रशियातील लोकशाही कधीच संपुष्टात आली आहे. रशियात सरकारच्या मालकीच्या वृत्तसंस्था फक्त काम करू शकतात. त्यामुळे रशियाने विकसित केलेल्या लसीविषयी जगभरात संशय व्यक्त होणे स्वाभाविक होते. कोरोना विषाणूचे नेमके शास्त्र अजून उलगडलेले नाही. कोरोना रोगाच्या लक्षणावरही अजून मतभेद आहेत. अशात लस विकसित करणारा देश रशियासारखा असेल तर त्यावर लोकांनी विश्वास ठेवणे अशक्यच.
रशियाने दि. १२ ऑगस्ट रोजी कोरोना लसीची चाचणी केली. रशियाचे सर्वेसर्वा पुतिन यांच्या मुलीवर या लसीचा प्रयोग करण्यात आल्याचे म्हटले गेले. पुतिन यांना दोन मुली आहेत. त्यापैकी नेमक्या कोणत्या मुलीवर लसीचा प्रयोग झाला, याविषयीची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. परंतु, आमची लस यशस्वी ठरते आहे, कोरोना विषाणूचा प्रतिकार करतील, अशा अॅण्टिबॉडीज पुतिन यांच्या मुलीच्या शरीरात तयार झाल्याचाही दावा करण्यात आला. रशिया या लसीचा उपयोग सर्वप्रथम डॉक्टरांसाठी करणार असल्याचे म्हटले आहे. कोरोना महामारीवर लस शोधणारा रशिया पहिला देश ठरतो. रशियाच्या लसीवर इतर देशांकडून आक्षेप नोंदविण्यात आला. सुरुवातीला संशोधनासंदर्भात माहिती चोरल्याचे आरोप रशियावर करण्यात आले. मात्र, आता लसीच्या परिणामकारकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. भारताच्यावतीने रशियाच्या लसीच्यासंदर्भात असाच सावध पवित्रा घेण्यात आला आहे. इतक्या महाभयानक आजारावर औषधाचा शोध लागल्यानंतर जगभरात आनंद व्यक्त व्हायला हवा होता, पण तसे घडताना दिसत नाही. रशियाने लस शोधल्यानंतरदेखील जग निर्धास्त व्हायला तयार नाही. त्याउलट या लसीविषयी सारे जग सावध पावले टाकत आहे. जगभरातील तज्ज्ञ संशोधकांनी या लसीवर घेतलेले आक्षेप आपण तूर्त बाजूला ठेवू. त्या आक्षेपातून तांत्रिक कारणे पुढे केली जात आहेत, तशीच काही राजकीय कारणेदेखील असू शकतात. आर्थिक कारणे असू शकतात. पण, सामान्य माणूस ज्या वैश्विक बाजारपेठेत शेवटचा उपभोक्ता असणार आहे, त्याने रशियाचा लसीविषयी असा दृष्टिकोन का गृहित धरला, हे समजून घेतले पाहिजे.
बाजारपेठेतील शेवटचा घटक हा उपभोक्ता असतो. ग्राहकाच्या मानसिकतेने बहुतांश गणिते ठरत असतात. कोरोनाच्या लसीसाठी जगातील प्रत्येक माणूस ग्राहकाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे जगाचा रशियाविषयीचा एक दृष्टिकोन या लस प्रकरणानिमित्ताने समोर आला. रशियात जवळपास प्रत्येक क्षेत्रात सरकारची मक्तेदारी असल्यामुळे लसीची अधिकृत घोषणादेखील राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केले होती. पुतिन यांच्या घोषणेनंतर जे देश कोरोना लसीवर संशोधन करत होते, त्यांनी रशियावर संशोधन चोरल्याचा आरोप केला होता. रशियातील गुप्तचर यंत्रणा यापूर्वी अशा प्रकरणात अनेकदा चर्चेत राहिली आहे. लस प्रकरणात रशियावर सुरू असलेल्या आरोपाच्या फैरी थांबल्या. त्यानंतर पुतिन यांच्या दोन मुलींपैकी एकीवर लसीचा प्रयोग झाल्याचे जाहीर करण्यात आले. तरीही जग रशियाच्या लसीवर विश्वास ठेवायला तयार नाही. रशियाच्या लसीवर संशोधन चोरल्याचे आरोप झाले, हे त्यामागील कारण नव्हे. जगाला लस हवी आहेच, ते कोणत्याही पद्धतीने उपलब्ध झाली तरीही चालेल. कारण, कोरोना महामारीने सगळ्या जगाला हवालदिल करून सोडले आहे. रशियाने विकसित केलेल्या लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले म्हणून जग विश्वास ठेवायला तयार नाही, असेही आपण म्हणू शकत नाही. रशियाची अंतर्गत व्यवस्था या संशयकल्लोळाला जबाबदार ठरते, हे कारण जास्त समर्पक ठरेल.
रशियातील लोकशाही कधीच संपुष्टात आली आहे. रशियात सरकारच्या मालकीच्या वृत्तसंस्था फक्त काम करू शकतात. त्यामुळे रशियाने विकसित केलेल्या लसीविषयी जगभरात संशय व्यक्त होणे स्वाभाविक होते. कोरोना विषाणूचे नेमके शास्त्र अजून उलगडलेले नाही. कोरोना रोगाच्या लक्षणावरही अजून मतभेद आहेत. अशात लस विकसित करणारा देश रशियासारखा असेल तर त्यावर लोकांनी विश्वास ठेवणे अशक्यच. कारण, रशियाकडून दिल्या जाणार्या माहितीची विश्वासार्हता कशी तपासणार? रशियाने ही लस विकसित करताना संशोधन कसे केले? खरोखरच या लसीच्या आवश्यक त्या चाचण्या झाल्यात का? हे सगळेच प्रश्न अनुत्तरित आहेत. रशियाच्या अंतर्गत व्यवस्थेत हे प्रश्न विचारण्याची मुभा नाही. रशियाकडून या संदर्भाने जी माहिती दिली जाईल, तीच जगाला उपलब्ध होते. अशा सरकारपुरस्कृत माहितीच्या विश्वासार्हतेची खात्री कोण घेणार? म्हणून या लसीचे रशियावर नेमके काय परिणाम होतात, हे समोर येईपर्यंत जग प्रतीक्षा करेल. कदाचित रशियातील अंतर्गत परिस्थिती लोकशाहीपूरक आणि विश्वासार्ह असती, तर मात्र आज वेगळे चित्र पाहायला मिळाले असते.