स्टेथॉस्कोप खाली ठेवून कॅमेरा हाती घेत एक प्रतिभावान व सर्जनशील दिग्दर्शक म्हणून डॉ. जब्बार पटेल यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्याविषयी...
डॉक्टर आणि चित्रपटसृष्टी हे समीकरण तसं खूप जुनंच! वैद्यकीय क्षेत्रातून थेट झगमगाटी दुनियेत येऊन स्वतःची प्रतिभाशाली प्रतिमा तयार करणार्यांची यादी तशी मोठी आहे. या यादीतीलंच एक महत्त्वाचं नाव म्हणजे ‘डॉ. जब्बार पटेल.’ वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, चित्रपटप्रेमाने ते या क्षेत्राकडे वळले आणि या क्षेत्रात पदार्पण करत, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वीही ठरले.
जब्बार रझाक पटेल यांचा जन्म २३ जून ,१९४२ रोजी महाराष्ट्राची पवित्र संतभूमी, श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये झाला. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच त्यांना शालेय नाटकांत काम करण्याची आणि ते नाटक दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. हे नाटकं त्यांच्या या क्षेत्रात येण्याची पहिली पायरी ठरलं. या क्षेत्राबद्दल एक विलक्षण कुतूहल निर्माण झालं आणि त्याची उत्तरं शोधत पुढे त्यांची वाटचाल सुरु राहिली. सोलापुराचे श्रीराम पुजारी हे त्या काळचे नाट्यकलेच्या क्षेत्रातील मोठे नाव. त्यांच्या घरी राहून जब्बार पटेल यांना साहित्य, संगीत व नाट्य या तीन क्षेत्रांतील लोकांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. या वास्तव्यात सगळ्या मातब्बर व्यक्तिमत्त्वांना जवळून जाणून घेता यावे, म्हणून पडेल ते काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्या लोकांना चहा देण्यापासून ते अंघोळीचे पाणी देण्यापर्यंतची कामे जब्बार करत. परिणामी कलेच्या क्षेत्रातील अनेक बारकावे त्यांच्या कानावर तुलनेने फारच लवकर पडले. यातून जे काही मिळत गेले ते जब्बार यांना पुढील वाटचालीस उपयुक्त ठरले. त्याच्या या अभ्यासूवृत्तीमुळेच त्यांनी शाळेत असताना बसविलेले ‘चाफेकर, हाडाचा झुंजार आहेस तू’ हे मूक नाट्य किंवा कॉलेजमध्ये असताना ‘तुझे आहे तुजपाशी’मध्ये केलेली श्यामची भूमिका यातले बारकावे लोकांना फारच आवडले.
पुढे त्यांनी पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला. याच दरम्यान त्यांच्या आयुष्यात आले नाटककार विजय तेंडुलकर. तेंडुलकर यांच्यासह त्यांनी नाटकांवर काम करण्यास सुरुवात केली. तेंडुलकरांची नाटकं वाचून, ती बसवताना त्यात काही अनोखे, आगळेवेगळे प्रयोगही त्यांनी केले. तेंडुलकरांची त्यांनी बसवलेली ‘बळी’ ही एकांकिका आणि ‘श्रीमंत’ हे नाटक त्यावेळी प्रचंड गाजलं. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांनी बर्याच नाट्यस्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली. तेंडुलकरांनी जब्बार पटेलांना त्यांचे ‘अशी पाखरे येती’ हे अत्यंत तरल नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सादरीकरणासाठी दिलं. ते नाटक खूप गाजलं. त्यानंतर त्यांना ‘घाशीराम कोतवाल’ हे सुप्रसिद्ध नाटक दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली आणि तेही नाटक पुढे खूप गाजलं.
या सगळ्यादरम्यान त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं. जब्बार पटेल हे बालरोगतज्ज्ञ, तर त्यांची पत्नी स्त्रीरोगतज्ज्ञ. वैद्यकीय शिक्षण संपल्यावर त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने प्रॅक्टिससाठी पुण्याजवळचे दौंड हे गाव निवडलं. हळूहळू प्रॅक्टिसमध्ये जम बसू लागला. पण, तरीही दिवसभर प्रॅक्टिस करून संध्याकाळी ‘घाशीराम’च्या तालमींसाठी ते पुण्यात हजेरी लावत. त्यांची ही तारेवरची कसरत जवळपास साडेतीन महिने चालू होती.
एकदिवशी वात्रटीकाकार कवी रामदास फुटाणे ‘सामना’ चित्रपटाची पटकथा घेऊन डॉ. जब्बार पटेल यांना भेटायला आले. त्यांनी ‘या कथेवर आपल्याला चित्रपट काढायचे आहे,’ असे डॉ. पटेल यांना सांगितलं. तेंडुलकरांनीही याला संमती दर्शवली आणि जब्बार पटेल यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. ‘सामना’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.
डॉ. जब्बार पटेलांनी अनेक नाटके व चित्रपट दिग्दर्शित केले. राजकीय सारीपाटावरचे शह-काटशह मांडणारे ‘सामना’, ‘सिंहासन’, गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारित ‘जैत रे जैत’, ‘मुक्ता’, पु. ल. देशपांडेंनी लिहिलेला ‘एक होता विदूषक’ असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. अनेक पैलू असणार्या महामानव डॉ. आंबेडकरांचे जीवन तीन तासांच्या चित्रपटात रेखाटणे ही अवघड बाब असतानाही त्यांनी हे आव्हान स्वीकारत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रपट तयार केला. या चित्रपटाने डॉ. जब्बार पटेल यांना ‘प्रयोगशील दिग्दर्शक’ म्हणून ओळख मिळवून दिली. जवळपास सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये हा चित्रपट अनुवादित करण्यात आला. या चित्रपटाने डॉ. जब्बार पटेल यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले.
नाटक, चित्रपटांनंतर त्यांनी लघुपटांकडे आपला मोर्चा वळविला. त्यांचा कुसुमाग्रजांवरील लघुपट विशेष गाजला. याशिवाय ‘इंडियन थिएटर’, ‘मी एस. एम.’, ‘लक्ष्मणराव जोशी’, ‘कुमार गंधर्व’ या लघुपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. प्रायोगिक नाटकांसाठी डॉ. जब्बार पटेल यांनी ‘थिएटर अकादमी’ या नाट्यसंस्थेची निर्मिती केली.
मनोरंजन विश्वातल्या तिन्ही माध्यमांतून आपला ठसा उमटणार्या डॉ. पटेलांचा २०१४ साली विष्णुदास भावे पदकाने सन्मान करण्यात आला. नाट्यसृष्टीतील योगदानासाठी त्यांना पुणे विद्यापीठाचा ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ आणि दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.