ईशनिंदेच्या नावाखाली मानवतेची हत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 


ahmadi 1_1  H x
 
 

 

(ताहिर अहमद नसीमच्या हत्येसमर्थनार्थ काढण्यात आलेली रॅली)


 
पाकिस्तानी दंड संहितेनुसार ईशनिंदेचा गुन्हा मृत्यू अथवा मरेपर्यंत जन्मठेपेसाठी दंडनीय आहे. ईशनिंदा कायद्याचा वापर देशातील अल्पसंख्यक धार्मिक समुदायाविरोधात आणि पाकिस्तानातील धार्मिक संस्था-प्रतिष्ठानाच्या विरोधात जाणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावार केला जातो, असे मानवाधिकार गटांचे म्हणणे आहे.

 

 


‘धर्माच्या नावावर हिंसाचार’ ही पाकिस्तानची ओळख झाली असून इथे आजही धर्माच्या नावावर मनुष्यहत्येला योग्य ठरवणारे आदिम कायदे अस्तित्वात आहेत. ईशनिंदेचा कायदा असाच असून नुकताच हा कायदा पुन्हा एकदा चर्चेत आला तो ताहिर अहमद नसीम या व्यक्तीमुळे. नसीम याने मी स्वतः पैगंबर असल्याचा कथित दावा केला होता आणि यावरुन त्याच्यावर ईशनिंदेचा आरोप लावण्यात आला. ताहिर अहमद नसीमवर आरोपच लावला नाही, तर पाकिस्तानच्या पेशावर शहरातील जिल्हा न्यायालयात संबंधित प्रकरणाची सुनावणी सुरु असतानाच त्याच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. तत्पूर्वी २०१८ साली नसीमवर ईशनिंदेचा आरोप लावून पोलिसांनी त्याला अटक केली होती. उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तानातील ईशनिंदेचा कायदा इतका कठोर आहे की, कायद्याचे उल्लंघन करणार्‍या गुन्हेगारांना थेट मृत्युदंडाची शिक्षा दिली जाऊ शकते.

 
दरम्यान, ताहिर अहमद नसीमची हत्या केल्यानंतर मारेकर्‍याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल करण्यात आला. सदर व्हिडिओमध्ये न्यायालयातील एका बेंचवर मारेकरी बसलेला दिसत असून पैगंबर मोहम्मदाने आपल्याला स्वप्नात येऊन नसीमची हत्या करण्याचा आदेश दिल्याचे म्हणताना ऐकता येते. पाकिस्तानमध्ये धार्मिक उन्माद कोणत्या थराला पोहोचला आहे, याचे जीवंत उदाहरण या हत्याकांडानंतर पाहायला मिळाले. मारेकर्‍याच्या समर्थनार्थ पेशावरमध्ये एक रॅली आयोजित करण्यात आली होती आणि यात हजारोंच्या संख्येने मुस्लिमांनी भाग घेतला. रॅलीमध्ये निदर्शकांनी नसीमची हत्या केल्याबद्दल मारेकर्‍याचे कौतुक केले आणि त्याला तुरुंगातून तत्काळ सोडून देण्याची मागणी केली. तसेच सरकार ईशनिंदा प्रकरणांच्या लवकरात सुनावणी व निकालात सुस्ती दाखवते आणि यामुळे ताहिर अहमद नसीमची हत्या पाकिस्तानी नागरिकांनी योग्य ठरवली. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी ईशनिंदेच्या आरोपाखाली अटक होण्याआधी नसीम अमेरिकेत राहणारा अमेरिकन नागरिक असल्याची माहिती नंतर समोर आली. तो पाकिस्तानातील अल्पसंख्याक अहमदिया पंथाशी संबंधित होता आणि त्याच्या हत्येनंतर अमेरिकेने पाकिस्तानला देशातील कठोर ईशनिंदा कायदा संपवण्याचे आवाहन केले आहे. उल्लेखनीय म्हणजे, अहमदिया पंथाला १९७४ साली पाकिस्तानी संविधानातील दुसर्‍या दुरुस्तीने इस्लाममधून बाहेर काढण्यात आले आणि तेव्हापासून आतापर्यंत अहमदिया पंथियांना सातत्याने उत्पीडनाचा सामना करावा लागला.
 
ईशनिंदा कायद्याचा अभिशाप
 

 

 


पाकिस्तानी दंड संहितेनुसार ईशनिंदेचा गुन्हा मृत्यू अथवा मरेपर्यंत जन्मठेपेसाठी दंडनीय आहे. अशा कायद्यावर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार गटांनी अनेकदा टीकाही केली. ईशनिंदा कायद्याचा वापर देशातील अल्पसंख्यक धार्मिक समुदायाविरोधात आणि पाकिस्तानातील धार्मिक संस्था-प्रतिष्ठानाच्या विरोधात जाणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावार केला जातो, असे मानवाधिकार गटांचे म्हणणे आहे. धर्माशी संबंधित गुन्ह्यांसाठीचे कायदे सर्वप्रथम वसाहतवादी भारताच्या ब्रिटिश शासकांनी १८६० साली संहिताबद्ध केले आणि १९२७ मध्ये त्यात आणखी काही तरतुदींचा समावेश केला. १९४७ साली भारताची फाळणी झाली आणि एका स्वतंत्र राष्ट्राच्या रुपात जन्माला आलेल्या पाकिस्तानला हाच कायदा वारसारुपाने मिळाला. १९८० साली लष्करी हुकूमशहा जनरल झिया-उल-हक यांच्या सत्ताकाळात पाकिस्तानात इस्लामी कट्टरपंथी प्रभावाचा वेगाने प्रसार झाला आणि इस्लाममधील ऐतिहासिक व्यक्तींविरोधात अपमानजनक वक्तव्य करण्यालाही गुन्हा ठरवण्यापर्यंत या कायद्याची व्यापकता वाढण्यात आली. ‘नॅशनल कमिशन फॉर जस्टिस अ‍ॅण्ड पीस’नुसार १९८७ पासून आतापर्यंत एकूण ६३३ मुस्लीम, ४९४ अहमदीया, १८७ ख्रिश्चन आणि २१ हिंदूंवर ईशनिंदा कायद्याच्या विविध कलमांतर्गत आरोप लावण्यात आले. दरम्यान, काही पाकिस्तानी राजकीय नेत्यांनी ईशनिंदा कायद्यात सुधारणांसाठी प्रयत्न केले आहेत. २०१० साली पाकिस्तानच्या पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) शेरी रहमान यांनी धार्मिक गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील प्रक्रियेतील बदलांमध्ये सुधारणेसाठी एक खासगी विधेयक सादर केले, जेणेकरुन अशा प्रकरणांची सुनावणी थेट उच्च न्यायालयात व्हावी. मात्र, कट्टरपंथीयांची ताकद आणि काही विरोधी राजकीय पक्षांच्या दबावामुळे २०११ साली सदर विधेयक मागे घेतले गेले.
 
 

ahmadi 2_1  H x 
 

(आसिया बीबी आणि शाहबाज भट्टी)

 
उल्लेखनीय बळी : तासीर आणि भट्टी!

 

 


२०११ साली पंजाबचे वरिष्ठ राजकीय नेते आणि गव्हर्नर सलमान तासीर यांना त्यांच्याच अंगरक्षकाने आसिया बीबीच्या समर्थनासाठी आवाज उठवणे व देशातील कठोर ईशनिंदा कायद्याचा निषेध करण्यावरुन गोळ्या झाल्या होत्या. तासीर यांच्या मारेकर्‍याने-मुमताज कादरी याने तत्काळ पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आणि नंतर त्याला ठार करण्यात आले. तथापि, कट्टरपंथीय इस्लामी जनतेने कादरीलादेखील हुतात्म्याचा दर्जा दिला. २०१६ साली मुमताज कादरी मारला गेला आणि त्याच्या अंत्यसंस्कारावेळी हजारो लोक रावळपिंडीमध्ये जमा झाले होते. गोळा झालेला जमाव समाजशांती बिघडवण्याचा संशय असल्याने दंगली रोखण्यासाठी पाकिस्तानी मीडियाने ‘ब्लॅक आऊट’ केले होते. दरम्यान, कादरीच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानातील प्रमुख इस्लामी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सहभाग घेतला होता आणि कादरीच्या समर्थकांनी त्याच्या तथाकथित बहादुरीला स्मरणीय करण्यासाठी शक्य ते प्रयत्न केले होते. राजधानी इस्लामाबादमधील मुमताज कादरीचे थडगे तेव्हापासून इस्लामी कट्टरपंथीयांसाठी एक मोठे प्रार्थनास्थळ ठरले.
 

सलमान तासीर यांच्याप्रमाणेच पाकिस्तानातील अल्पसंख्याक आणि ख्रिश्चन नेते शाहबाज भट्टी यांचीही २०११ साली ईशनिंदेशी निगडित प्रकरणांत न्यायाची मागणी केल्यानंतर हत्या करण्यात आली होती. अधिकार संघटनेने असा दावा केला की, ईशनिंदा कायद्याचा वापर वैयक्तिक सूड घेण्यासाठी आणि राजकीय कारणांनी केल्या जाणार्‍या हिंसाचाराला योग्य ठरवण्यासाठी केला जातो. फारच कमी प्रकरणांत पुराव्यांच्या आधारावर आरोपी आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी संघर्ष करु शकतो. हिंसक जमाव, पोलीस, साक्षीदार, अभियोजन पक्ष, वकील आणि न्यायाधीशांना घाबरवून, धमकावून प्रकरण धसास लावण्याच्या प्रयत्नात असतो. दरम्यान, ईशनिंदेच्या गुन्ह्यातील आरोपींना मृत्युदंड द्यायला हवा, यावर पाकिस्तानी लोकसंख्येच्या मोठ्या भागाचे एकमत आहे. परंतु, अशा लोकांनी धार्मिक साहित्य आणि आधुनिक कायद्यांचे कसलेही ज्ञान नाही.
 
उल्लेखनीय म्हणजे, २०१८ साली पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्वाधिक ‘हाय प्रोफाईल’ ईशनिंदा प्रकरणी एक ऐतिहासिक निर्णय दिला. त्यानुसार या प्रकरणातील आरोपी ख्रिश्चन महिला आसिया बीबी हिला नऊ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेतून मुक्त करण्यात आले. तथापि, यामुळे देशभरात सर्वत्र पसरलेले कट्टरपंथी इस्लामी गट नाराज झाले आणि ईशनिंदेच्या आरोपींविरोधात हिंसेचा वापर केला पाहिजे, असे सांगणार्‍या धर्मांध मौलवी खादिम हुसैन रिझवीच्या ‘तहरिक-ए-लब्बेक पाकिस्तान पार्टी’च्या पुढाकाराने मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. सध्या आपण एकविसाव्या शतकात आल्याचे म्हणतो, पण ते केवळ म्हणण्यापुरतेच असते. कारण, इथले अनेकजण मध्ययुगीन बर्बरता आणि जाहिलपणापासून अजूनही दूर गेलेले नाहीत. हेच त्यांचे वास्तविक रुप असून सभ्यतेचे आवरण केवळ एक दिखावा आहे.
 
(अनुवाद : महेश पुराणिक)
 
 
 

 

@@AUTHORINFO_V1@@