बिजिंग : चीनमध्ये मार्चपासून नियंत्रणात असलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची लाट पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्राझीलहून पाठवण्यात आलेल्या फ्रोझन चिकनमध्ये कोरोना विषाणू असल्याचा दावा चीनने केला आहे. चीनचे शहर शेनझेन या भागात हा प्रकार घडल्यानंतर स्थानिक रोग नियंत्रण पथकाने याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते.
चीनी अधिकाऱ्यांनी गुरुवार १३ ऑगस्ट रोजी फोझन चिकन खाल्याने कोरोना संक्रमण होत असल्याची भीती व्यक्त केली आहे. आयात केलेले मांस खाताना सावधानी बाळगण्यास सांगितले आहे. चीनच्या मते हे मांस हाताळत असताना कुठल्याही प्रकारचे कोरोना सुरक्षा नियम पाळले नसावेत, त्यामुळे अनेकांनी हे चिकन हाताळल्याने संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही, असे चीनने म्हटले होते.
यापूर्वी जूनमध्ये चीनची राजधानी असलेल्या बिजिंग शहरात शिनफॅडी सीफूड मार्केटमध्ये कोरोना संक्रमित आढळले होते. त्यावेळी इक्वाडोरहून आयात केल्या जाणाऱ्या कोळंबीमध्ये विषाणू आढळल्याचा दावा चीनने केला होता. चीन सध्या आयात होणाऱ्या सर्व प्रकारच्या अन्नपदार्थांच्या चाचण्या करत आहेत. ब्राझीलने मात्र, याबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
चीन व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर अन्य देशांतून आयात होणाऱ्या मांस आणि इतर अन्य पदार्थांवर बंदी घालण्यास इच्छुक होता. मात्र, हा निर्णय पुन्हा मागे घेण्यात आला होता. आता चीन चिकनमध्येही कोरोना आढळत असल्याचे सांगून ब्राझीलविरोधात नवी खेळी खेळत असल्याचा आरोप चीनवर लावला जात आहे. कोरोना विषाणू चीनच्या वुहान मार्केटद्वारे जगभरात पसरला होता. तिथे विविध प्रकारच्या प्राण्यांचे मांस विकले जाते. याबद्दल एक व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
दरम्यान, भारतातही फ्रोजन चिकन खाल्ले जाते. मात्र, ते खाण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या प्रकारावर जागतिक आरोग्य संघटनेने चीनची ही चाल असल्याचे म्हटले आहे. फ्रोजन चिकन खाल्याने कोरोना होत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. चीनमध्येही आता कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. चीनमध्ये पूर्णपणे कोरोना नियंत्रण आला असताना ज्या रुग्णांना याची लागण झाली होती. त्यांना पुन्हा हा संसंर्ग होत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये कोरोना विषाणू जीवंत राहत असल्याची चिंता चीनला सतावत आहे. ज्यांना कोरोना झाला होता, त्यांच्यातील कमी झालेल्या प्रतिकारशक्तीमुळे पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याने चीनची चिंता वाढली आहे. आत्तापर्यंत एकही कोरोना रुग्ण नसलेल्या चीनमध्ये पुन्हा दोन कोरोना रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे जिथून कोरोनाचा उगम झाला त्या चीनमध्ये एकूण कोरोना रुग्ण केवळ ८४ हजार ८०८ इतकेच आहेत. तर भारतात एकूण कोरोना रुग्णांची संख्या २५ लाखांच्या घरात पोहोचली आहे. तर ४० हजार ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये मृतांचा आकडा हा ४,६३४ इतका आहे.