राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आणि हरित उर्जानिर्मितीवर भर - आदित्य ठाकरे

    11-Jan-2021
Total Views | 140
aditya _1  H x


हवामान बदलाचा सामना करण्यासाठी निर्णय 

मुंबई - पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने राज्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जेच्या निर्मितीला चालना देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. आज परिवहन क्षेत्रातील विविध भागधारकांसमवेत ठाकरे यांची कार्यशाळा संपन्न झाली. राज्यातील महामार्ग हे सौरउर्जेवर आणणे, मुंबईतील बेस्टमध्ये पुढील पाच वर्षात साधारण ३० टक्के इलेक्ट्रीक बसेस आणणे यासह विविध उपाययोजना राबवून पर्यावरण संवर्धनास चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हवेचे प्रदुषण कमी करण्याच्या अनुषंगाने शासनामार्फत इलेक्ट्रीक वाहनांना येत्या काळात प्रोत्साहन दिले जाईल, असेही ते म्हणाले. 
 
 
इलेक्ट्रीक वाहन तंत्रज्ञानाच्या जलद अवलंबनासाठी आणि महाराष्ट्र वाहन धोरणामध्ये सुधारणा करण्यासाठी विविध भागधारकांसमवेत आज सह्याद्री अतिथीगृहामध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे आयोजन राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, जगात उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर वाढत्या तापमानामुळे बर्फ वितळला किंवा तापमानात बदल झाला तरच अशा वेळी त्याला आपण हवामानातील बदलाचे परिणाम असल्याचे म्हणतो. परंतु, आपल्याकडे येणारे महापूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळे हे सुद्धा वातावरणातील बदलाचेच परिणाम आहेत. राज्यात मागील एका वर्षात या आपत्तीग्रस्तांना १३ हजार कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले. यापुढील काळात पर्यावरणातील बदलांमुळे येणाऱ्या अशा आपत्ती रोखण्यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने व्यापक मोहीम हाती घ्यावी लागेल. याचाच एक भाग म्हणून पुढील ५ वर्षात राज्यात इलेक्ट्रीक वाहने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


परिवहन मंत्री ॲड. अनिल परब म्हणाले की, आपल्याला ई-मोबिलीटीवर जायचे असेल तर मोठ्या प्रमाणात वीजेची गरज भासणार आहे. पण विजेची गरज भागवताना ती हरित उर्जा कशी असेल यावर लक्ष द्यावे लागेल. एसटीमध्ये सध्या इंधनावर सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा खर्च होतो. पण इलेक्ट्रीक बसेस वापल्यास या खर्चात मोठी बचत होणार आहे. सध्या एसटी संकटात असून त्याला वाचविण्यासाठी ‘गो ग्रीन’कडे वळल्याशिवाय पर्याय नाही. याअनुषंगाने येत्या काळात एसटीमध्येही इलेक्ट्रीक बसेसच्या वापराला चालना देण्यात येईल. पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर म्हणाल्या की, आता इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरास मोठ्या प्रमाणात चालना देण्याची वेळ आली आहे. यासाठी राज्यात टास्क फोर्सची स्थापनाही करण्यात आली आहे. देशात सुमारे ८० टक्के वाहने ही दुचाकी आहेत. यापुढील काळात इलेक्ट्रीक दुचाकी वाहनांच्या वापरास प्राधान्याने चालना देता येईल. तरुणांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांविषयी कुतुहल निर्माण होईल व ते याचा वापर करतील यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यशाळेत दिवसभर झालेल्या चर्चेत टाटा मोटर्सचे सुशांत नाईक, ओलेक्ट्राचे शरथ चंद्रा, टीव्हीएस मोटार्सचे कमल सूद, उबेरचे महादेवन नंबियार, युलुचे श्रेयांश शहा, ॲम्बिलिफी मोबिलीटीचे चंद्रेश सेठीया, व्हीजन मेकॅट्रॉनिक्सच्या राशी गुप्ता, ऑक्टीलियन पॉवर सिस्टीम्सचे यशोधन गोखले, युमिकोअरचे केदार रेले आदींनी सहभाग घेत इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरास चालना देण्याच्या अनुषंगाने विविध विषयांवर माहिती दिली. 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121