सत्यशोधन समितीच्या अहवालानुसार, बंगळुरुतील दंगल फेसबुक पोस्टने झाली नाही, तर ती पूर्वनियोजित, संघटित आणि हिंदूंमध्ये दहशत माजवण्यासाठी घडवण्यात आली. दंगलखोरांनी हिंदू व्यक्ती, हिंदूंमधील प्रमुख व्यक्ती व हिंदूंच्या घरांना ठरवून लक्ष्य केले. जेणेकरुन भीतीची पेरणी करुन हिंदूंनी घरदार सोडून पलायन करावे व संपूर्ण परिसर मुस्लीम बहुल व्हावा.
ऑगस्टच्या दुसर्या आठवड्यात बंगळुरुत झालेल्या दंगलीनंतर ती उत्स्फूर्तपणे आणि मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्याने अचानक उसळल्याचे सांगितले गेले. तसेच दंगलीत स्थानिक मुस्लिमांऐवजी बाहेरुन आलेल्या वा आणल्या गेलेल्यांचा सहभाग होता, असेही म्हटले गेले. डाव्या उदारमतवादी किंवा धर्मनिरपेक्षतावाद्यांनी तर कहर करत मंदिराभोवती कडे करुन उभ्या ठाकलेल्या मुस्लिमांचा एक व्हिडिओ फडकावत, पाहा ते किती सहिष्णु, असेही सांगितले. मात्र, बंगळुरुतील दंगलीची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीने प्रत्यक्ष दंगल झाली त्या ठिकाणाला भेटी देऊन, दंगलीतील पीडितांशी संवाद साधून या सगळ्याचीच व्यवस्थित माहिती घेतली व त्यातून अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाला. कर्नाटकची राजधानी बंगळुरु शहरात उसळलेल्या दंगलीचे सत्य आणि तथ्य समोर आणण्यासाठी ‘सिटिझन फॉर डेमोक्रसी’ने निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीकांत बबलादी यांच्या अध्यक्षतेखाली माजी न्यायाधीश, पत्रकार, निवृत्त अधिकार्यांसह एका सत्यशोधन समितीचे गठन केले होते. नुकताच या समितीने आपला सत्यशोधन अहवाल कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याकडे सुपूर्द केला व त्यानंतर ऑनलाईन पत्रकार परिषदेत पत्रकारांना यासंबंधीची माहिती दिली.
सत्यशोधन समितीच्या अहवालानुसार बंगळुरुतील दंगल काँग्रेस आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या भाच्याने फेसबुकवर इस्लाम धर्माशी व महम्मद पैगंबराशी संबंधित अवमानजनक पोस्ट केल्याने झाली नाही, तर बंगळुरुतील ही दंगल पूर्वनियोजित, संघटित आणि धार्मिकदृष्ट्या प्रेरित होती. शहरातील विशिष्ट भागातील हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी ही दंगल घडवण्यात आली. चालू वर्षाच्या फेब्रुवारीत दिल्लीत झालेली दंगल आणि ऑगस्टमध्येच स्वीडनमधील माल्मो शहरात झालेली दंगल यात समानता असल्याचेही सत्यशोधन समितीला आढळले. समितीला आढळले की, अनेक स्थानिक मुस्लिमांचा बंगळुरुतील दंगल घडवण्यात सहभाग होता आणि त्यांना असे काही होणार असल्याची पूर्वकल्पनादेखील होती. दंगलीची योजना आखणार्यांनी आपले षड्यंत्र राजकीय लढ्याच्या किंवा प्रतिस्पर्धेच्या रुपात सादर करण्याचे प्रयत्न केले, परंतु, तरीही, ही दंगल निःसंशय धार्मिक किंवा हिंदुविरोधाने प्रेरित होती. घरांवरील हल्ले, दगडफेक, जाळपोळ आणि निवडक व्यक्ती, त्यांची घरे यांना लक्ष्य करण्याचे प्रकार पाहता दंगलीचा उद्देश भीतीची-दहशतीची पेरणी करुन परिसरातील लोकसंख्या संतुलन बिघडवण्याचाही असू शकतो, जेणेकरुन हा संपूर्ण परिसर मुस्लीम बहुल व्हावा, असे या अहवालात म्हटले आहे.
समितीच्या मते, या दंगलीमध्ये सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया-एसडीपीआय आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया-पीएफआय या दोन संघटनादेखील सामील होत्या. दंगलखोरांनी आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती आणि नवीन दोघांच्याही घरावर हल्ला केला. नवीन यांच्या घरात कोणीही सुरक्षा कर्मचारी नसल्याने दंगलखोर त्याच्या घरात घुसू शकले आणि तिथेही त्यांनी तोडफोड केली. नवीनच्या घरच्यांनी तात्काळ शेजार्यापाजार्यांच्या घरात शिरुन आपला जीव वाचवला. याचवेळी दंगलखोरांनी पेट्रोल बॉम्ब, दगड, लोखंडी सळ्यांनी घरातच विध्वंसाला सुरुवात केली. दंगलखोरांनी केरोसिन, पेट्रोल आणि ज्वलनशील पदार्थांचा वापर करत घराला आग लावली. दंगलखोरांनी हिंदू व्यक्ती, हिंदूंमधील प्रमुख व्यक्ती व हिंदूंच्या घरांना ठरवून लक्ष्य केले. हिंदूंच्या घरांव्यतिरिक्त दोन पोलीस ठाण्यांवरही दंगलखोरांनी हल्ला केला. केजी हल्ली पोलीस ठाण्याचे काही प्रमाणात तर डीजे हल्ली पोलीस ठाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अहवालातील माहितीनुसार दंगलखोरांनी ‘अल्लाह हू अकबर’ आणि ‘नारा-ए-तकबीर’च्या घोषणा देत हल्ला केला. दंगलीची वेळदेखील पोलिसांच्या दिवसपाळी व रात्रपाळी अशाप्रकारे ड्युटी चेंज होण्याची होती.
अहवालातील माहितीनुसार, दंगलीची पद्धती दिल्ली आणि स्वीडनसारखीच आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात समिती सदस्यांनी सांगितले की, दिल्ली दंगलीआधी शाहिन बागेत मुस्लीम महिलांनी आंदोलन चालवले होते व त्याचवेळी त्याला समांतर असे बंगळुरुतील महिलांनी बिलाल बागेत आंदोलन केले होते. म्हणजेच आधी महिलांना पुढे केले, मानवी आधारावर सहानुभूतीची भावना जागवली आणि नंतर दंगल घडवण्यात आली. यामुळेच राज्य सरकारने दंगलीचा व्यापक स्तरावर तपास केला पाहिजे. तसेच अशा सांप्रदायिक तणावांचा सामना करणार्या संभावित परिसरांना पोलिसांनी चिन्हित केले पाहिजे, असा सल्लाही समितीने दिला आहे. सोबतच अशा प्रकारच्या तणावावर अंकुश लावण्यासाठी दीर्घकालीन योजना तयार केली पाहिजे. अहवालात म्हटले की, माहिती तंत्रज्ञान कायदा, २०००च्या कलम ६६अ च्या उन्मूलनाबरोबरच कोणत्याही धर्म, जात, वर्ग, संघटना वा संप्रदायाच्या लोकांना लक्ष्य करणार्या अपमानजनक आणि घृणास्पद माहितीला रोखण्यासाठी व त्यांवर खटला चालवण्यासाठी एक तंत्र विकसित केले पाहिजे. तसेच दंगलखोर जमावाकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर हत्यारे, पेट्रोल बॉम्ब इतक्या कमी वेळात कशाप्रकारे आले, याचाही तपास केला पाहिजे. पीएफआय आणि एसडीपीआयच्या गतिविधींवर पाळत ठेवण्याव्यतिरिक्त कर्नाटक सरकारने राज्यातील धार्मिक अतिवादाच्या स्रोताचे अध्ययन करण्यासाठी एका समितीचे गठन करायला हवे, असेही सत्यशोधन समितीने म्हटले आहे. राज्यातील प्रमुख शहरांतील लोकसंख्या बदलाचा अभ्यास केला पाहिजे आणि दंगलीतील अवैध स्थलांतरितांच्या भूमिकेची चौकशी केली पाहिजे.
प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे काय?
दरम्यान, नवीन कुमारचे वडील पवन कुमार यांनी समितीला सांगितले की, आमच्या डोळ्यासमोर झालेल्या हल्ल्यामुळे मी, माझी पत्नी, मुलगी आणि तिची मुले आम्ही सर्वच घाबरलो. दंगलखोरांपासून जीव वाचवण्यासाठी आम्ही घराच्या पहिल्या मजल्यावर गेलो आणि तिथल्या मागच्या दरवाजाने आम्ही शेजार्यांच्या घरावर उड्या मारल्या व तिथे आश्रय घेतला. ते म्हणाले की, जमावाने आमच्या घरासमोर एकजुट होऊन पेट्रोल बॉम्ब फेकले आणि घरात, सोफ्यावर, फर्निचरवर केरोसिन फेकून सारीकडे आग लावली. हल्ल्यावेळीच दंगलखोरांनी फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कागदपत्रे जाळून टाकली. तसेच पाच लाखांची रोख रक्कम आणि पत्नीचे दागिनेही लुटले. कर्नाटक रक्षा वेदिकेचे सदस्य अरुण गौडा आपल्या आठ महिन्याच्या गर्भवती पत्नीसह तिथे उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, माझ्या घरावर आमच्याच भागातील मुस्लीम युवकांनी हल्ला केला होता.
११ ऑगस्टच्या रात्री नेमके काय झाले होते?
पुलकेशीनगरचे काँग्रेस आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांचा भाचा पी. नवीन याने समाजमाध्यमावर कथितरित्या इस्लामचा अपमान करणारी व महम्मद पैगंबराबाबत वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यानंतर डीजे हल्ली आणि आसपासच्या परिसरात ११ ऑगस्टच्या रात्री हिंसाचाराला सुरुवात झाली. दंगलखोरांनी आमदाराचे घरात तोडफोड केली, आग लावली तसेच डीजे हल्ली पोलीस ठाण्यावरदेखील हल्ला केला. दंगलीवेळीच जमावाने पोलिसांची वाहने तथा अन्य खासगी वाहनांनादेखील जाळून टाकले. नंतर पोलिसांकडून आतापर्यंत या हिंसाचारात सहभागी असलेल्या ३००पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचारादरम्यान झालेल्या नुकसानाची भरपाई दंगलखोरांकडून करण्यात येईल, असे राज्य सरकारने म्हटले आहे. दरम्यान, सत्यशोधन समितीच्या अहवालातील अंदाजानुसार हिंसाचारावेळी 36 सरकारी वाहने, जवळपास ३०० खासगी वाहने आणि अनेक घरांची तोडफोड करण्यात आली. समितीच्या दाव्यानुसार दंगलीत १० ते १५ कोटी रुपयांचे नुकसान झाले.
समितीच्या अहवालातील ठळक मुद्दे
* बंगळुरुतील दंगल पूर्वनियोजित आणि संघटित होती
* दंगलीमध्ये स्थानिकांचादेखील सक्रिय सहभाग होता
* बहुसंख्यक हिंदूंंमध्ये दहशत माजवण्यासाठी दंगल घडवण्यात आली, जेणेकरुन त्यांनी तिथून पलायन करावे आणि संपूर्ण परिसर मुस्लीम बहुल व्हावा
* धर्म, जात, वर्ग, संघटना वा संप्रदायाला लक्ष्य करणार्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी स्वतंत्र तंत्र विकसित केले पाहिजे.
मंदिर वाचवणार्या मानवी कड्याचे वास्तव
बंगळुरुतील दंगलीनंतर मुस्लीम युवक परिसरातील मंदिर वाचवण्यासाठी त्याभोवती कडे करुन उभे राहिल्याचा एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. यामुळे मुस्लिमांच्या सहिष्णुतेचे कौतुकही करण्यात आले. पत्रकार परिषदेवेळी याबाबतही प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा समिती सदस्यांनी उत्तर दिले की, दंगलखोरांची ही रणनीती होती. कारण, याच व्हिडिओत ‘जल्दी व्हिडिओे ले लो’ असा आवाज ऐकू येतो. ही घाई कशासाठी होती? तसेच दंगलखोर मंदिराचा बचाव कोणापासून करत होते, तर हिंसाचार माजवणार्या मुस्लिमांपासूनच ना. तसेच मंदिर व त्यातील मूर्तींनाच वाचवायचे होते तर मग काँग्रेस आमदार आणि त्यांच्या भाच्याच्या घरातही देवघर आणि देवाच्या मूर्ती होत्या. पण त्यांची तर दंगलखोरांनी तोडफोड केली, तिथे विध्वंस केला. परमेश्वर तर दोन्ही ठिकाणी होता. तरी दंगलखोरांनी असा प्रकार केला. यावरुनच त्यांची रणनीती सारे काही करुन सवरुन, आम्ही नाही त्यातले किंवा आम्ही किती सहिष्णु वगैरे दाखवण्याची असल्याचे समजते.