गेल्या काही महिन्यांत मुंबईत कोरोनामुळे वैद्यकीय कचर्याची व्याप्ती नेहमीपेक्षा तिप्पट झाली आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने या कचर्याची योग्य ती प्रक्रिया करुन विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
मुंबईतील अनेक रुग्णालयांमधील वैद्यकीय कचर्याची सध्या अशास्त्रीय वा असमाधानकारक पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. ‘कोरोनामुळे तयार झालेला व रुग्णालयातील नेहमीचा घनकचरा वेगवेगळा केला जात नाही. दोन्ही प्रकारच्या घनकचर्याची सरमिसळ करून ते मिश्रण कचराभूमीवर फेकून दिले जाते. त्यामुळे या वैद्यकीय कचर्यावर माशा, कीटक आणि उंदीर आकर्षित होऊन, साथीचे रोग फैलावण्याची शक्यता बळावली आहे.
वैद्यकीय कचर्यातील सीरिंज, सुया, आयव्ही संच आणि काचेच्या बाटल्यांसारखे इतर सामान हे बहुतांशी योग्य पद्धतीने जंतुविरहित न करता पुन्हा विकल्याच्या घटनाही गेल्या काही काळात निदर्शनास आल्या आहेत. तसेच अनेक रुग्णालयांत शास्त्रीय पद्धतीने वैद्यकीय कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणेची वानवा दिसून येते.
कोरोनाकाळातील असा हा धोकादायक असलेला वैद्यकीय कचरा जवळच्या गटारात, रस्त्यावर वा पाण्यात फेकून दिल्याच्या धक्कादायक घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे रोगराई फैलावण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई महानगरपालिकेची एकच जैववैद्यकीय घनकचरा जाळण्याची भट्टी (incinerator) देवनारला कार्यरत असून तेथेच या वैद्यकीय घनकचर्यावर जाळण्याची प्रक्रिया करार केलेल्या कंपनीकडून केली जाते. मात्र, या भट्टीतल्या काळ्या धुरामुळे डम्पिंग ग्राऊंडजवळील स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
मुंबईतील वैद्यकीय कचर्याची व्याप्ती
पालिकेच्या घनकचरा विभागाकडून मार्च ते जुलै या काळाकरिता किती किलोग्रॅम जैववैद्यकीय घनकचरा तयार झाला, ते ‘कोविड-१९’ व विलगीकरण कक्षातील घनकचर्याची व्याप्ती अनुक्रमाने खाली दर्शविले आहे –
२०२० मार्च (२८६, शून्य)
एप्रिल (३३०४, ४४७)
मे (७१६९, ८१५)
जून (८३१८, ७६१)
२५ जुलैपर्यंत (९२२५, २८४०)
मुंबईमध्ये ‘कोविड-१९’ जुलै महिन्यातील घनकचर्याची रोजची व्याप्ती एप्रिल महिन्यातील व्याप्तीच्या तिप्पट आणि मार्च महिन्यातील १२ दिवसांच्या रोजच्या व्याप्तीच्या ४२ पट जमली आहे.
जैववैद्यकीय घनकचर्याची व्याप्ती कोणत्या प्रमाणात झाली ?
मार्च - ३ लाख, ४८ हजार, १३९ किलो. रोजची सरासरी ११ हजार, २३० किलो
एप्रिल - ३ लाख, ८० हजार, २५५ किलो. रोजची सरासरी १२ हजार, ६७५ किलो
मे - ५ लाख, ४६ हजार, ५८१ किलो. रोजची सरासरी १७ हजार, ६३१ किलो
जून - ६ लाख, ६० हजार, ६९९ किलो. रोजची सरासरी २२ हजार, ०२३ किलो
१५ जुलैपर्यंत - १ लाख, ९२ हजार, १५३ किलो. रोजची सरासरी १३ हजार, ७२५ किलो
वरील आकडेवारी बघितल्यावर जूनमध्ये कोविड घनकचर्याची व्याप्ती सर्वाधिक असल्याचे दिसते. तसेच जुलै महिन्यापासून ती व्याप्ती कमी होऊ लागली आहे.
देवनार कचराभूमीची सद्यस्थिती
कोरोनापूर्वीच्या काळातही घनकचर्याच्या विल्हेवाटीवरुन देवनार कचराभूमी पालिकेला अडचणीचीच ठरली आहे. कित्येक वर्षे देवनार कचराभूमीचा क्षमतेपेक्षा जास्त वापर केला गेला. पण, तरीही ही कचराभूमी बंद करण्यात पालिकेला अपयश आले आहे. म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने ही स्थिती तपासण्यासाठी एक समिती नेमली होती. मुंबई शहरातील जैववैद्यकीय घनकचर्याची वेगळ्या ठिकाणी विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने देवनारला भट्टीचे प्रक्रिया केंद्र उभारले. या केंद्राची क्षमता दिवसाला २४ टनाची आहे. कोरोना-पूर्व काळात हे प्रक्रिया केंद्र संपूर्णपणे क्षमतेने वापरले जात नव्हते व त्यावेळी मुंबईत रोजचा जैववैद्यकीय घनकचरा १० ते १७ टनांच्या आसपास होता आणि त्या घनकचर्यावर या देवनारच्या केंद्राच्या ठिकाणी प्रक्रिया केली जात असे. त्यावेळीही स्थानिक रहिवाशांना अनारोग्य स्थिती सहन करावी लागायची, म्हणून पालिकेकडे तक्रारींचा पाऊस पडला. पण, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तसेच पालिकेकडून देवनारच्या कचर्यातून विद्युतनिर्मितीचे असफल प्रयोग होत आहेत. कारण, मुंबईतील घनकचरा परदेशातील कचर्यासारखा जास्त कॅलरीचा नसतो, म्हणून त्यापासून सहजासहजी वीजनिर्मिती होऊ शकत नाही, असा सल्ला काही तज्ज्ञांनी दिला आहे.
आता ‘कोविड’चा वैद्यकीय कचराही देवनार कचराभूमीवरील केंद्रावरच प्रक्रियेकेरिता पाठविला जातो. या कचर्यात वापरलेले मास्क, पीपीई किट शिवाय हॉस्पिटलमधील सीरिंज, रक्तांनी व्यापलेली फडकी, टिश्यूज वा कापसाचे बोळे, रक्त वा युरिन बॅग, औषधे, इन्ट्राव्हिनस संच वा ट्यूब, बॅण्डेेज, जोडलेल्या सुया, ग्लोव्हज यांचा प्रामुख्याने समावेश असतो. पाच महिन्यांच्या टाळेबंदीनंतर बाधित व्यक्तींची संख्या ३१ ऑगस्टला १ लाख, ४५ हजार होती. (यात मृत्युमुखी पडलेले ७,६५५ आणि १ लाख, १० हजार बरे झालेल्यांचा समावेश आहे). या बाधित व्यक्तींच्या उपचारांतून साहजिकच मोठ्या प्रमाणावर जैववैद्यकीय घनकचरा तयार झाला. टाळेबंदी सुरू झाल्यानंतर मुंबईतील रुग्णालयांमधील आणि विलगीकरण कक्षामधील ‘कोविड-१९’चा घनकचरा पालिकेने ट्रकने जमवायला व त्यावर प्रक्रिया करायला सुरुवात केली. हा कचरा मार्च महिन्यात ३.४८ लाख किलोग्रॅम इतका झाला. जैववैद्यकीय घनकचर्यावर प्रक्रिया करणार्या एसएमएस इव्होकेम कंपनीला पालिकेने आदेश दिला की, या घनकचर्यावरही योग्य प्रक्रिया करायची आहे. त्यांच्या कराराप्रमाणे कंत्राटात किलोग्रॅम कचर्याला रु. १५ दर होता, तो त्या कंपनीनी या जादा घनकचर्याकरिता रु. १०० प्रतिकिलोला मागितला. कारण, हा जैविक कचरा अनेक ठिकाणांहून जमा करायचा होता. पालिकेने रु. ९७ प्रतिकिलोला होकार दिला. मार्चमध्ये रोजचा सरासरी ११,२३६ किलो, एप्रिलमध्ये रोजचा सरासरी १२,६७५ किलो, मेमध्ये रोजचा सरासरी १७,६३१ किलो, जूनमध्ये रोजचा सरासरी २२,०२३ किलो भरला. मुंबईत दिवसाला ८४ टन जैववैद्यकीय घनकचरा जमा होऊ लागला. ‘के पूर्व’ अंधेरी, ‘के पश्चिम’ अंधेरी व जुहूमध्ये व ‘एम पश्चिम’ चेंबूर भागात जास्त कोविड घनकचरा म्हणजे नऊ हजार किलो जमतो व ‘पी दक्षिण’ मालाडमध्ये सहा हजार किलो वैद्यकीय कचर्याची निर्मिती होते.
मुंबई महानगरपालिकेच्या दाव्यानुसार त्यांनी ‘कोविड’ घनकचर्याची योग्य विल्हेवाट लावण्याकडे लक्ष दिले आहे. नायर रुग्णालयामध्ये १,०४३ बेड्स व ११० आयसीयु बेड्स आहेत. नायर रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी सांगितले की, प्रत्येक रुग्णालयामध्ये कचरा जाळण्याकरिता भट्टी हवी. कारण, हा कोविड कचरा अनेक ठिकाणी हलविणे धोकादायक ठरु शकते. परंतु, पालिकेने सांगितले की, सध्या देवनारला भट्टी आहे, तिथेचा हा ‘कोविड’ कचरा न्यावा. जास्त असला तर गोवंडीला कचरा वेगळा करण्यासाठी भूखंडाची व्यवस्था होऊ शकेल. पण, सध्या तरी दुसर्या प्रक्रिया भट्टीकेंद्राचा विचार नाही. कस्तुरबा रुग्णालयामध्ये सध्या ५०० किलोकरिता भट्टी आहे, तशी ती इतर ठिकाणी नाही. २० टन वैद्यकीय कचर्याच्या विनियोगाकरिता नवी मुंबईमध्ये तळोजा येथे ३० भट्ट्या बांधता येतील, असेही समजते.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाची नियमावली
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाच्या नियमावलीनुसार, पिवळ्या बॅगमध्ये कोविड घनकचरा भट्टीत नष्ट करण्यासाठी द्यावा. विलगीकरण विभागातील शहरांतील घनकचरा काळ्या बॅगेत तो जंतुविरहित करून खोलवर जमिनीत गाडावा. कोरोना रुग्णाने वापरलेल्या वस्तू जसे की, मास्क, ग्लोव्हज, प्लास्टिक बाटल्या या लाल पिशव्यांमध्ये ठेवाव्या. त्या निर्जंतुक करून परत वापरण्याकरिता द्याव्यात.
घरच्या घरी ‘कोविड’ कचर्याची विल्हेवाट
घरी साठलेल्या कोविड घनकचर्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने करावी, अन्यथा कुटुंबाला वा आजूबाजूच्या रहिवाशांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. या घनकचर्यात पुढे दिलेल्या गोष्टी असू शकतात - १. अविघटनशील वस्तू - चेहर्यावर झाकण्याचे प्लास्टिक कापड, प्लास्टिक मास्क, प्लास्टिक हॅण्ड ग्लोव्हज, बूट झाकण्याकरिता प्लास्टिक कापड, ग्लासच्या वस्तू. यात काही वस्तू परत वापरण्यासारख्या असू शकतात. त्या वेगळ्या काढाव्यात व उरलेल्या खोलवर जमिनीत गाडाव्या. २. विघटनशील वस्तू- टिश्यूज वा कापसाचे बोळे. या गोष्टी खते बनण्याकरिता वापरू शकतो. ३. धोकादायक ‘कोविड’ घनकचर्यामध्ये - टाकून दिलेले पेस्टिसाईड कॅन वा बल्ब; जुनी औषधे; वापरलेल्या सुया व सीरिंज. या गोष्टी जुंतूविरहित करून (त्यावर पोटॅशियम क्लोरेटचा फवारा मारणे) भट्टीत टाकून नष्ट करायला हव्यात.
कोविड रुग्णांनी वापरलेले पीपीई किट व इतर वस्तू बरेच दिवस संसर्गजन्य राहू शकतात, म्हणून ते वेगळे करून नष्ट करणे जरुरी आहे. कोविडसंबंधी घनकचरा वेगळ्या पिवळ्या वा लाल बॅगांमध्ये ठेवाव्यात. नेहमीच्या घनकचर्याबरोबर टाकू नये. अशा तर्हेने ‘कोविड’ घनकचर्याशी आव्हानात्मक सामना करायला लागत आहे आणि तसे करणे सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.