पाकचे कारनामे अपयशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2020   
Total Views |
UN _1  H x W: 0





पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारतीयांविषयी दहशतवादी असल्याचा ठराव यावा, याकरिता प्रयत्न केले. पाकिस्तानचा प्रयोग केवळ अपयशीच ठरला नाही, तर पाकिस्तानला मिळालेला हा तिसरा दणका आहे. यापूर्वी बालकोट एअर स्ट्राईक, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला दहशतवादी घोषित करणे आणि जम्मू-काश्मिरात भारताचे संविधान लागू करण्याचा निर्णय. संबंधि तिन्ही विषयांवरून पाकिस्तान छाती बडवून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ‘या अल्लाह, या अल्लाह’ करीत होता. आता या ताज्या पराभवाने पाकचे नकटे नाक पुन्हा एकदा कापले गेले आहे.


अफगाणिस्तानात कार्यरत असणार्‍या अतिरेक्यांची यादी तयार करून त्यांना ‘दहशतवादी’ म्हणून घोषित करण्यात येते. दहशतवाद्यांच्या त्या यादीला ‘१२६७’ म्हणतात. ‘१२६७’ या समितीकडून या नावांना अंतिम मान्यता दिली जाते. १९९९ साली पहिल्यांदा या समितीची स्थापना करण्यात आली. समितीला ‘१२६७’ म्हणायचे कारण म्हणजे सुरक्षा परिषदेच्या ठराव क्र. १२६७ नुसार या समितीची स्थापना झाली आहे. ‘१२६७’ ने ओसामा आणि मुख्यत्वे तालिबान यांच्या कारवायांवर बंधने लादण्यात आली. ओसामा हा तेव्हा विश्वविख्यात दहशतवादी होता. ‘९/११’च्या हल्ल्यानंतर या समितीचे महत्त्व आणखी वाढले. तालिबानच्या नियंत्रणात असलेल्या भूप्रदेशावर अतिरेक्यांना प्रशिक्षण मिळणे बंद झाले पाहिजे, दहशतवाद्यांचा पैसा बँकांच्या माध्यमातून नियमित करणे बंद व्हायला हवे, अशी बंधने या ठरावाने निश्चित केली. त्यातच अफगाणिस्तानात कार्यरत असलेल्या अतिरेक्यांची यादी तयार करणे हा एक प्रकार त्यासोबतचाच. सध्या ज्या यादीत काही भारतीय नावे असावीत, याकरिता पाकिस्तानकडून जे प्रयत्न झाले, ते याच यादीसंदर्भात.


संयुक्त राष्ट्र आणि त्यांची सुरक्षा परिषद यांच्या इतर कामकाजाप्रमाणे ही यादी बनविण्याची प्रक्रियादेखील वादग्रस्त राहिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या कायदेविषयक कामकाज विभागाने यादी तयार करण्याच्या पद्धतीची चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा अहवाल २००६ साली प्रसिद्ध करण्यात आला. सुरक्षा परिषदेच्या यादी तयार करण्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर लगोलग सुरक्षा परिषदेने यादीतील नाव वगळण्यासाठी एक पद्धत जाहीर केली. त्यानुसार एखाद्या व्यक्तीचे नाव जर ‘१२६७’ यादीत आले असेल, तर त्याला स्वतःचे नाव कमी करण्यासाठी अर्ज दाखल करून सुनावणीविषयी तरतूद करण्यात आली. २००६ पर्यंत यादीत समाविष्ट करण्याविषयीची प्रक्रियादेखील सार्वजनिक करण्यात आलेली नव्हती.

तूर्त ही यादी चर्चेत आहे, पाकिस्तानच्या झालेल्या पराभवामुळे. दोन भारतीयांचे नाव या यादीत येण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील होता. सुरक्षा परिषदेने मात्र भारतीयांना ‘१२६७’ यादीत सामावून घेण्यास नकार दिला. संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी त्रिमूर्ती यांनी ट्विट करून सुरक्षा परिषदेचे आभार मानले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचा मात्र तीळपापड झाला आहे. भारतीयांची नावे यादीत आल्याने भारतही दहशतवादी कारवायात गुंतलेला आहे, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरु आहे. कुलभूषण जाधव यांना अटक करून तेच दाखवून देण्याचा प्रयत्न पाकने केला होता. परंतु, कुलभूषण जाधव प्रकरणात पाकला चपराक खावी लागली आहे. आता ‘१२६७’ च्या बाबतही असाच प्रकार पाकसोबत घडला. या कारनाम्यानंतरतरी पाकच्या कुरापती थांबतील, इतका आशावाद आपण व्यक्त करू शकतो.




@@AUTHORINFO_V1@@