मुंबई : सिनेअभिनेत्री कंगना राणावतच्या घरावर सूडबुद्धीने बुलडोजर फिरवणारी मुंबई महापालिका आणि संजय राऊत यांच्यावर दिवसेंदिवस नाचक्की ओढवते आहे. बेकायदेशीर तोडकामाविरोधात कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयात उत्तर दाखल करण्यास अजूनही पालिका आणि राऊतांच्या बाजूने टाळाटाळ सुरू आहे. पालिकेच्या वकिलाने गुरुवारी आणखीन दोन दिवसांचा वेळ न्यायालयाकडे मागितला. त्यावर न्यायाधीशांनी "एरव्ही तुम्ही खूप फास्ट आहात", असा टोला लगावला.
कंगना राणावतच्या ऑफिसवर चोविस तासांची नोटीस देऊन बुलडोजर लावण्यात आला होता. ती दृश्ये सर्वांनी पाहिली. शिवसेनेच्या मुखपत्रातून "उखाड दिया.." असे छापून त्याचे समर्थन करण्यात आले होते. पालिकेने कारवाई करीत असताना पुरेसा वेळ कंगनाला दिलेला नव्हता. तसेच कोव्हिड काळात कोणतीही कारवाई पालिकेने करू नये तसे अत्यावश्यक परिस्थितीत कारवाई करायची असल्यास न्यायालयाकडून आदेश घ्यावेत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र कंगना राणावतच्या ऑफिसवर कारवाई करताना पालिकेने न्यायालयाच्या आदेशाकडे कानाडोळा केला. कंगनाच्या वतीने मुंबई महापालिका आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. मात्र आता कंगनाच्या याचिकेला उत्तर दाखल करताना चांगलीच तारांबळ उडालेली आहे. पालिका न्यायलयाकडे वेळ मागून घेते आहे. गुरुवारी पुन्हा दोन दिवसांचा वेळ पालिकेच्या वकीलांनी मागितला. त्याअनुषंगाने न्यायमूर्ती एस. जे. काथावाला यांनी पालिकेला बोल लावले आहेत. कंगनाच्या वतीने नुकसानभरपाईचा दावाही करण्यात आल्याचे समजते. तसेच संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी भविष्यात सुनावणीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.