आपल्या देशाला आगीच्या अपघातापासून मुक्त करण्याची चळवळ उभारण्याचं कार्य सध्या अरविंद करत आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांना त्याची कंपनी आगीपासून संरक्षण कसे करावे, याचे प्रशिक्षण देते. आगविरहीत भारत घडविण्याचं त्याचं स्वप्न खरंच वाखाणण्यासारखं आहे.
आपल्या आजूबाजूला, परिसरात, समाजात अशी काही मुले असतात ज्यांची स्वप्नं वेगळी असतात. ते अशा काही गोष्टी करतात ज्या जगावेगळ्या असतात. त्यांना पाहून अनेकदा बोललं जातं. ‘हा तर वाया गेलेला आहे.’ पण या मुलांसोबत कधी बोललात तर कळेल की यांचा ‘पॅटर्न’च वेगळा आहे. संधी मिळाली की ही मुलं अशी काही सुसाट करिअर घडवतात की ‘बिघडलेली’ मधला ‘बि’ गळून पडतो आणि उरतो तो ‘घडलेली’ मुलं. अशाच ‘पॅटर्न’चा तो पोरगा. ‘बॅन्जो’मधले सगळी वाद्ये सराईतपणे वाजवणारा. शिक्षणाची गाडी एकेक स्टेशन घेत जाणारा. शेवटच्या स्टेशनवर न उतरुन मध्येच उतरणारा. आयुष्यात पुढे काय होणार, याची माहिती नसणारा. पण त्याला आयुष्यात अशा काही संधी मिळाल्या ज्याचं त्याने सोनं केलं नसतं तर तो कपाळकरंटा ठरला असता. मात्र, त्याने शहाणपणा दाखवला. त्यामुळेच आज तो दोन कंपनीचा संचालक आहे. हा ‘बिघडलेला’ पण आता घडलेला उद्योजक म्हणजेच अरविंद भोंगळे.
मुंबई महानगरपालिकेच्या मलनिस्सारण विभागात कार्यरत असणारे श्रीधर दशरथ भोंगळे हे प्रामाणिक कर्मचारी म्हणून ओळखले जातात. पत्नी कमल आणि दोन चिरंजीव, मोठा अविनाश आणि धाकटा अरविंद यांच्यासोबत संसार नीट फुलत होता. अविनाश तसा हुशार. शिक्षण पूर्ण झाल्यावर बँकेत लागला. त्यामुळे त्याच्या नोकरीचं टेन्शन नव्हतं. धाकटा अरविंद मात्र सगळ्यात वेगळा. कमालीचा खोडकर, वाया गेलेल्या मुलांसोबत वावरणारा म्हणून हा पण वाया जाईल की काय, याची सतत भीती श्रीधर भोंगळेंना असायची. भांडुपच्या अहिल्या विद्यालयात असताना हा पोरगा अभ्यासाव्यतिरिक्त गाणं वाजवणं, डान्स अशा इतर गोष्टींमध्येच पुढं असायचा. याची संगत सुटली पाहिजे म्हणून श्रीधर भोंगळे आपल्या कुटुंबाला घेऊन वडाळ्याला राहायला आले.
वडाळ्याच्या ज्ञानेश्वर विद्यालयात आठवी ते दहावीपर्यंत अरविंद शिकला. दहावीनंतर त्याने सिद्धार्थ महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. मात्र, नेमकी बारावीला गाडी अडली. पुढे काय करायचा हा प्रश्नच होता. मार्च-ऑक्टोबर अशा वार्या सुरु झाल्या. पूर्वी कोणताही सण असो वा घरगुती समारंभ बॅन्जो वाजायचा. अरविंद या बॅन्जो पार्टीत महत्त्वाचा मोहरा असायचा. अगदी बुलबुलपासून ते ढोलपर्यंत सारं काही वाजवायचा. खरंतर हा वारसा त्याच्या आजोबाकडून आला होता. त्याचे आजोबा लोककलाकार होते. तमाशाच्या फडात ढोलकी वाजवायचे. तोच कलेचा वारसा अरविंदला मिळाला होता. पण, त्याने ना पोट भरणार होतं ना भविष्यातलं करिअर घडणार होतं. घरच्यांवर किमान आपला आर्थिक बोजा नको म्हणून अरविंद एका हाऊसकीपिंग कंपनीत कामाला गेला. अगदी शौचालय साफ करण्याचं काम होतं ते. विशीतल्या अरविंदच्या मनाला ते पटलं नाही.
तीनच दिवस काम करुन त्याने काम सोडलं. घरीच असायचा. त्यानंतर एका नावाजलेल्या मॉलमध्ये तो कामाला लागला. सेल्सबॉय म्हणून काऊंटरवर थांबणं, आलेल्या ग्राहकांना मेणबत्त्या, सुगंधी द्रव्य, अगरबत्ती दाखवणं त्याचं काम होतं. दुपारी ग्राहक कमी असायचे. त्यामुळे जरा आराम असायचा. अशाच एका निवांत दुपारी त्याला कॅसिओ दिसला. कॅसिओ पाहताच अरविंदची बोटं थरथरली. ‘मोरया मोरया’ गाण्यावर कॅसिओ सुंदर वाजवू लागला. सगळा स्टाफ मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. तिथला फ्लोअर मॅनेजर गर्दी पाहून आला. अरविंदचं गाणं त्याने ऐकलं. सगळ्यांसमोर छान कौतुकसुद्धा केलं. नंतर आडोशाला घेऊन त्याला झाप झाप झापलं. ‘जर हेच करायचंय तर आलासच कशाला इथे’ त्याच्या शब्दाने अरविंद दु:खावला. तेथील नोकरीसुद्धा त्याने सोडली. काही दिवस पुन्हा बेरोजगारीत गेले.
एका ओळखीच्या ताईने त्याला एके ठिकाणी नोकरीला लावले. सीसीटीव्ही सेवा देणारी कंपनी होती ती. काहीशी ऑफिस असिस्टंट प्रकारातली नोकरी होती ती. दुपारी जेवायला बसलं की, सतत फोन वाजायचे मग उठून जाऊन फोन उचलावा लागे. अरविंदने यावर शक्कल लढवली. बंद पडलेला इंटरकॉम सुरु केले आणि बसल्या बसल्या फोन उचलू लागला. त्याच्या मालकास जेव्हा हे कळले तो प्रभावित झाला. त्याला माहीत नव्हतं की, अरविंदला इलेक्ट्रिक गोष्टींचा गंध आहे. त्याने अरविंदला मग टेक्निशिअयन्स, सलीम सोबत फिल्डवर पाठविण्यास सुरुवात केली. अरविंद मन लावून काम करु लागला. सलीमने बॉसला सांगितले की, अरविंद खूप चांगलं काम करतो. बॉसने खूश होऊन अरविंदचा पगार पण वाढवला. तसं पाहिल्यास या क्षेत्रातला अरविंदचा मामा हा त्याचा गुरु. त्याच्या हाताखाली अरविंद शिकला. पाचवीत असल्यापासून अरविंद त्याच्यासोबत इलेक्ट्रिकची पडेल ती कामे करायचा. त्यामुळे प्रात्यक्षिक ज्ञान मिळालं होतं. मामाने अरविंदसाठी त्याच्याच कंपनीत नोकरी पाहिली. ती एक इन्व्हर्टर तयार करणारी कंपनी होती. आयुष्यातली पहिली मुलाखत याच कंपनीत दिली. एक वर्ष तिथे त्याने नोकरी केली. पगार होता 4,500 रुपये. वडाळा ते गोरेगाव ट्रेनने तो प्रवास करायचा.
जमवलेल्या पैशातून अरविंदने एक बाईक घेतली. त्याने प्रवास सुखकर होऊ लागला. मात्र, दुर्दैव आड आलं आणि अरविंदचा अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून पायावर निभावलं. पाय मोडला म्हणून वर्षभर घरातच बसावं लागलं. असं रिकामं बसण्याची सवय नसलेल्या अरविंदने परिसरातील इंटरनेटवाल्याकडून इंटरनेट कनेक्शन घेतले. युट्यूबवर नवीन तांत्रिक गोष्टी पाहण्याचा त्याला जणू छंदच जडला. त्याचा फायदा त्याला पुढच्या आयुष्यात झाला. सगळे मित्र कामाला जातात आणि आपण घरात पाय मोडून बसलोय, या विचाराने त्याला नैराश्य येऊ लागले. यातून बाहेर पडावंच लागेल. हा निश्चय करुन त्याने पार्ल्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याच दरम्यान मामाने त्याला तामिळनाडूला प्लास्टिकची भांडी तयार करणार्या कंपनीत काही दिवसाच्या कामासाठी पाठविले. ३०-३५ दिवस तिथे त्याने काम केले. पुन्हा तो मुंबईला परतला.
इन्व्हर्टर बनविण्याच्या कंपनीत काम करतानाचा किस्सा. तिथे चोरी झाली होती. जे कोणी तपासासाठी पोलीस येत त्यांना पूर्ण फुटेज दाखवले जात. त्यात खूप वेळ जात असे. एकदा मालकाचा मुलगाच ऑफिसमध्ये असताना अरविंदने ते फुटेज एडिट केले. जे आवश्यक आहे तेवढेच रेकॉर्डिंग ठेवले. त्यामुळे वेळ वाचला अन् मुद्द्याचंच दाखवलं गेलं. मालकाला हे कळल्यानंतर हा मालकसुद्धा प्रभावित झाला. तिसर्या सत्रामध्ये शिकत असताना अरविंदने आईबाबांच्या नावाची आद्याक्षरे घेऊन ‘श्रीकमल टेक्नोलॉजी’ नावाची कंपनी सुरु केली. कंपनीसाठी सुरुवातीचं भांडवल म्हणून भाऊ अविनाशकडून २५ हजार रुपये घेतले. ही कंपनी सीसीटीव्ही सेवा पुरवू लागली. ही बातमी त्यांच्याच नात्यातील उद्योजक प्रभाकर घोक्षे यांना कळली. त्यांच्या घरी अरविंदने सीसीटीव्ही बसवून दिले. घोक्षेंच्या ओळखीमध्ये एक गॅरेजवाला होता. त्याला 16 सीसीटीव्ही बसवायचे होते. “तुम्ही ते काम घ्या. तुमच्या राहण्याची-जेवणाची सोय मी करतो,” घोक्षेंनी अरविंदला सांगितले. अरविंदने होकार दिला.
मुंबईमध्ये चांगल्या दरातील सीसीटीव्ही कॅमेरे विकत घेतले. जुन्या कंपनीच्या मालकाकडून बिल तयार करण्याचं कौशल्य समजून घेतलं. सर्व सामान घेऊन एका मित्राला सोबत घेऊन तो घोक्षेंकडे गेला. घोक्षेंनी त्याला एक आठवडा ठेवून घेतले. सोबत त्या गॅरेजमध्ये जाण्यासाठी गाडी दिली. प्रचंड मदत केली. अरविंदनेसुद्धा एका आठवड्यात चोख काम करुन दिले. त्या ग्राहकाने पैसे देण्यास विलंब केला. घोक्षे मात्र अरविंदच्या कामावर खूश होते. त्याचा प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा त्यांना भावला. अवघ्या बाविशीतल्या मुलाची उद्योजकतेची धडपड त्यांना भावली. त्यांनी अरविंदला त्यांच्या ‘पीजी इंटरप्रायजेस’मध्ये काम करण्याची ऑफर दिली. ही कंपनी आगप्रतिबंधक क्षेत्रात कार्यरत होती.
अरविंदचे नंतर घोक्षेंची कन्या रितूसोबत लग्न झाले. रितू या कंपनीत भागीदार होत्या. अरविंद आल्यापासून कंपनी झपाट्याने प्रगती करु लागली. अरविंदचे हे श्रेय म्हणून घोक्षेंनी त्यास भागीदारी दिली. ही कंपनी आता ‘ग्रेट फायर सेफ्टी सोल्युशन्स’ नावाने पुण्यात प्रसिद्ध आहे. सध्या अरविंद ‘श्रीकमल टेक्नोलॉजीस’मध्ये मालक, तर ‘ग्रेट फायर’मध्ये भागीदार आहे. दोन्ही कंपन्या कॉर्पोरेट कंपन्यांपासून ते शाळा-महाविद्यालयात सेवा देत आहेत.
आपल्या देशाला आगीच्या अपघातापासून मुक्त करण्याची चळवळ उभारण्याचं कार्य सध्या अरविंद करत आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांना त्याची कंपनी आगीपासून संरक्षण कसे करावे, याचे प्रशिक्षण देते. आगविरहीत भारत घडविण्याचं त्याचं स्वप्न खरंच वाखाणण्यासारखं आहे. जर आपण तरुणाईवर विश्वास दाखविला तर तो किती उत्तम घडू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे उद्योजक अरविंद भोंगळे होय.