सच्चा समाजसेवी नेता हरपला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

sardar tarasingh_1 &



भाजपचे लोकप्रिय वरिष्ठ नेते सरदार तारासिंह यांचे प्रदीर्घ आजारानंतर १९ सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला आढावा...



सरदार तारासिंह जनसामान्यांचा नेता, एक सच्चा समाजसेवक. फाळणीनंतर जी काही पंजाबी कुटुंबे पाकिस्तानातून मुंबईकडे आली त्या पिढीतील साक्षीदार होते सरदार तारासिंह. लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळात अतिशय प्रामाणिक आणि निष्कलंक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यामुळेच कार्यसम्राट ही उपाधी जनतेने त्यांना बहाल केली होती. अत्यंत वेगळ्या धाटणीच्या मिश्या, अत्यंत मितभाषी आणि प्रेमळ व्यक्तिमत्व असणारे तारासिंह सदैव खिशात चॉकलेट घेऊन असायचे आणि वाटायचे. आपल्या स्वभावामुळे लोकप्रिय असणार्‍या तारासिंह यांचे मुलूंड मतदारसंघाला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यात महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांचे निधन संपूर्ण भाजप परिवारासाठी धक्कादायक आहे, अशा शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.



तारासिंह हे अत्यंत लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार म्हणून प्रसिद्ध होते. जनसंघातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार्‍या तारासिंह यांनी विविध पदे भूषविली होती. मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून राजकीय प्रवास सुरू करणार्‍या तारासिंह यांनी मुलुंड विधानसभेचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले. भाजपचे वरिष्ठ नेते सरदार तारासिंह ’पप्पाजी’ या टोपणनावाने लोकप्रिय होते. ‘गोरगरीब जनतेचा वाली’ अशी ओळख असलेले तारासिंह २० वर्षे आमदार होते. १९८४ ते १९९९या कालावधीत तारासिंह हे मुंबई महानगरपालिकेवर सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. १९९९नंतर सलग चार वेळा ते आमदार म्हणून निवडून येत राहिले. २०१४सालच्या विधानसभा निवडणुकीत तारासिंह यांनी काँग्रेसच्या चरणसिंह सप्रा यांचा पराभव केला होता. महाराष्ट्रामध्ये दोन पंजाबी उमेदवारांमध्ये झालेली ही लढत अत्यंत चुरशीच्या लढतींपैकी एक मानली जात होती. आमदारकीच्या काळात तारासिंह यांनी आपल्या आमदार निधीतून छोट्या इमारतींच्या कंपाऊंडमध्ये पेव्हर ब्लॉक लावण्यापासून ते गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्मिती, उद्यानांची निर्मिती व सुशोभीकरण, शौचालयांचे बांधकाम, फुटपाथ व त्यावरचे बेंच, मुलांना शाळेत वह्या व पेपरपॅडचे वाटप इत्यादी असंख्य कामे करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले. नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविल्या. ‘मेरा काम ही मेरी पहचान हैं’ हे तारासिंह यांच्या कार्याचे ब्रीदवाक्य होते.



विधानसभेतही उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या तारासिंह यांना वाढते वय आणि ढासळणारी तब्येत यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली नाही. तरीही त्यांनी याबद्दल जराही खंत न करता आपले सेवाव्रत सुरुच ठेवले. पक्ष सोडणार नाही, असेही त्यांनी तेव्हाच जाहीर केले होते. अन्यथा तितक्याच मताधिक्याने ते निवडून आले असते. पण रुग्णालयात दाखल होईस्तोवर, अखेरच्या क्षणापर्यंत ते जनसामान्यांसाठी कार्यरत राहिले. मुंबई महापालिका असो वा विधानसभा त्यांची संपूर्ण कारकिर्द ही अतिशय प्रामाणिक जनसेवक म्हणून राहिली. ‘तख्त सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब’ नांदेड गुरूद्वाराचे अध्यक्ष म्हणून काम पाहताना अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी काम केले. चुकीच्या प्रथांविरुद्ध संघर्ष केला. तेथील सुवर्णकलशाचे काम पूर्ण प्रामाणिकतेने पूर्ण केले. २०१८ साली त्यांनी सचखंड गुरुद्वारा बोर्डच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. प्रकृतीच्या कारणामुळे गेल्या काही वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. “सरदार तारासिंह लोकप्रिय नेते तर होतेच त्याचबरोबर समाजसेवेचा वसादेखील त्यांनी अविरत जपला. समाजकार्य तसेच धर्मकार्यात ते नेहमी आघाडीवर असत. त्यांच्या निधनामुळे मुंबई तसेच राज्याने एक सच्चा लोकसेवक गमावला आहे,” अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपली श्रद्धांजली व्यक्त केली. तर राज्याचे विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, “कायम जनतेत राहणारा, एक लाडका नेता आज जनतेने गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय आणि आप्तस्वकियांच्या दुःखात मी सहभागी आहे,” असे म्हणत श्रद्धांजली अर्पण केली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सरदार तारासिंह यांच्या निधनाच्या अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरूनच तारासिंह यांची प्रकृती चिंताजनक असली तरीही स्थिर आहे असे ट्विट करत उलट सुलट चर्चांना पूर्णविराम दिला होता. शनिवारी त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली होती आणि त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. अशा सच्चा समाजसेवक नेत्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून भावपूर्ण श्रद्धांजली!
@@AUTHORINFO_V1@@