चीनची दुखरी नस...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2020   
Total Views |

taiwan_1  H x W



भारत आणि अमेरिकेने तैवानशी वाढवलेली जवळीक पाहता, चीनचा जळफळाट होणे तसे अपेक्षितच. मात्र, चीनच्या कुटील राजकारणामुळे जगाच्या पटलावर तैवान आपली ओळख निर्माण करू शकले नाही. परंतु, कोरोनावर यशस्वीपणे केलेली मात आणि आंतरराष्ट्रीय संघटनेत सहभागी होण्याचा प्रयत्न ही तैवानला प्रकाशझोतात आणण्याची संधी आहे...



तैवान हा पूर्व आशियातील एक अंदाजित ३६ हजार चौरस किमी पसरलेला देश. मात्र, या देशाचे स्वातंत्र्य सुरुवातीपासूनच चीनच्या आक्रमक राजकारणामुळे अमान्य होत राहिले. चीन आजही या देशाला आपलाच भूभाग मानतो. एवढेच नाही तर तैवानने स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले तर हल्ल्याची धमकीही चीनने तैवानला दिली आहे. त्यामुळे जागतिक अर्थकारणात महत्त्वाचा हिस्सा असलेला व लोकसंख्येच्या दृष्टीनेही महत्त्व असणार्‍या या देशाला संयुक्त राष्ट्रात केवळ चीनच्या दबावामुळे आपला प्रतिनिधी अद्याप पाठवता आलेला नाही. तैवानला स्वतःचा ध्वज आहे, राष्ट्रगीत आहे, स्वतःची वेगळी संस्कृतीही आहे, धर्मही आहे. परंतु, चीन वारंवार डोळे वटारत असल्याने हा देश तसा चीनचाच एक भाग म्हणूनच आजवर पाहिला गेला. कोरोनाच्या संकटकाळात जेव्हा भारताला मदतीची गरज होती, त्यावेळी धावून येणाराही हाच तो देश. कोरोनाच्या प्रारंभी काळात जेव्हा जास्तीत जास्त मास्कची गरज होती आणि उत्पादन करण्यासाठी पुरेसा वेळही नव्हता, त्यावेळी तैवानने मास्क पुरवून भारताची मदत केली.



चीनच्या समुद्री सीमेला लागून असणार्‍या या देशाने कोरोनाची पुढची पावले ओळखून त्यावर वेळीच मात केली. आतापर्यंत कोरोनामुळे तैवानमध्ये केवळ सात मृत्यू झाले, तर एकूण ४८५ रुग्णांपैकी ४५०रुग्ण बरे होऊन घरीही परतले. जगात ‘तैवान पॅटर्न’चे कौतुक झाले. परंतु, दुर्दैवाची बाब म्हणजे, इतक्या महत्त्वाच्या देशाचा एकही प्रतिनिधी जागतिक आरोग्य संघटनेत नाही. अमेरिकेने यासंदर्भात प्रयत्न सुरू करून चीनला शह देण्याचा प्रयत्न तर केलाच आहे. सोबतच जागतिक माध्यम संस्थांमध्येही तैवानने आपली पोहोच वाढवून कोरोना काळात आलेली संधी दवडू न देण्याचा निर्णय घेतला हेदेखील योग्यच झाले. भारतातर्फे तैवानमध्ये दूत नियुक्तीची शक्यता आहे. दोन्ही देशांतील व्यापार वाढावा, असेही प्रयत्न एका बाजूला सुरू आहेत, हादेखील एक चांगला बदल म्हणावा लागेल. अर्थव्यवस्था, राहणीमान, आरोग्य व्यवस्था आणि संस्कृती याचा वर्षांनुवर्षांचा वारसा असणारा हा देश बलाढ्य ड्रॅगनने कायम आपल्या शेपटाखाली ठेवला. परंतु, राजकीय कौशल्य आणि नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या या देशाला स्वतःची ओळख हळूहळू मिळू लागेल, अशी भविष्यात अपेक्षा आहे. इथल्या सार्वजनिक ठिकाणी फिरताना शहरांचा वारसा आणि इतिहास डोळ्यात भरतो. बाहेर फिरताना डिजिटली कनेक्ट राहण्यासाठी तुम्हाला मोफत ‘वायफाय’ची सुविधा मिळते. रात्रीच्या वेळची शहराची वेगळीच शान. ‘स्ट्रीट फूड’ही तितकेच चवदार आणि परवडणार्‍या किंमतीत, स्वच्छता आणि सुरक्षितताही तितकीच. सर्वांना आपलेसे करणारी इथल्या नागरिकांची संस्कृती, पाहुण्यांचे स्वागत करण्याची परंपराही भारतीयांसारखीच. तैवान एक स्वतंत्र, खुले आणि अद्भुत राष्ट्र आहे, अशी घोषणा एका मुलाखतीत या देशाच्या पहिला महिला राष्ट्राध्यक्ष तसाई इंग-वेन यांनी म्हणण्यास सुरुवात केली आहे. इथूनच चीनचा जळफळाट सुरू झाला असावा.



ड्रॅगनची करडी नजर असतानाही या देशाने स्वतःची जगात एक वेगळी ओळख तयार केली. प्रत्येक क्षेत्रात जागतिक दर्जाच्या सोयी आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात इथल्या राजकीय नेतृत्वाला आणि जनतेलाही यश मिळाले आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम राष्ट्राने बांधकामासह सेवा क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आणि प्रगतीचा आलेख कायम उंचावत नेला. जगातील सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा देणारा देश म्हणून याकडे पाहिले जाते. तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रत्येक गोष्टींमध्ये इथल्या तज्ज्ञांचा आणि कंपन्यांचे योगदान आहे. ‘फॉर्च्युन ५००’ या तालिकेत या देशातील ११ कंपन्यांचा समावेश आहे. आपल्या देशात आयात होणार्‍या बर्‍याचशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही याच देशातील आहेत. तसेच मायदेशाहून वेगळ्या ठिकाणी स्थायिक होण्यासाठीही हा देश एक अग्रगण्य मानला जातो. केवळ चीनचे राजकारण इतक्या सुंदर देशाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.
@@AUTHORINFO_V1@@