
मुंबई : सुशांत सिंह प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे गेल्यानंतर तरी किमान ठाकरे सरकारने आत्मचिंतन करावे, असा सल्ला विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. ज्यामुळे मुंबई पोलीसांवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले, ठाकरे सरकारच्या कामावरही प्रश्न विचारण्यात आले.
त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात जाऊन तपास सीबीआयकडे का सोपवण्यात आला, या प्रकाराचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा सल्ला फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यानंतर भाजपतर्फे ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.
मुंबई पोलीसांना सरकारच्या भूमिकांमुळे टीकेचे धनी व्हावे लागले होते. या प्रकरणात आता तपास सीबीआयकडे गेल्यानंतर सीबीआयने पोलीसांकडे या संदर्भातील महत्वाचे पुरावे आदींची मागणी केली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील महत्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल आणि सुशांत सिंह प्रकरणाबद्दल चर्चा करण्यात आली. या प्रकरणी आता सविस्तर निकालाची प्रत वाचल्यावरच याबद्दल प्रतिक्रीया देऊ, असे म्हटले.