मरियप्पनची ‘अर्जुन’उडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Sep-2020   
Total Views |
 Mariyappan Thangavelu_1&




एकेकाळी वृत्तपत्रे विकणार्‍या, उदरनिर्वाहासाठी रोजंदारीवर काम करणार्‍या ‘अर्जुन पुरस्कार’विजेत्या मरियप्पन थंगावेलुची प्रेरणादायी कहाणी...



आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी चांगली कामगिरी करून देशाला सर्वोच्च मान मिळवून देण्याचे देशामध्ये अनेक खेळाडूंचे स्वप्न असते. अनेक खेळाडू त्यासाठी कसोशीने प्रयत्नशीलही असतात, तर त्यापैकी काहीजण हा बहुमान मिळवतात. मात्र, त्यामागे त्यांचे अपार कष्ट आणि परिस्थितीशी दोन हात करून घेतलेल्या या भरारीला पुरस्कृत करणे हेदेखील देशाचे कर्तव्य असते. अशा खेळाडूंना भारत सरकारकडून ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ तसेच ‘अर्जुन पुरस्कार’ हे पुरस्कार प्रदान करुन त्यांचा गौरव केला जातो. याहीवर्षी भारत सरकारने ‘अर्जुन पुरस्कारां’ची घोषणा केली. यावेळी भारतासाठी २०१६च्या ‘रिओ पॅरालम्पिक’ स्पर्धेमध्ये पुरुष उंच उडी ‘टी-४२’ प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळवून देणार्‍या मरियप्पन थंगावेलु याचाही ‘अर्जुन पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे, २००४ नंतर या प्रकारात सुवर्णपदक मिळवणारा तो पहिला पॅरालम्पिक खेळाडू ठरला. तसेच, १.८९ मीटरचा नवा रेकॉर्ड त्याने प्रस्थापित केला. त्याच्या या कामगिरीचे चांगलेच कौतुक झाले. पण, त्याचा इथपर्यंतचा प्रवास हा साधासुधा नव्हता. जाणून घेऊया त्याच्या या संघर्षमयी प्रवासाबद्दल...


दि. २८ जून १९९५ मध्ये तामिळनाडूतील सालेम जिल्ह्यापासून साधारण ५० किमी दूर असलेल्या पेरियावदगमपट्टी गावामध्ये मरियप्पनचा जन्म झाला. त्याला चार भाऊ आणि एक बहीण. मरियप्पनचे वडील तो लहान असतानाच घर सोडून गेले होते. त्यामुळे घराची सगळी जबाबदारी ही एकट्या आईवर आली होती. यामुळे दरदिवशी त्याच्या कुटुंबाला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत होता. या संपूर्ण कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी त्याची आई ही रोजंदारीवर काम करत होती. त्यानंतर त्यांनी भाजी मंडईमध्ये भाजी विकण्याचेही काम केले. यादरम्यान, मरियप्पनच्या कुटुंबाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. दिवसाच्या जेमतेम १०० रुपयांच्या कमाईवर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. एक दिवस पाच वर्षांचा मरियप्पन शाळेत जात असताना, एका बसने त्याला धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की, त्याचा एक पाय या बसच्या चाकाखाली आला. गुडघ्याखालच्या त्याच्या पूर्ण पायाला खूप मोठी दुखापत झाली. या अपघातात त्याने आपला एक पाय गमावला होता. या दुर्घटनेमध्ये त्याला आयुष्यभरासाठी अपंगत्व आले. यासाठी त्याच्या आईने तीन लाखांचे कर्ज घेतले होते आणि न्यायालयाचे दारदेखील ठोठावले होते. अखेर १७ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर त्यांना दोन लाख रुपयांची भरपाई मिळाली. यातील एक लाख हे मरियप्पनच्या उच्च शिक्षणासाठी खर्च केले आणि त्यानेदेखील आपल्या आईची ही मेहनत वाया जाऊ दिली नाही.


मरियप्पनदेखील कुटुंबाचा आर्थिक गाडा चालावा यासाठी मदत केली. पडेल ते काम केले. सकाळी घरोघरी जाऊन वृत्तपत्रे टाकली. दिवसा बांधकामाच्या ठिकाणी रोजंदारीवरही काम केले. यादरम्यान त्याने शालेय शिक्षणात मात्र खंड पडू दिला नाही. मरियप्पनला अनेक खेळांमध्ये रस होता. शाळेमधील त्याचे प्रशिक्षक आर. राजेंद्रम यांनी त्याची उंच उडी (हाय जम्प) प्रकारातील प्रतिभा ओळखली होती. यासाठी त्याला प्रोत्साहित करण्याचे काम राजेंद्रम यांनी केले. विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावून त्याच्याकडून ते कसून सराव करुन घेत. हळूहळू मरियप्पनचीही या खेळामधील रुची वाढू लागली. वयाच्या १४व्या वर्षी मरियप्पनने पहिल्याच स्पर्धेमध्ये कमाल केली. इतर सक्षम खेळाडूंसमोर त्याने स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. त्याच्या या विजयाने शाळाच नव्हे, तर जिल्ह्यातील क्रीडापटूंच्याही भुवया उंचावल्या.


पुढे २०१३ मध्ये त्याने बीबीएचे शिक्षण घेण्यासाठी ‘एव्हीएस कॉलेज ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस’ महाविद्यालयात प्रवेश घेतला. इथेदेखील त्याने उंच उडी प्रकारामधील स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली. पुढे बंगळुरु येथे झालेल्या ‘इंडियन नॅशनल पॅराअ‍ॅथलेटिक्स’ स्पर्धेमध्ये मरियप्पनने भाग घेतला. १८ वर्षीय या पॅराअ‍ॅथलिटवर प्रशिक्षक सत्यनारायण यांची नजर पडली. त्याची प्रतिभा लक्षात घेता सत्यनारायण यांनी दहा हजार प्रतिमहिना देत स्वतःकडे कामाला ठेवले. एवढेच नव्हे, तर या खेळामधील योग्य प्रशिक्षणदेखील सत्यनारायण यांनी मरियप्पनला दिले. अथक परिश्रम आणि कठीण प्रशिक्षणानंतर मरियप्पन हा वरिष्ठ स्तरावरील स्पर्धेमध्ये उतरला. पहिल्याच वर्षी ‘आयपीसी ग्रॅण्ड प्रिक्स’ स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत मरियप्पनसाठी पॅरालम्पिकचे दरवाजे उघडले. मार्च २०१६ मध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये त्याने ‘टी-४२’मध्ये १.७८ मीटर एवढी उंच उडी मारली होती. त्यानंतर रिओ पॅरालम्पिकमधील त्याच्या कामगिरीने भारतभर कौतुकाची थाप मिळवली. गरिबीवर मात करत भारतासाठी सुवर्णपदक पटकाविणार्‍या या खेळाडूचा आदर्श अनेक नव्या खेळाडूंनी घेतला. सध्या हा खेळाडू भारतीय क्रीडा प्राधिकरणात (साई) प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.


एकेकाळी गरिबीशी झगडणार्‍या मरियप्पनच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही आता सुधारली आहे. भारतीय सरकारने मरियप्पन थंगावेलुला ‘अर्जुन पुरस्कार’ देऊन त्याच्या कामगिरीचा यथार्थ गौरव केला आहे.






 
@@AUTHORINFO_V1@@