मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साधेपणाने करण्यात येत असला तरी त्यामध्ये गर्दी टाळण्याच्या दृष्टीने अधिक सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न विभाग स्तरावर होत आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर भाविकांची होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी पालिकेच्या 'डी' विभागाने नियोजन केले आहे. या वॉर्डात गणेश विसर्जनासाठी गणेशभक्तांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीनुसार पालिकेकडून गणेशभक्तांना वेळ देण्यात येणार आहे. त्यामुळे ही नोंदणी करताना त्यासाठी तारीख, वेळ, विसर्जन स्थळ आदींची माहिती नोंदवावी लागेल. त्यामुळे विसर्जन स्थळावर येणाऱ्या भाविकांच्या संख्येचा अंदाज येणार आहे. विर्सजनासाठी गिरगाव चौपाटीवर येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी पालिकेच्या ग्रँट रोड येथील 'डी' वॉर्डात विसर्जनासाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासाठी भाविकांना गिरगाव समुद्रकिनाऱ्यासह कृत्रिम तलावावर विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना shreeganeshvisarajn.com वर नोंदणी करावी लागणार आहे.
वेळेपेक्षा अर्धा तास आधी यावे लागणार
विसर्जनासाठी ठरलेल्या वेळेअगोदर किमान अर्धा तास तरी आधी यावे लागेल. तसेच, त्याठिकाणी जास्त वेळ थांबता येणार नाही. या निर्णयामुळे विसर्जनस्थळी गर्दी टाळण्यासाठी मदत होईल व पोलिसांवरील ताणदेखील कमी होईल.
संकेतस्थळावर ठिकाणांचा पर्याय
ही नोंदणी घरगुतीप्रमाणेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही करावी लागेल. शनिवारपासून संकेतस्थळ कार्यान्वित झाले आहे. त्यावर गणेश विसर्जनासाठी गिल्डर लेन वसाहत, बाणगंगा, बीआयटी चाळ मैदान (मुंबई सेंट्रल), एस. एम. जोशी क्रीडांगण, ऑगस्ट क्रांती मैदान, गिल्डर लेन वसाहत, बाणगंगा, बीआयटी चाळ मैदान (मुंबई सेंट्रल), बॉडीगार्ड लेन आरटीओ, गिरगाव चौपाटी अशी ठिकाणे नमूद केली आहेत.
कृत्रिम तलाव सोसायट्यांच्या दारात ; 'जी' नॉर्थ विभागाचा उपक्रम
गणेशोत्सव काळात गर्दी टाळण्यासाठी पालिकेच्या दादर, माहीम आणि धारावी विभागात गणेशमूर्ती विसर्जनासाठी फिरता कृत्रीम तलाव सोसायट्यांच्या दारात नेण्याचा अभिनव उपक्रम पालिकेतर्फे राबवण्यात येणार आहे. सोसायटीच्या दारातच वाहनामधील कृत्रिम तलावाच्या स्वच्छ पाण्यात बाप्पाचे विसर्जन केले जाणार असल्यामुळे पावित्र्यही राखले जाणार आहे. मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असला तरी सणासुदीच्या काळात त्याचा पुन्हा फैलाव होऊ नये म्हणून पालिकेने दक्षता घेतली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊन कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता असल्यामुळे पालिकेने मंडळे आणि घरगुती उत्सवासाठी नियमावलीच घालून दिली आहे. यामध्ये आगमन-विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही असे सक्त निर्देशही देण्यात आले आहेत. शिवाय विसर्जनाच्या वेळी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी मुंबईभरात तब्बल १६७ कृत्रीम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. यातच पालिकेच्या जी-उत्तर विभागाने ‘फिरता विसर्जन कृत्रिम तलाव’ ही अभिनव संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पालिकेकडे संपर्क केल्यास सोसायटीच्या गेटवरच फिरत्या कृत्रीम तलावात विसर्जन करता येणार आहे. यासाठी जी-उत्तर विभागाचा कंट्रोल रूमच्या ०२२ २४३९७८८८ या क्रमांकावर संपर्क करावा लागणार आहे.