क्षमस्व!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2020   
Total Views |
jp_1  H x W: 0






गेल्याच आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निर्णय जाहीर केला. ट्रम्प यांच्या प्रत्येक निर्णयासोबत जोडीला वादंग असतोच. महिलांना मताधिकार मिळवून देणार्‍या चळवळीतील एक शिरसावंद्य व्यक्तिमत्त्व म्हणजे सुझन अँथोनी! या सुझन अँथोनीला माफ करण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष या नात्याने जाहीर केला. सुझन अँथोनी यांचा गुन्हा काय, तर महिलांना मतदानाचा अधिकार नसताना त्यांनी निवडणुकीत मतदान करण्याचे धैर्य दाखवले. संबंधित घटना १८७२ सालातील आहे. अमेरिकेत स्त्रियांना मताधिकार मिळवून देण्यासाठी साधारणतः अर्धशतकभर जो संघर्ष चालला, त्याच्या उद्गात्यांपैकी एक म्हणजे अँथोनी. त्यांनी केलेल्या कथित गुन्ह्यासाठी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरण्यात आला. अँथोनी यांना शिक्षा झाली. शिक्षा म्हणून असलेली दंडाची रक्कम भरण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. पुढे या मताधिकार चळवळीला यश येईपर्यंत १९२० उजाडावे लागले. अमेरिकेत सुप्रसिद्ध १९ वी घटनादुरुस्ती झाली आणि महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. एकोणिसाव्या घटनादुरुस्तीचे हे शंभरावे वर्ष आहे. महिलांना अधिकार देण्यात आला असे म्हणणे चूक. त्याउलट मागासलेपणाच्या आहारी जाऊन महिलांना दुय्यम मानणार्‍या अमेरिकन समाजाचे डोळे १९२० साली उघडले. गेल्या आठवड्यात अँथोनी यांना तत्कालीन गुन्ह्यासाठी अधिकृत ‘क्षमा’ करण्याचे सोपस्कार ट्रम्प यांनी केले आहेत. काही टोकाच्या स्त्रीमुक्ती चळवळींनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार न केलेल्या गुन्ह्यासाठी माफ करणारे तुम्ही कोण? ट्रम्प यांच्या आजवरच्या बेमालूम वक्तव्यांचा संदर्भ म्हणून तसा सवाल उपस्थित करण्याला तथ्य प्राप्त होते. त्याऐवजी संपूर्ण अमेरिकेने अँथोनी यांची क्षमा मागून, त्यानंतर त्यांचे नाव गुन्हेगारी अभिलेखातून हटवणे अधिक श्रेयस्कर ठरले असते. दुर्दैवाने ट्रम्प यांनी त्याविषयी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

अमेरिकेने राज्यघटना, लोकशाही स्वीकारली तरीही त्यात पुढारलेपण यायला मोठा काळ लोटला. गुलामीसारखी अमानुष प्रथा अमेरिकेत कायद्याने सुरू होती. स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. अशा पार्श्वभूमीवर अमेरिकेत स्त्रीमुक्तीची चळवळ उभी राहिली. पन्नासहून अधिक काळ स्वतःच्या नैसर्गिक अधिकारासाठी महिलांनी संघर्ष केला. स्त्रियांना मतदानाचे अधिकार नाकारणारे व त्याकरिता युक्तिवाद करणारे महाभागही तेव्हा अस्तित्वात होते. मताधिकार मिळवणार्‍या या चळवळीच्या महिला कार्यकर्त्यांनी लाठ्या-काठ्या झेलल्या आहेत. कारावास भोगले आहेत. म्हणून अमेरिकन स्त्रीमुक्ती चळवळीचा संदर्भ स्वतंत्रपणे लक्षात घेण्याची गरज असते. भारतासह इतरत्र जगात अशी परिस्थिती नव्हती. न्यूझीलंडसारखे देश याबाबतीत आधीच निर्णय करून मोकळे झाले होते. भारतात तर अ‍ॅनी बेझंट सारख्या महिला समग्र समाजाचे नेतृत्व करण्याच्या तयारीत होत्या. परंतु, जगाच्या पाठीवर महिला अधिकारांच्या अध्यायाला अमेरिकेचाच संदर्भ असतो. तत्कालीन झेरॉक्स काढण्याचा प्रयत्न करून ‘सुझन अँथोनी’ होता येत नाही. अँथोनी यांचे न्यायालयात भाषण झाले होते. त्यांच्या भाषणातून तत्कालीन मताधिकार चळवळीची व्यापकता दिसून येते. स्वतःच्या अनुयायांना घेऊन एका बेटावर नेण्याचे काम अँथोनी यांनी केले नाही, तर जे काही मानवाधिकाराविरोधात ते सर्वच गैरसंविधानिक आहे, असा व्यापक विचार अँथोनी यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी मांडला आहे. अमेरिकेतील कोणत्याही नागरिकाचा मतदानविषयक हक्क नाकारण्याचा अधिकार सरकारला नाही, असेही अँथोनी ठणकावून सांगतात. थोडक्यात, भविष्यात महिलांकडून पुरुषांचा मतदानाचा हक्क हिरावला जाणार असेल, तर पुरुषांचाही विचार अप्रत्यक्षपणे अँथोनी यांनी केलेला दिसून येतो. प्रत्यक्षात पुरुषांवर कधी अन्याय होईल किंवा नाही, हा कल्पनेचा भाग. परंतु, मानवजातीच्या इतिहासाला कलाटणी देणार्‍या आंदोलनाचे नेतृत्वाचे तर्क कसे कालातीत असावे लागतात, याचे प्रत्यक्ष दर्शन अँथोनींच्या विचारात दिसून येते. अशा महान व्यक्तिमत्त्वाला क्षमा करणारे आपण कोण? आपणच पुन्हा पुन्हा क्षमा मागितली पाहिजे.


डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली नेमकी भूमिका स्पष्ट करायला अजूनही हरकत नाही. सुझन अँथोनी यांना क्षमा करण्याच्या निर्णयामागे हेतू काय हे स्पष्ट झाले म्हणजे सर्वच वादावर पडदा पडेल. एका ऐतिहासिक घटनादुरुस्तीच्या शतकपूर्तीला असे वाद मानवजातीला भूतकाळात ढकलणारे आहेत. भविष्याकडे नेणारे नाहीत!






@@AUTHORINFO_V1@@