीय मंत्री सय्यद शाहनवाझ हुसैन यांना विधानपरिषदेत पाठविण्याचा निर्णय घेऊन भाजपने महत्वाची खेळी केली आहे.

 

शाहनवाझ हुसेन यांनी विधानसभा सदस्यत्वासाठी आपले नामांकन दाखल केले असून त्यांची निवड बिनविरोध होण्याचीच दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे नितीश कुमार सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा समावेश मंत्रिमंडळामध्ये होण्याचेही सांगितले जात आहे. शाहनवाझ हुसैन यांना बिहारमध्ये सक्रिय करण्यामागे अनेक कंगोरे आहेत. सर्वांत महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्यात सुशील मोदी यांच्यानंतर भाजपचा चेहरा म्हणून काम करणे आणि पक्षाचा पाया अधिक मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. त्याचप्रमाणे भाजपचा मुस्लिम चेहरा अशी ओळख असलेल्या हुसैन यांच्याद्वारे राजदच्या मुस्लिम – यादव या समीकरणाला छेद देण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. त्याचप्रमाणे सत्ता मिळाली नसली तरी आपली ताकद दाखवून देणाऱ्या तेजस्वी यादव यांच्या आक्रमकतेला शाहनवाझ हुसैन आपल्या खास शैलीने निष्प्रभ करू शकतात, असाही विश्वास भाजप नेतृत्वाला वाटतो.

 

शाहनवाझ हुसैन हे सर्वप्रथम पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले होते. वाजपेयी सरकारमधील सर्वांत तरुण केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला होता. त्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणूनही ते जबाबदारी निष्ठेने पार पाडत होते. त्यांनी २०१४ साली बिहारमधील किशनगंज मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती, त्यात अवघ्या १० हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर २०१९ साली निवडणूक लढविली नाही, मात्र त्यानंतर ते राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम करीतच होते. अतिशय शालीन स्वभाव आणि उत्कृष्ट वक्तृत्व त्याचप्रमाणे दीर्घकाळ केंद्र सरकारमध्ये कोणतीही जबाबदारी मिळाली नसतानाही पक्षासोबत एकनिष्ठ राहणे, हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले आहे.

 
 

snn_1  H x W: 0 

मी पक्षाचा एकनिष्ठ स्वयंसेवक – शाहनवाझ हुसैन

माझ्या राजकारणाचा प्रारंभ हा बिहारमधूनच झाला आहे. खासदार आणि पक्षाचा केंद्रीय पदाधिकारी या जबाबदाऱ्या मी बिहारमधूनच सांभाळल्या आहेत. आता केंद्रीय नेतृत्वाने मला बिहार विधानपरिषदेत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे आणि पक्षाचा आदेश मी स्विकारला आहे. मला बिहारमध्ये पाठविण्यात येईल, याची मलादेखील कल्पना नव्हती. मात्र, पक्षाचा आदेश माझ्यासाठी सर्वोच्च आहे; मी १९८६ पासून पक्षाचा एकनिष्ठ स्वयंसेवक, कार्यकर्ता आहे. पक्ष सांगते की काश्मीरला जा, तर मी काश्मीरला जातो. आता बिहारमध्ये जाण्यास सांगितले तर तोदेखील आदेश मी स्विकारला आहे, अशी प्रतिक्रिया शाहनवाझ हुसैन यांनी दैनिक ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली.

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121