ताकाची प्रशस्ती सांगताना शक्र (म्हणजे इंद्र) देवाला ते मिळत नाही. (अमृतासमान त्याची महत्ती आहे) असा उल्लेख आहे. आयुर्वेदशास्त्रात दूध-तुपाइतकेच ताकाची ही आहारात व अनुपानात (औषध कशाबरोबर /कशातून घेतले जाते ते) प्रशस्ती वर्णित आहे, असे ताक कसे बनवावे आणि त्याचे प्रकार व गुणधर्म याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊया...
कोमट दुधाला थोडे दही/दह्याचे पाणी/ कोकम घालून विरजावे. ते झाकून बाजूला ठेवावे. उन्हाळ्यात पाच तासांत व थंडीत एका रात्रीत दही लागते. हे दही अधमुरं (अर्धवट लागलेलं) नसावे तसेच खूप आंबटही नसावे. काही रोगांकरिता दही विरजतानाच औषधी द्रव्ये घालून मग त्याचे ताक करुन पिण्यास सांगितले आहे. ताकाचे विविध प्रकार खालीलप्रमाणे आहेत.
घोल- साईच्या दह्यात पाणी न घालता ते घुसळावे. जो द्राव तयार होतो, त्याला ‘घोल’ म्हणतात.
मथित- सायविरहित दह्यात पाणी न घालता घुसळल्यावर जो दाट द्रव पदार्थ तयार होतो, त्याला ‘मथित’ म्हणतात.
(विरजण लावताना नुसत्या दुधाला साईसकट दुधाला व फक्त साईला विरजण लावल्यास त्या पद्धतीचे दही तयार होते. सर्वसाधारणपणे ताक करण्यासाठी दह्यात दह्यापेक्षा एक चतुर्थांश किंवा निम्मे पाणी घालून ते घुसळावे, याला ‘ताक’ म्हणतात व गाईच्या दुधापासून तयार केलेले ताक व म्हशीच्या दुधापासून तयार केलेले ताक यांच्या गुणधर्मामध्ये फरक आहे.)
पाणी घालून घुसळल्यावर जे ताक होते, त्याला ‘सजल तक्र’ म्हणतात आणि पाणी न घालता, जे ताक तयार होते, त्याला ‘निर्जल तक्र’ म्हणतात.
तक्रोदश्वित - दह्यात निम्मे पाणी घालून तयार केलेले ताक, ज्याच्यातून लोणी काढलेले नाही, असे ताक ताकद देणारे, कफ वाढविणारे व आमनाशक आहे.
अच्छिका - दही घुसळून, लोणी काढून उरलेल्या द्रव भागाला ‘अच्छिका’ म्हणतात. हे पचायला हलके, तहान शमविणारे, थकवा दूर करणारे व पित्तहारक आहे. रोजच्या आहारात ज्यांना ताक प्यायची सवय आहे, त्यांनी गाईच्या दुधापासून तयार केलेले ताक, ज्यात निम्मा भाग पाणी घातले आणि लोणी काढले आहे, असे घ्यावे. हे ताक जिरं, हिंग आणि सैंधव घालून प्यावे. हे ताक पाचकाग्नी वाढवून पाचनास मदत करते. पोट फुगणे, मूळव्याधी यांसारख्या त्रासांमध्ये उपयोगी ठरते. म्हशीच्या दुधापासून तयार केलेल्या ताकात पाणी घालून ते घुसळावे. यात सैंधव, हिंग, जिरेपूड आणि मोहरीची पूड घालावी. हे ताकदेखील पाचकाग्नी सुधारुन, पचनास मदत करणारे आहे. तोंडाला चव आणणारे व समाधानकारक (तृप्तिकर) आहे. म्हशीचे ताक गाईच्या ताकापेक्षा पचण्यास अधिक जड असते.
ताकाचा स्वाद बदलण्यासाठी अजून एक पद्धत आहे. सुंठ, मिरी, सैंधव, जिरं आणि संत्र्याची वाळलेली साल हे सगळे एकत्रं घेऊन त्याचे चूर्ण करावे. दही घुसळल्यावर थोडे हिंग आणि चूर्ण घालावे. चवीला रुचकर आणि पाचक म्हणून उपयोगी आहे. काही व्याधींमध्ये ‘सिद्ध तक्र’ (विरजतानाच दुधात औषधी चूर्ण घालून दही लावून त्याचे ताक करणे) अनुपान म्हणून उपयोगी आहे. फक्त ताकच नव्हे, तर अशा दह्याचे लोणी व तूपही औषधी गुणधर्म युक्त असते. यामध्ये त्रिकटू(सुंठ मिरी, पिंपळी) सैंधव, सुंठ, ओवा, जिरं, साखर, त्रिफळा, हिंग इत्यादी व अन्य औषधी द्रव्यांचा समावेश होतो. ताकापासून काही व्यंजनेही तयार केली जातात. काही भाज्या (पालेभाज्या) ताकात बनविल्या जातात. याबद्दल थोडं बघूया-
कढी (कथिका)- यातील एक आयुर्वेदीय पाककृती म्हणजे पंचकोलादी कथिका.
घटक द्रव्ये - सुंठ, मिरी, ओवा, त्रवक, पिंपळी, पिंपळमूळ, चित्रक, सैंधव, डाळिंबाची साल, धणे, हिंग, जिरे, शहागिरे, हिरडा, आवळा यांचे चूर्ण, हरभर्याचे पीठ, ताक.
कृती - तिळामध्ये (खूप आंबट वा गोड नसावे) सैंधव, मिरेपूड व चण्याचे पीठ घालून ते मिश्रण कालवून ठेवावे. भांड्यात तूप किंवा तेलात हिंग व हळद घालून काही वेळ त्यावर झाकण ठेवावे. त्यात निम्मे ताक घालून चांगले ढवळून क्षणभर झाकण ठेवून उर्वरित ताक घालावे. ते हलवत राहावे व शिजवावे. यात शिजवताना वरील घटकांचे चूर्ण घालावे.
व्यवहारात बरेचदा जी कढी केली जाते, त्यात गाजर, कोहळा, पडवळ, बारीक चिरुन त्याच्या फोडीही घातल्या जातात. लवंग आणि दालचिनी जर फोडणीत घातली, तर कढीची चव व स्वाद बदलतो. उत्तर भारतामध्ये भाज्यांच्या बारीक फोडींऐवजी कांदा व बटाट्याचे मोठे काप, आलं, लसूण आणि बेसन वाटून वडे तयार केले जातात आणि हे वडे कढीत घालून खातात. (शिजवताना घालायचे.)
पंचकोलादि कथिका ही शूल असताना, खोकला असताना, दम लागत असल्यास तोंडाला चव नसल्यास प्यावी. या व्यंजनाचे वाताचा व कफाचा (अतिरिक्त असलेल्या वात-कफाचा) नाश होतो.
भाज्या न घालता फळांच्या फोडीही घालून कढी केली जाते. तसेच, पडवळाचे काप, शेवग्याच्या शेंगा, घोसाळे, गाजर, कांदा, बटाटा, लाल भोपळा इ. फळभाज्याही कढीत घालून खायची पद्धत आहे. या व्यंजनाला ‘कथिका-सांभारे’ असे म्हटले जाते. या कथिकेने थकवा दूर होऊन तरारी येते, अग्निचे प्रज्वलन नीट होऊन भूक लागते, पाचकाग्नी सुधारल्याने पचन व्यवस्थित होऊ लागते. तोंडाला चव येते आणि वात-कफाचा नाश करणारी आहे.
ताकाचा मुख्य वापर अग्निमांद्यात (भूक मंदावली असताना), अशांत (मूळव्याधित) आणि उदरात (Ascites) मध्ये सांगितला आहे. मंद झालेल्या अग्नीला उद्दिपित करुन पुन्हा खाण्याची इच्छा निर्माण व्हावी म्हणून काही क्षुधाबोधक योगशास्त्रात सांगितले आहेत. जेवणापूर्वी साधारण अर्धा तास आधी हे घ्यावे. यामुळे अग्नीचे संधुक्षण उत्तम प्रकारे होऊन भूक लागते. भुकेची जाणीव होते, खायची इच्छा होते. यासाठी आलं, लिंबू, मिरी, पिंपळी, सैंधव, तीळ अशा आंबट-खारट-तिखट चवींचा मुख्यत्वाने उपयोग होतो. अशा एका सुधाबोधक योगामध्ये ताकाचा वापर करता येतो.
क्षुधावर्धक तक्रयोग –
(1) घटक - ताक, आलं, हिंग, सैंधव, मिरपूड
कृती - ताकात वरील जिन्नसं घालून उकळावे व गरम-गरम घ्यावे.
(2) घटक - ताक, जिरे, धणे, मिरी, हळद, मेथी, पिंपळी, सैंधव, हिरडा, हिंग
कृती - हिरड्याचा काढा बनवावा. त्याला हिंगाची फोडणी द्यावी. वरील (अन्य) सर्व घटक ताकात घालून एकत्र करुन प्यावे. ही दोन्ही व्यंजने पचण्यास हलकी, पचनशक्ती वाढवणारी, मलास सरळ करणारी, कफवातहारक आणि रुचकर आहेत.
पचनावर कार्य जेव्हा अपेक्षित असते, तेव्हा गाईचे ताक वापरणे अधिक उपयोगी ठरते.