मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक करताना केलेल्या एका वक्तव्यावरून माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेला टोला हाणला आहे. 'अनुराग कश्यप याचे वक्तव्य ही सरळ सरळ बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी आहे,' असा आरोप भाजप नेते नीलेश राणे यांनी केला आहे.
सुशांतसिंह राजपूत प्रकरण व मुंबईबद्दल कंगना राणावत हिने केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना व कंगना आमनेसामने आले होते. मुंबईत मला असुरक्षित वाटते असे वक्तव्य तिने केले होते. त्यानंतर शिवसेनेने तिच्याविरोधात आघाडी उघडली होती. सुरुवातीला तिच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या काही कलाकारांनी नंतर तिला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. दिग्दर्शक अनुराग कश्यप याने कंगनाला अप्रत्यक्ष उत्तर देताना उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. याबाबत ट्विट करताना त्याने लिहिले की, "शिवसेनेबद्दलची माझी मतं बदलली आहेत. शिवसेनेबद्दल माझी जी काही मतं होती ती उद्धव ठाकरे यांच्यामुळं बदलली आहेत. मला मुंबईत सुरक्षित वाटतं आणि कुठलीही भीती न बाळगता हवं ते बोलता येतं. महाराष्ट्रात मी आनंदी आहे," असं त्याने म्हंटले आहे.अनुराग कश्यप याच्या याच वक्तव्याचा धागा पकडून नीलेश राणे यांनी शिवसैनिकांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. 'उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेबाबतची मतं बदलली? म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेबाबत अनुराग कश्यपची मतं वेगळी होती? ही सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी आहे. हे सगळं बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी निमूटपणे ऐकून घ्यायचं...' असे ट्वीट नीलेश राणे यांनी केले आहे.