अमेरिकेचे सर्वांत ताकदवान दोन ‘एअरक्राफ्ट कॅरिअर’ अर्थात विमानवाहू युद्धनौका भारताच्या दक्षिण टोकापासून दक्षिण अंदमान-निकोबारचीन समुद्राच्या दिशेने जात होते. या जगातल्या सर्वांत शक्तीमान युद्धनौका आहेत. त्यांच्यावर ‘न्यूक्लिअर प्रोपेलशन’चा (अणुशक्तीचा) वापर केला जातो. अमेरिकेची शक्तीशाली विमानवाहू युद्धनौका ‘यूएसएस निमित्ज’ने अंदमान-निकोबारच्या समुद्रात भारतीय नौदलाच्या युद्धनौकांसोबत कवायती केल्या. त्यामुळे भारतीय आणि अमेरिकन नौदलाचा हा संयुक्त नौदल सराव दादागिरी करणार्या चीनसाठी एक मोठा इशारा आहे.
भारतीय आणि अमेरिकन नौदल मलबार आणि अन्य युद्ध सरावाच्या निमित्ताने या आधी एकत्र येत असत. आता ‘निमित्ज’ सरावात सहभागी झाली. अण्वस्त्रसज्ज ‘यूएसएस निमित्ज’ सोबत अन्य युद्धनौकाही सहभागी झाल्या होत्या. मलाक्काच्या सामुद्रीधुनीमधून त्यांनी हिंदी महासागरात प्रवेश केला. ‘यूएसएस निमित्ज’ आणि ‘यूएसएस रोनाल्ड रेगन’ या दोन युद्धजहाजांची दक्षिण चीन सागरातील तैनातीची प्रक्रिया मागच्या महिन्यात पूर्ण झाली आहे. या ‘एअरक्राफ्ट कॅरिअर’चा ताफा जिथै रवाना होतो, त्याच्याबरोबर नौदलाची इतर अनेक जहाजेही तैनात असतात. सध्या त्यांचे लक्ष्य आहे दक्षिण चीन समुद्र. दक्षिण चीन सागरातील मित्रराष्ट्रांच्या मदतीसाठी आणि चीनच्या विस्तारवादी धोरणाला आळा घालण्यासाठी अमेरिकेने ‘यूएसएस निमित्ज’ आणि ‘यूएसएस रोनाल्ड रेगन’ या दोन्ही युद्धनौका दक्षिण चीन सागरात तैनात केल्या आहेत. अमेरिकेकडे ‘यूएसएस निमित्ज’ प्रकारातील दहा जहाजे आहेत. प्रत्येक जहाजाचे वजन एक लाख टनच्या घरात असून ८० ते ९० लढाऊ विमाने एकावेळी जहाजावर तैनात असतात. अमेरिकेने ही जहाजे जगभरात तैनात केली आहेत.
भारताकडून अनेक घटकांचा / राष्ट्रीय ताकदीचा वापर
चीनने लडाखमध्ये केलेले अतिक्रमण आणि तेथे भारतीय सैन्याने केलेली कारवाई नेहमीच प्रकाशझोतात राहिलेली आहे. परंतु, आता भारताने आक्रमक चीनचे आव्हान परतवण्याकरिता इतर अनेक घटकांचा/राष्ट्रीय ताकदीचा वापर करण्याचे ठरवले आहे. त्यादृष्टीने महत्त्वाची अनेक पाऊलेही भारताने उचलली आहेत. समुद्राच्या कायद्याप्रमाणे ज्या देशाला समुद्रकिनारा असतो, त्यापासून १२ नॉटिकल मैलाचा समुद्र हा त्या राष्ट्राचे ‘टेरिटोरियल वॉटर’ (त्या देशाचा समुद्र) समजले जाते. ज्यामध्ये त्या राष्ट्रांचे कायदे लागू होतात. किनार्याासून २०० नॉटिकल मैलापर्यंतच्या समुद्राला ‘एक्सक्ल्युझिव्ह इकॉनॉमिक झोन’ असे म्हटले जाते. ज्यामध्ये समुद्रात मिळणारे मासे, गॅस किंवा कुठलेही इतर पदार्थ त्या देशाचे असतात. मात्र, इतर राष्ट्रांना तेथून व्यापारी जहाजे घेऊन जायला परवानगी असते. यापुढील समुद्र किनार्यापासून ३५० मैलपर्यंतच्या समुद्र क्षेत्राला ‘एक्सटेन्डेड एक्सक्ल्युझिव्ह इकॉनॉमिक झोन’ असे म्हटले जाते. तिथेसुद्धा त्या देशाला अनेक अधिकार असतात. मात्र, बाकी देशांना मुक्त समुद्र प्रवासाला येथे परवानगी आहे. त्यापुढील समुद्र हा सगळ्या जगाचा मानला जातो. याप्रमाणे चीनची समुद्र सीमा त्यांच्या किनार्यापासून १२ नॉटिकल मैल, २०० नॉटिकल मैल किंवा ३५० नॉटिकल मैलावर संपायला पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही. चीन म्हणते संपूर्ण दक्षिण चीन समुद्र हा आमचाच आहे. यामुळे व्हिएतनाम, लाओस, इंडोनिशिया, फिलीपिन्स, जपान आणि कोरिया यांच्या समुद्र सीमांचे काय? चीन म्हणते, संपूर्ण समुद्र आमचा, त्यांचा नाहीच. अशाप्रकारे दक्षिण चीन समुद्रात चीनची दादागिरी सुरु आहे. दुर्दैवाने, दक्षिण पूर्व आशियाई देशांकडे पुरेशी सैनिकी ताकद नसल्यामुळे त्या राष्ट्रांना जरी चीनचा राग आला असला, तरी ते चीन विरुद्ध सैनिकी कारवाई करण्याकरिता असमर्थ आहेत. म्हणूनच त्यांना मदत करण्याकरिता आता अमेरिकेने आपले युरोपमधील सैन्य हलवून दक्षिण पूर्व आशियाई देशांकडे वळवले आहे. त्यामध्ये दोन ‘एअरक्राफ्ट कॅरिअर’ला त्यांच्या ताफ्याबरोबर दक्षिण चीन समुद्राकडे रवाना करण्यात आली आहेत.
लष्करी ताकदीचा वापर मल्लाका सामुद्रधुनीवर
जगातील सर्वांत प्रचंड असे हे लष्करी सामर्थ्य मानले जाते. या ‘एअरक्राफ्टच्या कॅरिअर’ ग्रुपना भारताच्या दक्षिणी समुद्रापासून ते मल्लाका सामुद्रधुनीपर्यंत भारताच्या नौदलांच्या जहाजांनी सोबत दिली आणि त्यांच्याबरोबर एकत्र युद्ध अभ्याससुद्धा केला. याला ‘पासेक्स युद्ध सराव’ असे नाव दिले होते. लक्षात असावे की, भारताच्या या दक्षिण टोकावर असलेल्या समुद्री महामार्गांना ज्याला ‘सीलाईन्स ऑफ कम्युनिकेशन’ असे म्हटले जाते, त्यामधून चीनचा ७० टक्के व्यापार होतो आणि मल्लाका सामुद्रधुनी ही एक अशी जागा आहे की, जिथे आपण चीनच्या विरुद्ध आक्रमक कारवाया करून हा व्यापार रोखू शकतो. एवढेच नव्हे, तर अंदमान-निकोबारचे शेवटचे टोक म्हणजे ग्रेट निकोबार बेट हे फक्त मल्लाका समुद्रधुनीपासून फक्त दीडशे मैल अंतरावर आहे. तिथे भारताच्या नौदलाचे मोठे केंद्र अस्तित्वात असून हवाईदलाची जग्वार विमानेही तिथे तैनात करण्यात आलेली आहेत. भारतीय सैन्याची सुद्धा येथे पुष्कळ ताकद आहे. यामुळे भारतीय लष्करी ताकदीचा वापर मल्लाका सामुद्रधुनीच्या मुखावर केला जाऊ शकतो.
युद्ध अभ्यासात ऑस्ट्रेलियाचाही सहभाग
भारत आता चीनच्या विरुद्ध समुद्रामध्ये इतर देशांच्या मदतीने एक नवीन आघाडी उघडत आहे. आपली लष्करी ताकद दाखवण्याकरिता पाच दिवस अंदमान समुद्रामध्ये भारताने युद्ध सराव केला. याशिवाय या महिन्यामध्ये ‘एक्सरसाईज मलबार’ हा एक नवीन युद्ध अभ्यास सुरु होणार आहे. ज्यामध्ये भारत, जपान आणि अमेरिका सहभागी होतील. 2015 पासून भारत आणि अमेरिकेसह जपानदेखील या सरावात नियमित सहभाग घेत आहे. बंगालच्या उपसागरात चेन्नईच्या किनार्याजवळचा हा सर्वात मोठा अभ्यास आहे. यादरम्यान सुमारे 20 फ्लाईंग जहाजे आणि डझनभर लढाऊ विमाने आकाशात घिरट्या घालताना दिसतील. तसे म्हटले तर ‘मलबार एक्सरसाईज’ ही तशी दरवर्षी होत असते. परंतु, आतापर्यंत चीनला राग येईल म्हणून त्याचे स्वरुप हे लहान ठेवले जायचे. आपण ते म्हणतील ते ऐकायचे. यावेळेला मात्र भारताने सांगितले की, आम्हाला ऑस्ट्रेलियाही आमंत्रित करायचे आहे. चीनने याबाबत भारताकडे नापसंतीही नोंदवली. पण, आता चीनच्या रागाची परवा न करता आपण ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांनासुद्धा या युद्ध अभ्यासामध्ये सहभागी करुन घेत आहोत.
‘एक्सरसाईज मीलान’मध्ये 15 देशांच्या नौदलाबरोबर युद्ध अभ्यास
याशिवाय भारत अंदमान बेटावर दरवर्षी ‘एक्ससरसाईज मीलान’ नावाचा १५ देशांच्या नौदलाबरोबर युद्ध अभ्यास करतो. अंदमान-निकोबारमध्ये होणार्या कवायतींमध्ये भारतीय नौदलाच्या युद्धनौका, डिस्ट्रॉयर, फ्रिगेटस, टेहळणी नौका आणि पाणबुड्या सहभागी होणार आहेत. अंदमान-निकोबार कमांड आणि विशाखापट्टणम येथील पूर्व नौदल कमांडची जहाजे, फायटर विमाने या कवायतींमध्ये सहभागी होतील. अंदमान-निकोबार देशातील एकमेव थिएटर कमांड आहे, जिथे लष्कर, नौदल, हवाई दल आणि तटरक्षक दल एका ‘ऑपरेशनल कमांडर’च्या अंतर्गत येते. मागच्या महिन्यात मलाक्का सामुद्रधुनीजवळ भारत आणि जपानच्या युद्धजहाजांनी एकत्र सराव केला होता. भारत आणि अमेरिकेत होणार्या मलाबार कवायतींमध्ये २०१५पासून जपान सहभागी होत आला आहे. अनेक देश घाबरुन या युद्ध अभ्यासात सहभागी होत नव्हते. कारण, त्यांना चीनची मोठी भीती होती. पण, आता चीनचे शत्रू असलेल्या इतर देशांच्या नौदलांची ताकद वापरून एकत्रितरित्या चीनला आपण विरोध करण्याचा प्रयत्न करत आहोत.
‘क्वॉडीलॅटरल’ सामरिक सहकार्य
आता आपण चीनच्या विरुद्ध सामरिक पातळीवर स्वत:च्या मित्रांची एक फळी निर्माण केली आहे. एक नवीन महत्त्वाचे सहकार्य म्हणजे ‘क्वॉडीलॅटरल’ सामरिक सहकार्य. इतके वर्ष ‘क्वॉडीलॅटरल’ सामरिक सहकार्याविषयी फक्त बोलण्यात आले, परंतु त्यावर कार्यवाही करण्याविषयी भारताने ठोस भूमिका घेतली नाही. पण, आता आपण ही भीती मागे सारली आहे आणि चीनला उघडपणे इशारा दिला आहे की, तुम्ही जर आक्रमक दादागिरी लडाखमध्ये करणार असाल, तर आम्हीसुद्धा तुमच्या विरुद्ध वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या लढाया करू शकतो. परंतु, चीनला स्वत:च्या आर्थिक शक्तीविषयी आणि सैनिकी शक्तीविषयी एवढी घमेंड आहे की, ते या केवळ एका कारवाईमुळे घाबरतील असे नाही. भारताला चीनविरुद्ध इतर देशांचे सहकार्य घेऊन चीन विरुद्ध वेगवेगळ्या स्तरावर ‘हायब्रीड वॉर’ हे सुरु करायला पाहिजे. ज्यामुळे पुढच्या काही वर्षांमध्ये चीनची आक्रमकता कमी करण्यामध्ये आपल्याला यश मिळू शकेल.