मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरण नरेंद्र दाभोळकरांच्या हत्या प्रकरणा सारखे होणार नाही ना, असा खोचक सवाल विचारणाऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ज्यावेळी दाभोळकरांची हत्या झाली त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे सरकार राज्यात होते आणि गृहमंत्रीही तुमच्याच पक्षाचा होता, तुमच्या सरकारने तब्बल १४ महिने या प्रकरणाशी निगडीत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही केला, हे विसरू नका', अशा शब्दांत पवारांचा समाचार घेतला.
सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे गेल्यावरून शरद पवार यांनी ट्विट केले. दाभोळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त पवार यांनी सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे गेल्याबद्दल त्याला न्याय मिळेल का ?, असा प्रश्न विचारला होता. याला आमदार भातखळकर यांनी ट्विट करून उत्तर दिले. "आपल्या नातवाला अपरिपक्व ठरवण्यापूर्वी त्याचे म्हणणे ऐकून घेतले असते तर पवारांवर ही वेळ आली नसती", असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला आहे.