'त्या' कलमाचा वापर करून आयुक्तांना हटवण्यासाठी मोदींना पत्र
मुंबई : सुशांत सिंह प्रकरणात आत्तापर्यंत मुंबई पोलीसांची भूमीका कायम संशयास्पद राहीली असून याची जबाबदारी घेत आयुक्त परमबीर सिंह यांची तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. घटनेच्या ३११ कलमाच्या अंतर्गत आयुक्तांसह डीसीपी यांचीही हकालपट्टी करावी, असे पत्र भातखळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहून कारवाईची मागणी केली आहे. याबद्दल तीन पानी पत्र त्यांनी मोदींना लिहीले आहे.
सुशांत सिंह प्रकरणात आयुक्त परमबीर सिंह आणि डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या तपासात न्यायिक पद्धतीने तपास झाला नाही, अशी जनभावना आहे. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर तब्बल ६५ दिवसांनंतर एफआयआर दाखल करण्यात आला. ज्यावेळी ईडीने मुंबई पोलीसांकडे सुशांतच्या मोबाईल आणि लॅपटॉपची मागणी केली होती या वस्तूही त्यांना देण्यास पोलीसांनी टाळाटाळ केली होती. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातूनही सुशांत प्रकरणी पोलीसांनी एफआयआर दाखल करायला हवी, अशी मागणी करण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे गेल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. आयुक्त आणि डीसीपी यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते. पोलीस खात्यावरचा विश्वास कायम राहावा, आणि चौकशी निष्पक्ष व्हावी तोपर्यंत आयुक्त आणि डीसीपी यांनी पदावर राहणे हे न्यायिक ठरणार नाही, असे मत या पत्रात नोंदवण्यात आले आहे. पंतप्रधानांनी कलम ३११ 'अ' आणि 'ब' म्हणजे सनदी अधिकाऱ्याला हटवण्याचे अधिकार वापरून ही कार्यवारी करावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.