उद्धव ठाकरेंचे यापुढे अयोध्येत स्वागत नाही ; संत महंतांचे कंगनाला समर्थन

    11-Sep-2020
Total Views | 317

ayodhya _1  H x


अयोध्या :
महाराष्ट्र सरकार आणि कंगना रनौत यांच्यात सुरू असलेल्या वादात उद्धव ठाकरे यांना संत समाजानेही विरोध दर्शविला आहे. अयोध्येतील महंत ऋषी म्हणाले की, उद्धव ठाकरे अयोध्येत आले तरीही त्यांचे स्वागत केले जाणार नाही आणि त्यांना विरोधाला सामोरे जावे लागेल. या मुद्यावर संतांनी कंगना रनौत यांचे समर्थन केले असून महाराष्ट्र सरकारच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.


हनुमान गढीचे महंत राजू दास म्हणाले की, आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे अयोध्येत स्वागत होणार नाही. उद्धव ठाकरे अयोध्येत आले तर त्यांना विरोधाचा सामना करावा लागेल. महाराष्ट्र सरकारने कंगना रनौत यांच्यावर कारवाई करण्यात काहीच वेळ वाया घालवला नाही मात्र महाराष्ट्र शासनाने पालघरमध्ये साधूंची हत्या करणाऱ्या आरोपींवर मात्र अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच, अयोध्या संत समाजाचे प्रमुख महंत कन्हैया दास यांनीही महाराष्ट्र सरकारवर अनेक आरोप केले. ते म्हणाले की, सध्याचे महाराष्ट्र सरकार अशा लोकांचा बचाव करीत आहे, जे देशविरोधी कार्यात सहभागी आहेत. उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत प्रवेश करू नये असा इशाराही त्यांनी दिला. महंत कन्हैया दास यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'उद्धव ठाकरे यांचे यापुढे अयोध्येत स्वागत होणार नाही. शिवसेना कंगना रानौतवर हल्ला का करीत आहे ? प्रत्येकजण हे समजू शकतो, हे रहस्य नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात असणारी शिवसेना आता राहिली  नाही.'


या विषयावर विश्व हिंदू परिषदेने कंगना रानौत यांचे समर्थन करणारे निवेदनही जारी केले आहे. निवेदनानुसार, कंगनावरील कारवाईचा अर्थ असा आहे की शिवसेना मुद्दाम असे करत आहे. कंगनाने सुरुवातीपासूनच राष्ट्रहिताच्या विचारसरणीला पाठिंबा दर्शविला असून मुंबईच्या ड्रग माफियांच्या विरोधात आवाज उठविला. याशिवाय विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते शरद शर्मा म्हणाले की, महाराष्ट्र सरकार कंगना रानौत यांच्याविरूद्ध चुकीच्या भावनेने कारवाई करीत आहे. कंगना रानौत आणि शिवसेना यांच्यात वाद सुरू झाला जेव्हा कंगनाने महाराष्ट्राची तुलना पाकिस्तान अधिकृत काश्मीरशी केली. यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कंगनाला शिवीगाळ केली. यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी कंगना रानौत यांना 'हरामखोर' म्हणून संबोधित केले. दरम्यान, महाराष्ट्र सरकारनेही कंगनाविरूद्ध अमली पदार्थांच्या वापराबद्दल आदेश जारी केला आहे. संजय राऊत यांनी कंगना रानौत यांना मुंबईत पाय न ठेवण्याची धमकी दिली. या धमकीकडे दुर्लक्ष करून कंगनाने बुधवारी मुंबई गाठली. त्याआधी मुंबई महानगरपालिकेने कंगना रानौत यांच्या कार्यालयाचा एक भाग पूर्णपणे पाडला. यामुळे महाराष्ट्र शासनाला व शिवसेनेवर टीका होत आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121